मुंबई बातम्या

स्वच्छ सर्वेक्षणात ‘एकला चलो रे’ – Sakal

स्वच्छ सर्वेक्षणात ‘एकला चलो रे’

मुंबई
sakal_logo

By

वाशी, ता. ३१ (बातमीदार) ः नवी मुंबई महापालिकेने स्वच्छ सर्वेक्षण २०२३ मध्ये देशात पहिला क्रमांक मिळवण्यासाठी पालिका प्रशासनाने कंबर कसली आहे; पण नवी मुंबई शहर स्वच्छ करत असताना नवी मुंबई महापालिकेच्या प्रयत्नांना शहरामधील दुसऱ्या प्राधिकरणांकडून अपेक्षित साथ मिळत नसल्याने पालिकेने ‘एकला चलो रे’चा नारा देत शहरातील स्वच्छतेची जबाबदारी स्वीकारली आहे.
नवी मुंबई शहर हे एमआयडीसी, सिडको व पालिका या तीन प्राधिकरणांवर उभे आहे; मात्र सिडको व एमआयडीसी प्रशासन हे शहर स्वच्छतेची जबाबदारी पालिकेची असल्याने त्यांच्या यांच्याशी काही एक संबध नसल्यासारखी वागत आहे. त्यामुळे गेल्या वर्षी स्वच्छ भारत सर्वेक्षणात देशात नवी मुंबई महापालिकेचा तिसरा क्रमांक आला होता. पण यंदा स्वच्छ सर्वेक्षण २०२३ मध्ये प्रथम क्रमांकासाठी पालिका प्रशासनाने जोर धरला आहे. शहरातील सर्वच परिसरातील भिंती रंगवण्यात येत असून पादचारी पुलासह, उड्डाणपुलांखाली विद्युत रोषणाईदेखील करण्यात आली आहे. तसेच एमआयडीसी तसेच रेल्वेच्या भिंतीदेखील पालिकेने रंगवल्या आहे. यासाठी पालिकेचे कर्मचारी अहोरात्र झटत आहेत. पण पालिकेच्या या प्रयत्नांना सिडको, एमआयडीसी, रेल्वे, एपीएमसी, महवितरण, सार्वजनिक बांधकाम विभागाकडून मात्र अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याने पालिकेच्या कर्मचाऱ्यांमधून नाराजी व्यक्त केली जात असून याबाबतची नाराजी पालिकेने पत्र पाठवून व्यक्त केली आहे.
———————–
पालिकेवर स्वच्छतेचे शिवधनुष्य
एमआयडीसी तसेच सिडकोच्या कार्यक्षेत्रातदेखील स्वच्छतेची जबाबदारी पालिकेला उचलावी लागत आहे. तसेच सिडकोच्या अधिपत्याखाली असणाऱ्या नवी मुंबईतील ट्रान्स हार्बर मार्गावरील रेल्वे स्टेशनची स्वच्छतेची जबाबदारी ही पालिकेनेच उचललेली आहे. शिवाय एमआयडीसीच्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात डेब्रिज टाकण्यात येत असल्याने सार्वजनिक बांधकाम विभाग दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे एका बाजूला शहर स्वच्छ करण्यासाठी पालिका प्रयत्न करत असताना दुसऱ्या प्रशासकीय यंत्रणा बघ्याच्या भूमिका घेत आहेत.
————————————
नवी मुंबई महापालिका ही स्वच्छ सर्वेक्षणामध्ये काम करत आहे; तर सिडको, महावितरण, एमआयडीसी, रेल्वे आदी प्राधिकरणाची स्वच्छ भारत अभियानासाठी एकत्र बैठक घेण्यात येणार आहे. त्यांच्याकडूनदेखील यामध्ये सहभागी होणे अपेक्षित आहे.
– राजेश नार्वेकर, आयुक्त, नमुंमपा

Source: https://news.google.com/__i/rss/rd/articles/CBMiYmh0dHBzOi8vd3d3LmVzYWthbC5jb20vbXVtYmFpL3RvZGF5cy1sYXRlc3QtbWFyYXRoaS1uZXdzLW11bTIzaDE0ODQ0LXR4dC1uYXZpbXVtYmFpLTIwMjMwMTMxMTE0ODAz0gFmaHR0cHM6Ly93d3cuZXNha2FsLmNvbS9hbXAvbXVtYmFpL3RvZGF5cy1sYXRlc3QtbWFyYXRoaS1uZXdzLW11bTIzaDE0ODQ0LXR4dC1uYXZpbXVtYmFpLTIwMjMwMTMxMTE0ODAz?oc=5