मुंबई बातम्या

कथित घोटाळा प्रकरणी मुंबई आयुक्त चहल यांना ईडीचं समन्स, अनिल देशमुख म्हणाले, “मला एकच सांगायचं आहे की…” – Loksatta

मुंबई महानगर पालिकेचे आयुक्त इक्बालसिंह चहल यांना सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) समन्स बजावले. तसेच, सोमवारी (१६ जानेवारी) चौकशीसाठी ईडी कार्यालयात हजर राहण्यास सांगितले. करोना काळात वैद्यकीय उपकरणे खरेदी प्रकरणात घोटाळा झाल्याच्या आरोपांची चौकशी करण्यासाठी हे समन्स बजावण्यात आले. याबाबत महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अनिल देशमुख यांना विचारलं असता त्यांनी प्रतिक्रिया दिली. ते सोमवारी माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नावर बोलत होते.

अनिल देशमुख म्हणाले, “मला मुंबई महानगरपालिका आयुक्त इक्बाल चहल यांना आलेल्या ईडीच्या समन्सवर काहीही बोलायचं नाही. मला एकच सांगायचं आहे की, आमचं महाविकासआघाडीचं जेव्हा सरकार होतं, तेव्हा महाराष्ट्रात आमच्या सरकारने जी विकासाची कामं मंजूर केली होती. मात्र, आता जे सरकार आलं आहे त्याने या विकास कामांना स्थगिती दिली आहे.”

“नागपूर अधिवेशनात काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या आमदारांनी हा प्रश्न उपस्थित केला होता. अद्यापही या अनेक विकासकामांना स्थगिती आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना माझी विनंती असेल की, त्यांनी महाराष्ट्रातील विकासकामांना दिलेली स्थगिती उठवावी. त्यामुळे महाराष्ट्रातील विकासकामांना गती मिळू शकेल,” असं मत अनिल देशमुख यांनी व्यक्त केलं.

नेमकं प्रकरण काय?

करोना काळात मुंबई पालिकेने उभारलेल्या करोना केंद्रांमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचा आरोप भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी केला होता. याबाबत त्यांनी आझाद मैदान पोलीस ठाण्यात तक्रारही दाखल केली होती. यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याची कॅगद्वारे चौकशी होणार, अशी माहिती दिली होती.

काय म्हणाले होते किरीट सोमय्या?

किरीट सोमय्या म्हणाले, “मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल चहल, त्यांचे सरकारी आणि तत्कालिन सत्ताधाऱ्यांनी मुंबई महापालिकेतील घोटाळ्याची चौकशी होऊ नये, यासाठी अनेक प्रयत्न केले. पण मी मुंबई महापालिका आयुक्तांना आव्हान दिलं होतं ही देशात लोकशाही आहे आणि याची चौकशी होणारच आहे. त्याप्रमाणे चौकशी सुरू झाली आहे.”

हेही वाचा : पश्चिम बंगाल किंवा केरळप्रमाणे राज्य सरकार ‘ईडी’ चौकशीचा ससेमिरा मागे लागलेल्या अधिकाऱ्यांची पाठराखण करणार का?

“सुरुवातीला करोना काळात ज्या कंपनीला कंत्राट मिळाले होते, त्याची चौकशी करण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. हळू हळू ऑक्सिजन प्लांट घोटाळा तसेच अस्लम शेख यांचे पत्र, आणि जे कोविड सेंटर कधी सुरूच नाही झालं, त्याच्या देखभालीसाठी किशोरी पेडणेकर यांनी स्वत:च्या कंपनीला दिलेलं कंत्राट, यासर्वांची चौकशी होईल आणि करोना काळात जी काळी कमाई झाली आहे, त्याचा हिशोब आम्ही घेणारच”, अशी प्रतिक्रिया सोमय्या यांनी दिली.

Source: https://news.google.com/__i/rss/rd/articles/CBMilgFodHRwczovL3d3dy5sb2tzYXR0YS5jb20vbXVtYmFpL2FuaWwtZGVzaG11a2gtY29tbWVudC1vbi1lZC1zdW1tb25zLXRvLWJtYy1jb21taXNzaW9uZXItaXFiYWwtY2hhaGFsLWluLWNvdmlkLWNlbnRlci1mcmF1ZC1hbGxlZ2F0aW9ucy1wYnMtOTEtMzQwMDkyOC_SAZsBaHR0cHM6Ly93d3cubG9rc2F0dGEuY29tL211bWJhaS9hbmlsLWRlc2htdWtoLWNvbW1lbnQtb24tZWQtc3VtbW9ucy10by1ibWMtY29tbWlzc2lvbmVyLWlxYmFsLWNoYWhhbC1pbi1jb3ZpZC1jZW50ZXItZnJhdWQtYWxsZWdhdGlvbnMtcGJzLTkxLTM0MDA5MjgvbGl0ZS8?oc=5