मुंबई बातम्या

‘व्हीआयपी’ क्रमांकासाठी पैसे मोजण्याची तयारी; नवी मुंबईत आरटीओला वर्षभरात ५ कोटींचे उत्पन्न – Maharashtra Times

नवी मुंबई : करोनाच्या पार्श्वभूमीवर खासगी वाहनांना पसंती वाढली असतानाच, या वाहनांसाठी ‘व्हीआयपी’ क्रमांक मिळवण्याला नवी मुंबईकरांनी प्राधान्य दिल्याचे दिसत आहे. नवी मुंबई उपप्रादेशिक परिवहन कार्यालयांतर्गत २०२२ या वर्षभरात ‘व्हीआयपी’ क्रमांकाच्या अतिरिक्त शुल्कापोटी ५.३६ कोटी रुपयांचे उत्पन्न आरटीओच्या तिजोरीत जमा झाले आहे. त्याआधी, २०२१च्या वर्षभरात हे उत्पन्न ३.५१ कोटी होते. २०२२मध्ये त्यात घसघशीत वाढ झाल्याचे दिसत आहे.

करोनामुळे मार्च २०२०मध्ये लॉकडाउन लागू करण्यात आले. या कालावधीत बस, रिक्षातील गर्दीचा प्रवास टाळण्यासाठी अनेकांचा स्वत:चे वाहन घेण्याकडे कल दिसला. शिवाय वाहनासाठी प्रतिष्ठेचा ‘व्हीआयपी’ नंबर घेण्याकडेही नवी मुंबईकरांचा कल असल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे.

-जानेवारी ते डिसेंबर २०२१ या कालावधीत जवळपास तीन हजार ६२१ वाहनांनी ‘व्हीआयपी’ नंबर घेतला असून त्यामधून आरटीओच्या तिजोरीत तीन कोटी ५१ लाख ४९ हजार ५०० रुपये जमा झाले आहेत.

-जानेवारी ते डिसेंबर २०२२ या कालावधीत पाच हजार ४७६ वाहनांनी ‘व्हीआयपी’ नंबर घेतला असून त्यामधून पाच कोटी ३६ लाख ५६ हजार इतकी रक्कम आरटीओच्या तिजोरीत जमा झाली आहे.

लकी नंबरसाठी हजारो रुपये मोजले

वाहन क्रमांकातील आकड्यांची बेरीज करून येणारी संख्या ‘लकी नंबर’ असावी, असा काहींचा आग्रह असतो. तर आधीच्या ‘सुदैवी’ ठरलेल्या वाहनाचा नंबर पुन्हा घेण्यासाठीही काही जण उत्सुक असतात. कुटुंबातील सदस्यांच्या वाढदिवसांची तारीख असणारा वाहन क्रमांक असावा, अशीही काहींची इच्छा असते. त्यामुळे ‘हौसेला मोल नसते’ या उक्तीनुसार, ‘व्हीआयपी’ क्रमांकासाठी अतिरिक्त पैसे मोजण्याचीही तयारी असल्याने असे प्रतिष्ठित क्रमांक घेण्याकडे वाहनधारकांचा कल वाढत आहे, असे उपप्रादेशिक परिवहन आधिकारी हेमांगिनी पाटील यांनी स्पष्ट केले.

———–

व्हीआयपी क्रमांकासाठीचे शुल्क (रु.)

व्हीआयपी क्रमांक चारचाकीसाठी शुल्क दुचाकीसाठी शुल्क

१ ४ लाख ५० हजार

९, ९९, ७८६, ९९९, ९९९९ १.५० लाख २० हजार

२, ३, ४, ५, ६, ७, ८, ९, १०, ११, २२, ३३, ४४, ५५, ६६, ७७, ८८ ५० हजार १० हजार

Source: https://news.google.com/__i/rss/rd/articles/CBMiiQFodHRwczovL21haGFyYXNodHJhdGltZXMuY29tL21haGFyYXNodHJhL211bWJhaS1uZXdzLzUtY3JvcmVzLWluY29tZS1pbi15ZWFyLXRvLW5hdmktbXVtYmFpLXJ0by1mcm9tLXZpcC1udW1iZXJzL2FydGljbGVzaG93Lzk2OTI0OTY1LmNtc9IBAA?oc=5