मुंबई बातम्या

‘मेट्रो ५’ मार्गिकेतील महत्त्वाचा टप्पा पार; कशेळी खाडीवरील शेवटचा स्पॅन उभारला – Loksatta

मुंबई : ठाणे आणि कल्याण शहराला जोडणाऱ्या ‘ठाणे- भिवंडी- कल्याण मेट्रो ५’ मार्गिकेतील एक महत्त्वाचा टप्पा नुकताच मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) पूर्ण केला. या मार्गिकेतील ५०० मीटरचा मार्ग कशेळी खाडीवरून जात असून रविवारी या मार्गातील शेवटचा स्पॅन उभारण्यात आला. या कामाच्या अनुषंगाने मुंबई महानगर प्रदेशातील खाडीवरून जाणाऱ्या पहिल्या मेट्रो मार्गाचे काम पूर्ण झाले आहे.

‘मेट्रो ५’ मार्गिका १२.७ किमी लांबीची असून या मार्गिकेचे काम दोन टप्प्यांत करण्यात येत आहे. सध्या ठाणे ते भिवंडी अशा पहिल्या टप्प्याचे काम सुरू आहे, तर लवकरच भिवंडी ते कल्याण या दुसऱ्या टप्प्याच्या कामाला सुरुवात होणार आहे. पहिल्या टप्प्याचे आतापर्यंत ७० टक्क्यांहून अधिक काम पूर्ण झाले असून या टप्प्याचे वैशिष्टय़ म्हणजे ठाणे ते भिवंडी मार्गातील ५०० मीटर लांबीचा मार्ग कशेळी खाडीवरून गेला आहे. खाडीमधून जाणारा मेट्रोचा हा पहिला मार्ग आहे. खाडीमध्ये मेट्रो मार्ग बांधण्यासाठी सेगमेंटल बॉक्स गर्डर या पद्धतीचा वापर करण्यात येत आहे. या सेगमेंटल बॉक्स गर्डरमध्ये १३ स्पॅन आहेत. प्रत्येक स्पॅनची लांबी सुमारे ४२.२३ मीटर इतकी आहे, तर सुमारे १५ मीटर उंचीवर हा मार्ग उभारण्यात आला आहे.

दुसरा टप्पा डिसेंबर २०२५ मध्ये पूर्ण?

एमएमआरडीएने रविवारी या ५५० मीटर लांबीच्या मार्गातील शेवटचा १३ वा स्पॅन उभारल्याची माहिती एमएमआरडीएतील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. एमएमआरडीएने चार महिन्यांमध्ये (१२३ दिवसांत) कशेळी खाडीवरील मेट्रो मार्गिकेचे काम पूर्ण केले आहे. एमएमआरडीएने ‘मेट्रो ५’मधील आव्हानात्मक आणि महत्त्वाचा टप्पा पूर्ण केला आहे. पहिला टप्पा डिसेंबर २०२४ मध्ये पूर्ण होण्याची शक्यता आहे, तर दुसऱ्या टप्प्याच्या कामाला मेमध्ये सुरुवात होणार असून दुसरा टप्पा डिसेंबर २०२५ मध्ये पूर्ण होण्याची शक्यता आहे.

Source: https://news.google.com/__i/rss/rd/articles/CBMilAFodHRwczovL3d3dy5sb2tzYXR0YS5jb20vbXVtYmFpL3BoYXNlLTEtb2YtbXVtYmFpLW1ldHJvLWxpbmUtNS13b3JrLW9uLTFzdC1tZXRyby12aWFkdWN0LW92ZXItd2F0ZXItYm9keS1jb21wbGV0ZWQtbXVtYmFpLXByaW50LW5ld3MtendzLTcwLTM0MjEwODcv0gGZAWh0dHBzOi8vd3d3Lmxva3NhdHRhLmNvbS9tdW1iYWkvcGhhc2UtMS1vZi1tdW1iYWktbWV0cm8tbGluZS01LXdvcmstb24tMXN0LW1ldHJvLXZpYWR1Y3Qtb3Zlci13YXRlci1ib2R5LWNvbXBsZXRlZC1tdW1iYWktcHJpbnQtbmV3cy16d3MtNzAtMzQyMTA4Ny9saXRlLw?oc=5