मुंबई बातम्या

Mumbai Dadar Fire : आग विझली राजकारण तापलं दादरमधील आग हा बीएमसीचा निष्काळजीपणा : कालिदास – ABP Majha

Mumbai Dadar Fire : मुंबईतील दादर (Dadar) पूर्व भागातील आरए रेसिडेन्सी टॉवरमध्ये (RA Residency Tower) काल (26 जानेवारी) रात्री लागलेल्या आगीवर रात्री बाराच्या सुमारास नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आलं. आरए रेसिडेन्सी टॉवरमधील आग लेव्हल 4 ची होती. सुदैवाने आगीत जीवितहानी झालेली नाही अथवा कोणीही जखमी झालेलं नाही. दरम्यान इमारतीमधील आग विझली तरी या आगीवरुन राजकारण मात्र तापलं आहे. मुंबई महापालिकेच्या निष्काळजीपणामुळे ही आगल्याचा आरोप भाजप आमदार कालिदास कोळंबकर यांनी केला आहे.

हा बीएमसीचा निष्काळजीपणा आहे. मुंबई महापालिका जर 44 ते 55 मजल्यांच्या इमारती बांधायला परवानगी देत असेल तर अग्निशमन दलाला देखील तितक्याच तयारीची गरज आहे. अशा परिस्थितीत अग्निशमन दलाकडे आग विझवण्यासाठी सर्व सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी सर्व तंत्र विकसित करणं आवश्यक आहे, असं कालिदास कोळंबकर म्हणाले.

अग्निशमन दलाचे जवान पायऱ्यांवरुन पाईप घेऊन 42 व्या मजल्यावर पोहोचले : कालिदास कोळंबकर

या आगीच्या घटनेविषयी अधिक माहिती देताना कालिदास कोळंबकर यांनी सांगितलं की, “दादर पूर्व इथल्या आर ए रेसिडेन्सी इमारतीच्या 42 व्या मजल्यावर रात्री आठच्या सुमारास आग लागली. आग 42 व्या मजल्यावर असल्याने ती आटोक्यात आणण्यासाठी दोन तासांहून अधिक वेळ लागला आणि क्रेन तेवढ्या उंचीवर पोहोचू शकली नाही, त्यामुळे अग्निशमन दलाच्या जवान पायऱ्यांवरुन पाईप घेऊन 42 व्या मजल्यावर पोहोचले, त्यामुळे त्यांना वेळ लागला. सध्या आग आटोक्यात आली असून, जवानांनी मेहनत घेऊन आग विझवली आहे. या घटनेत कोणीही जखमी झालेले नाही.”

VIDEO : Kalidas Kolambkar on Dadar Fire : दादरमध्ये इमारतीला आग, कालिदास कोळंबकरांचा महापालिकेवर निशाणा

[embedded content]

अग्निशमन यंत्रणा काम करत नसल्याचं समोर, अग्निशमन दल नोटीस पाठवणार

परंतु आरए रेसिडेन्सी टॉवरच्या ए विंगमधील अग्निशमन यंत्रणा (Fire Fighting System) काम करत नसल्याचं समोर आलं आहे. आरए रेसिडेन्सी टॉवरमध्ये नुकतीच नवीन सोसायटी बनली होती. परंतु विकासकाने अग्निशमन यंत्रणा तयार केलेली नव्हती. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार अग्निशमन दल लवकरच या टॉवरला नोटीस जारी करेल. या नोटीसमध्ये अग्निशमन यंत्रणा बसवण्यासाठी काही दिवसांची मुदत देण्यात येईल.

44 मजली टॉवरच्या 42 व्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये रात्री 8.30 च्या सुमारास आग लागली होती. 4 बीएचके फ्लॅटमध्ये आग लागली होती. दारावरची बेल वाजल्याने शॉर्टसर्किट होऊन आग लागली. आग लागल्यानंतर इमारतीतील सर्व रहिवाशांना सुखरुप बाहेर काढण्यात आलं. परंतु आग आटोक्यात आणण्यासाठी 4 तासांपेक्षा जास्त वेळ लागला, कारण लिफ्ट बंद असल्याने अग्निशमन दलाच्या जवानांना पायऱ्यांचा वापर करावा लागला. मात्र या ठिकाणी अग्निशमन यंत्रणा असती तर आग पसरली नसती आणि लवकर आटोक्यात आणता आली असती.

लेवल 4 दर्जाची आग

आगीची पहिल्यांदा माहिती मिळाली तेव्हा ती लेव्हल 2 आग म्हणून घोषित करण्यात आली, जी नंतर लेवल 4  घोषित केली. कारण आग विझवण्यासाठी 16 फायर इंजिन, 4 जंबो टँकर, 90 मीटर उंच क्रेनसह इतर उपकरणांची गरज लागली. याशिवाय घटनास्थळी एक रुग्णवाहिकाही होती.

संबंधित बातमी

Dadar Fire : दादरमध्ये रहिवासी इमारतीला आग, चार तासांच्या प्रयत्नानंतर आग अटोक्यात; लिफ्ट बंद असल्यामुळे अडथळा

Source: https://news.google.com/__i/rss/rd/articles/CBMieGh0dHBzOi8vbWFyYXRoaS5hYnBsaXZlLmNvbS9uZXdzL211bWJhaS9tdW1iYWktbmV3cy1kYWRhci1maXJlLWlzLWJtY3MtbmVnbGlnZW5jZS1hbGxlZ2VzLW1sYS1rYWxpZGFzLWtvbGFtYmFrYXItMTE0NTYyNNIBfGh0dHBzOi8vbWFyYXRoaS5hYnBsaXZlLmNvbS9uZXdzL211bWJhaS9tdW1iYWktbmV3cy1kYWRhci1maXJlLWlzLWJtY3MtbmVnbGlnZW5jZS1hbGxlZ2VzLW1sYS1rYWxpZGFzLWtvbGFtYmFrYXItMTE0NTYyNC9hbXA?oc=5