मुंबई बातम्या

कॅन्सर रुग्णांच्या नातेवाईकांना बॉम्बे डाईंगमध्ये घरं मिळणार – जितेंद्र आव्हाड – Loksatta

मुंबई शहरात कॅन्सर रुग्णांच्या नातेवाईकांच्या निवासाची सोय करण्यासाठी टाटा मेमोरियल रुग्णालयाला १०० सदनिका हस्तांतरित करण्याच्या म्हाडाच्या निर्णयाला स्थगिती देण्यात आल्यानंतर झालेल्या वादावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी तोडगा काढला आहे. कॅन्सर रुग्णांच्या नातेवाईकांना बॉम्बे डाईंगमध्ये घरं मिळणार असल्याचं राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषद घेत सांगितलं आहे. शरद पवारांच्या उपस्थितीत झालेला निर्णय मुख्यमंत्र्यांनी रद्द झाल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत होतं.

“टाटा रुग्णालयाला आणि तिथे येणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईकांसाठी १०० सदनिका हाजी कासम चाळीत देण्यात आल्या होत्या. पण तेथील स्थानिकांनी आक्षेप घेतल्याने आणि त्यांनी तो आक्षेप स्थानिक आमदारांकडे नोंदवल्याने आमदारांनी तो प्रश्न मुख्यमंत्र्यांच्या दरबारी नेला. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी त्याला स्थगिती दिली,” असं जितेंद्र आव्हाड यांनी सांगितलं.

“शरद पवारांच्या उपस्थितीत झालेला निर्णय रद्द; आपणच बॉस असल्याचं मुख्यमंत्र्यांनी दाखवून दिलं”

“पण ती स्थगिती देतानाच कॅबिनेटच्या आधी मुख्यमंत्र्यांनी मला बोलावून घेतलं आणि त्याच परिसरात जागा शोध आणि ताबडतोब त्याबाबत कारवाई करा असं सांगितलं,” अशी माहिती जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे. पुढे बोलताना त्यांनी सांगितलं की, “आम्ही शोध घेतला असता १०० जागा बॉम्बे डाईंगमध्ये असणाऱ्या २२ इमारतींमध्ये आहे. त्यामुळे आम्हाला आता १०० जागा टाटा हॉस्पिटलला बॉम्बे डाईंगमध्ये देता येतील असा निर्णय मुख्यमंत्र्यांनी दिला असून आम्ही त्याचं स्वागत करतो”.

दरम्यान यावेळी त्यांनी मुख्यमंत्री आणि आमच्यात कोणताही दुरावा झाला नसल्याचं सांगितलं. “स्थानिक लोक, आमदारांनी घेतलेल्या आक्षेपामुळेच हा निर्णय घेण्यात आला होता. आता त्यांनी तेथील स्थानिक आमदार, सचिवांशी चर्चा करत जागा शोधण्याचे आदेश दिले होते. जागा शोधून लगेच निर्णयही घेण्यात आला,” असं आव्हाडांनी यावेळी सांगितलं. तसंच हाजी कासम चाळीमधील जागा राखीव ठेवून बीडीडी चाळीतील रहिवाशांसाठी कदाचित वापर करु अशी माहिती त्यांनी दिली.

२८८ पैकी माझ्यावर वैयक्तिक राग असलेला एकही आमदार नाही असं सागताना जितेंद्र आव्हाड यांनी विसंवाद असता तर २४ तासांच्या आत निर्णय झाला नसता. निर्णय फिरवला गेला असला तरी त्याच तत्परतने जवळजवळ एक कमीच्या अंतरावर आला असल्याचं त्यांनी सांगितलं.

“जागा द्यायच्या आहेत, कशा, कुठे आणि कोणाच्या हातातून द्यायच्या आहेत यासंबंधी मुख्यमंत्र्यांना विचारुनच केलं होतं. मुख्यमंत्र्यांची फाईलवर सही आहे. मी कोणतंही काम परवानगी घेतल्याशिवाय करत नाही,” असं जितेंद्र आव्हाड यांनी यावेली स्पष्ट केलं. “मला आनंद आहे की, काल मिळालेल्या स्थगितीवर लगेच निर्णय झाला असून परत तेवढ्याच जागा, तेवढ्याच जवळ, चांगल्या परिसरात कॅन्सर रुग्णांना देऊ शकलो,” असंही ते म्हणाले.

नेमकं काय झालं आहे –

मुंबई शहरात कॅन्सर रुग्णांच्या नातेवाईकांची व काळजीवाहू व्यक्तींच्या निवासाची सोय करता यावी या उद्देशाने टाटा मेमोरियल रुग्णालयाला १०० सदनिका हस्तांतरित करण्याच्या महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण (म्हाडा)च्या निर्णयाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी स्थगिती दिली. तसेच याबाबतचा अहवाल सादर करण्याचे आदेश गृहनिर्माण विभागाच्या प्रधान सचिवाना दिले. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते सदनिका हस्तांतरणाच्या निर्णयाला मुख्यमंत्र्यानी स्थगिती दिल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात आलं होतं.

कर्करुग्णांच्या नातेवाईकांसाठी घरे देण्याच्या निर्णयाला मुख्यमंत्र्यांची स्थगिती

टाटा मेमोरियल रुग्णालयात देशभरातून रुग्ण येत असतात. सोबतच त्यांचे नातेवाईक व काळजीवाहू व्यक्ती येतात; परंतु त्यांच्या राहण्याची व्यवस्था नसल्याने किंवा खासगी निवासस्थानाची सोय असलेले ठिकाण परवडत नसल्याने बरेचदा नातेवाईकांना पदपथावर राहावे लागत असल्याने त्यांची गैरसोय होते. ही गैरसोय टाळण्यासाठी परळ शिवडी विभागातील करीरोड येथील हाजी कासम चाळीच्या पुनर्विकासातून मिळालेल्या सदनिकांपैकी ३०० चौरस फूट क्षेत्रफळाच्या १०० सदनिका टाटा मेमोरियल रुग्णालयास नाममात्र दराने (१ रुपया प्रति वर्ष) देण्याचा निर्णय गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी घेतला होता.

शिवसेना आमदार चौधरींच्या पत्रावर‘ तपासून अहवाल सादर करावा, तोपर्यंत स्थगिती देण्यात येण्यात येत आहे’ असे आदेश मुख्यमंत्र्यांनी गृहनिर्माण विभागाच्या प्रधान सचिवांना दिले होते.

शिवसेना आमदारांचा आक्षेप काय होता?

गृहनिर्माण विभागाच्या या निर्णयाचे सर्वत्र स्वागत होत असतानाच शिवसेना आमदार अजय चौधरी यांच्या तक्रारीनंतर मुख्यमंत्र्यांनी म्हाडाच्या या महत्वकांक्षी निर्णयाला स्थगिती दिली. चौधरी शिवडी विधानसभा मतदार संघाचे प्रतिनिधित्व करतात. आपल्या मतदार संघातील सुखकर्ता आणि विघ्नहर्ता या पुनर्विकसीत इमारतींमध्ये ७०० मराठी कुटुंब राहतात. येथील १०० सदनिका कर्करूग्णांच्या नातेवाईकांना राहण्यासाठी देण्याच्या म्हाडाच्या निर्णयामुळे या रहिवाशामध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे या निर्णयाला तत्काळ स्थगिती द्यावी आणि याऐवजी भोईवाडा येथील म्हाडा गृहसंकुलालामधील तयार इमारतीमधील सदनिका टाटा रूग्णालयास द्यावी अशी मागणी चौधरी यांनी पत्रातून मुख्यमंत्र्यांना केली होती. त्याची दखल घेत मुख्यमंत्र्यांनी हा स्थगितीचा निर्णय घेतला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

ताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.

First Published on June 23, 2021 4:27 pm

Web Title: ncp jitendra awhad maharashtra cabinet cm uddhav thackeray cancer patients bombay dyeing mhada sgy 87

Source: https://www.loksatta.com/mumbai-news/ncp-jitendra-awhad-maharashtra-cabinet-cm-uddhav-thackeray-cancer-patients-bombay-dyeing-mhada-sgy-87-2508773/