मुंबई बातम्या

हवेची गुणवत्ता सुधारण्याच्या आराखडय़ाचे काय झाले? ‘मुंबई फस्र्ट’ संस्थेच्या परिसंवादात प्रश्न – Loksatta

मुंबई : हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी २०१७ मध्ये राष्ट्रीय स्तरावर एक कृती आराखडा तयार करण्यात आला होता. हा आराखडा सर्व शहरांना बंधनकारक आहे. हवेचा गुणवत्ता निर्देशांक किती असल्यावर कोणत्या उपाययोजना कराव्यात याबाबत त्यात सूचना केल्या आहेत. मुंबईतील हवेची गुणवत्ता सातत्याने घसरत असताना या आराखडय़ाची मुंबईत अंमलबजावणी केली जाते की नाही, केली तर नक्की कोणत्या उपाययोजना केल्या त्याची माहिती जाहीर करण्याची मागणी तज्ज्ञांनी व्यक्त केली.

नोव्हेंबरपासून मुंबईतील हवेची गुणवत्ता घसरू लागली आहे. गुणवत्ता निर्देशांक वाढल्यामुळे दिल्लीपेक्षा मुंबईतील हवा प्रदूषित झाली असल्याचे आढळून आले आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईतील हवेची गुणवत्ता वाढवण्यासाठी नक्की कोणती कारणे आहेत, त्यावर कोणते उपाय केले पाहिजेत याबाबत विचारमंथन करण्यासाठी ‘मुंबई फस्र्ट’ या संस्थेने दक्षिण मुंबईत एका परिसंवादाचे आयोजन केले होते.

‘क्लीअरिंग द एअर..इम्प्रूव्हिंग एअर क्वालिटी इन मुंबई’ अर्थात मुंबईतील हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी..या विषयावरील परिसंवादात आरोग्य, शहर नियोजन, पर्यावरण अशा विविध क्षेत्रातील तज्ज्ञांनी व रहिवासी संघटनांनी सहभाग नोंदवला व आपली मते व्यक्त केली. या सर्व परिसंवादाचा एक अहवाल तयार करून तो राज्य सरकारला सादर करण्यात येणार आहे. 

मुंबईतील हवेची गुणवत्ता गेल्या काही दिवसांपासून ‘वाईट’ ते ‘अतिवाईट’ झाली  आहे. विस्तीर्ण समुद्रकिनारा लाभलेल्या मुंबईत गेल्या काही काळात समुद्राकडून वाहणाऱ्या वाऱ्यांची गती मंदावली आहे. त्यामुळे हवेतील धुलीकण वाऱ्याबरोबर वाहून जाण्याचे प्रमाणही कमी झाले आहे. त्यामुळे प्रदूषित हवेची स्थिती बराचकाळ तशीच राहत असल्याचेही मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. 

मुंबईला विस्तीर्ण समुद्रकिनारा लाभलेला असल्यामुळे आतापर्यंत कधीही मुंबईत दिल्लीप्रमाणे प्रदूषण होत नव्हते. मात्र यावर्षी प्रथमच प्रदूषणाने दिल्लीलाही मागे टाकले आहे. त्यामुळे या प्रदूषणावर उपाय व कारणे शोधण्याची वेळ आली आहे. असा सूर या परिसंवादातील मान्यवरांनी व्यक्त केला.

समुद्राकडून वाहणाऱ्या वाऱ्यांची पद्धत (विंड पॅटर्न) हा गेल्या दोन वर्षांत बदलला असल्याचे मत सफर या संस्थेचे डॉ. गुफरान बेग यांनी व्यक्त केले. दर तीन-चार दिवसांनी समुद्राकडून येणारे वारे आता दहा ते बारा दिवसांच्या कालावधीनंतर वाहत आहेत. त्यामुळे वाऱ्याचा वेगही मंदावला आहे. या कारणांमुळे हवेतील धुलिकण पुढे वाहत जात नाहीत तर ते जागच्या जागीच राहत असल्याचे मत बेग यांनी व्यक्त केले. मुंबईला निसर्गाने दिलेले संरक्षण गेल्या काही वर्षांत हरवले असल्याची भीतीही त्यांनी व्यक्त केली.

मुंबईत  स्वयंचलित वातावरणीय वायू गुणवत्ता सर्वेक्षण केंद्रे आहेत. कचराभूमी आणि सर्वात वर्दळीच्या वाहतूक नाक्यांवर ही गुणवत्ता सर्वेक्षण केंद्रे आहेत. मात्र या सर्वेक्षण केंद्रांची जागा बदलण्याची गरज असल्याचे मत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे व्ही. एम. मोटघारे यांनी व्यक्त केले.

हवेची गुणवत्ता किती निर्देशांकापर्यंत घसरल्यानंतर मुंबईत धोक्याची सूचना दिली जाणार हे देखील निश्चित करण्याची गरज असल्याचे मत यावेळी तज्ज्ञांनी व्यक्त केले.

‘साफसफाईपूर्वी पाण्याच्या फवाऱ्यांची आवश्यकता’

मुंबईतील रस्त्यांवरील साफसफाई करताना धूळही हवेत उडते. त्यामुळे साफसफाईपूर्वी पाण्याचे फवारे मारण्याची पद्धत अवलंबली पाहिजे, असेही मत तज्ज्ञांनी व्यक्त केले. वाहनांमधून निघणारा धूर, धूम्रपान, इमारतींचे बांधकाम अशा मानवनिर्मित कारणांमुळेही प्रदूषण होत असते. त्यामुळे त्याबाबतही जनजागृती करण्याची गरज असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.

दिल्ली, पुण्यापेक्षा मुंबईची हवा ‘अतिप्रदूषित’

मुंबई : मुंबईतील हवा प्रदूषणाची पातळी खालावलेली असून जानेवारीत मुंबईतील हवा ‘प्रदूषित’ ते ‘अतिप्रदूषित’ असल्याची नोंद झाली आहे. दिल्ली, पुणे शहराच्या तुलनेत मुंबईतील हवा प्रदूषण मोठय़ा प्रमाणात वाढले आहे.

मुंबईला लाभलेल्या किनारपट्टीमुळे समुद्री वाऱ्यांमुळे मुंबईतील हवा खेळती होती. मात्र, हवा प्रदूषणाची पातळी वाढल्याने आणि समुद्री वाऱ्यांचा वेग मंदावल्याने प्रदूषके एकाच ठिकाणी जमा होत आहे. तसेच, वाहतूक कोंडीमध्ये उभ्या असलेल्या वाहनांमधील पेट्रोल, डिझेलचे बाष्पीभवन मोठय़ा प्रमाणात होत असल्याने, हवेत अनेक विषारी वायूचे प्रमाण वाढले आहे. बांधकामामुळे धूलिकणांचे प्रमाण वाढत आहे.

परिणामी, मानवी आरोग्याला धोका पोहचत आहे. ‘सफर’ या संकेतस्थळावरून भांडुपमधील हवा सामान्य ते ‘प्रदूषित’ या श्रेणीत असायची. मात्र, मंगळवारी भांडुपमधील हवा ‘अतिप्रदूषित’ झाल्याची नोंद करण्यात आली आहे. यासह वांद्रे-कुर्ला, चेंबूर, नवी मुंबई येथील हवादेखील ‘अतिप्रदूषित’ स्थितीत होती.

मुंबईत अनेक विकासात्मक कामे, इमारतीचे बांधकाम, पुनर्बाधणी, दुरुस्तीचे काम वेगाने सुरू आहे. त्यामुळे या भागात धूलिकणांचे प्रमाण अधिक आहे. त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी वारंवार पाण्याचे फवारणी केली पाहिजे. त्यामुळे हवेतील धूलिकण वाढण्यास अटकाव करता येईल. 

– डी. स्टॅलिन, प्रकल्प संचालक, वनशक्ती

Source: https://news.google.com/__i/rss/rd/articles/CBMijwFodHRwczovL3d3dy5sb2tzYXR0YS5jb20vbXVtYmFpL2V4cGVydHMtZGVtYW5kLXRvLWFubm91bmNlLWV4YWN0LW1lYXN1cmVzLXRha2VuLXRvLWltcHJvdmUtbXVtYmFpLWFpci1xdWFsaXR5LW11bWJhaS1wcmludC1uZXdzLXp3cy03MC0zNDM0ODQxL9IBlAFodHRwczovL3d3dy5sb2tzYXR0YS5jb20vbXVtYmFpL2V4cGVydHMtZGVtYW5kLXRvLWFubm91bmNlLWV4YWN0LW1lYXN1cmVzLXRha2VuLXRvLWltcHJvdmUtbXVtYmFpLWFpci1xdWFsaXR5LW11bWJhaS1wcmludC1uZXdzLXp3cy03MC0zNDM0ODQxL2xpdGUv?oc=5