मुंबई बातम्या

विश्लेषण: मियावाकी शहरी जंगल म्हणजे नेमके काय? मुंबई महापालिकेकडून याची सक्ती का? – Loksatta

इंद्रायणी नार्वेकर

मोठ्या आकाराच्या भूखंडावर इमारतीचे बांधकाम करताना खुल्या क्षेत्रावरील काही भागात मियावाकी वन विकसित करणे आता मुंबई महानगरपालिकेने बंधनकारक केले आहे. त्यामुळे मियावाकी पद्धतीने शहरी जंगल तयार करण्याच्या कामात आता केवळ मुंबई महानगरपालिकाच नाही, तर सर्वसामान्यांनाचाही सहभाग वाढणे अपेक्षित आहे. त्यामुळे मियावाकी शहरी जंगल म्हणजे काय हे जाणून घ्यावे लागेल.

मियावाकी शहरी जंगलांची आवश्यकता का?

गेल्या काही वर्षांत मुंबई महानगरपालिकेने विविध विकासकामांसाठी मोठ्या प्रमाणावर झाडे तोडली. त्यामुळे शहरातील झाडांची संख्या कमी होत असते. एक झाड कापले की त्या बदल्यात तीन झाडे लावण्याचा वृक्ष प्राधिकरणचा नियम आहे. मात्र पर्यायी झाडे लावण्यासाठी मुंबईत आता जागाच शिल्लक नसल्यामुळे चार वर्षांपूर्वी मुंबई महानगरपालिकेने मियावाकी जंगलाचा पर्याय पुढे आणला होता.

इमारतीचे बांधकाम करताना मियावाकी बंधनकारक का?

लोकसंख्येच्या तुलनेत हिरवळीच्या जागा कमी पडत असल्यामुळे मुंबई महानगरपालिकेने हिरवळीच्या जागा वाढवण्यासाठी हा नियम अंतर्भूत करण्याचे ठरवले आहे. १० हजार चौरस मीटर आकाराच्या भूखंडावर इमारतीचे बांधकाम करताना विकास नियंत्रण नियमावलीच्या संबंधित नियमांनुसार निर्धारित आकाराची जागा ही खुले क्षेत्र असणे बंधनकारक आहे. खुल्या क्षेत्रासाठी जेवढी जागा निर्धारित करण्यात येईल, त्या जागेच्या ५ टक्के इतक्या क्षेत्रफळावर मियावाकी वन विकसित करणे बंधनकारक करण्यात आले आहे. हे वन विकसित केले नाही तर निवासी दाखला देण्यात येणार नाही. त्यामुळे सर्वसामान्य व्यक्तीलाही घर घेताना या गोष्टीची खातरजमा करून घ्यावी लागणार आहे.

मियावाकी पद्धतीत झाडे कशी वाढतात?

मियावाकी हे वनीकरणाचे जपानी तंत्र आहे. या पद्धतीत कमी जागेत अनेक झाडे लावली जातात. एका चौरस मीटरमध्ये तीन झाडे याप्रमाणे वृक्षांची लागवड करण्यात येते. त्यामुळे एक झाड वाढले की बाजूच्या झाडाला सूर्यप्रकाश मिळत नाही. मग सूर्यप्रकाश शोधत दुसरे झाडही वर वाढत जाते. झाडांमधील या स्पर्धेमुळे थोड्याच काळात ती खूप वेगाने वाढतात आणि घनदाट जंगल तयार होते. या पद्धतीत केवळ तीन वर्षांत झाड १०-१२ फुटांहून जास्त उंच वाढते. झाड उंच वाढल्यामुळे त्यांची मुळेही खोलवर जातात आणि पाण्याच्या बाबतीत झाड स्वयंपूर्ण होते. शहरी जंगलामुळे पक्षी, कीटक, फुलपाखरे अशा निसर्ग साखळीतील सर्व घटकांना पोषक असे पर्यावरण तयार होऊ शकते असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

कोणती झाडे लावतात?

मुंबई महानगरपालिकेने अशा शहरी जंगलासाठी ६४ भूखंड शोधले होते व तिथे या पद्धतीने वनीकरण करण्यात आले आहे. या मियावाकी वनांमध्ये विविध ५० प्रजातींची झाडे लावण्यात आली असून यामध्ये फळझाडे, फुलझाडे, औषधी गुणधर्म असलेल्या विविध झाडांचा समावेश आहे. यात चिंच, पळस, करंज, बेहडा, सावर, रतनगुंज, साग, सिताफळ, बेल, पारिजातक, कडूनिंब, बांबू, पेरू, पुत्रजीवा, सीता अशोक, हरडा, खैर, जांभूळ, मोह, बहावा, सुरू, बदाम, रिठा, शिसम, बकुळ, अर्जुन, फणस, आवळा, कदंब यांसारख्या देशी झाडांचा समावेश आहे. त्यामुळे मुंबईतील देशी झाडांची संख्याही वाढणार आहे.

मुंबईत कुठे आहेत मियावाकी वने?

दक्षिण मुंबईतील कंबाला हिल येथील अमरसन्स गार्डन, प्रियदर्शिनी उद्यानामध्ये महानगरपालिकेने मियावाकी पद्धतीने झाडे लावली आहेत. वनांसाठी उपलब्ध झालेल्या भूखंडाच्या आकारानुसार वृक्ष लागवड करण्यात आली आहे. सर्वाधिक म्हणजे तब्बल ३६ हजार ४८४ इतकी झाडे आयमॅक्स थिएटर जवळच्या भक्ती पार्क उद्यानातील भूखंडावर लावण्यात आली आहेत. तर मालाड पश्चिम परिसरातील मनोरी गावालगतच्या एका भूखंडावर १८ हजार २०० झाडांची लागवड करण्यात आली आहे.

Source: https://news.google.com/__i/rss/rd/articles/CBMinQFodHRwczovL3d3dy5sb2tzYXR0YS5jb20vZXhwbGFpbmVkL3doYXQtZXhhY3RseS1pcy10aGUtbWl5YXdha2ktdXJiYW4tZm9yZXN0LXdoeS1pcy10aGlzLWZvcmNlZC1ieS10aGUtbXVtYmFpLW11bmljaXBhbC1jb3Jwb3JhdGlvbi1wcmludC1leHAtc2NqLTgxLTMzOTkxNTkv0gGiAWh0dHBzOi8vd3d3Lmxva3NhdHRhLmNvbS9leHBsYWluZWQvd2hhdC1leGFjdGx5LWlzLXRoZS1taXlhd2FraS11cmJhbi1mb3Jlc3Qtd2h5LWlzLXRoaXMtZm9yY2VkLWJ5LXRoZS1tdW1iYWktbXVuaWNpcGFsLWNvcnBvcmF0aW9uLXByaW50LWV4cC1zY2otODEtMzM5OTE1OS9saXRlLw?oc=5