मुंबई बातम्या

वेगमर्यादेचे उल्लंघन केलेल्या ६१३ जणांना दंड, दुचाकीस्वारही जाळय़ात ;समृद्धी महामार्गावर ‘सुसाऽऽऽट’ वसुली – Loksatta

मुंबई : समृद्धी महामार्गाच्या नागपूर-शिर्डी या खुल्या झालेल्या टप्प्यात वाहनचालक वेगमर्यादेच्या नियमांचे सर्रास उल्लंघन करीत भरधाव वेगात वाहने चालवत आहेत. ११ डिसेंबर ते २ जानेवारी या काळात वेगमर्यादा मोडणाऱ्या तब्बल ६१३ प्रकरणांची नोंद झाली आहे. काही प्रकरणांमध्ये ताशी १६० किलोमीटर वेगापर्यंत गाडय़ा पळविल्याचे उघडकीस आले आहे.

महामार्ग खुला झाल्यापासून तेथील अपघातांची संख्या पन्नाशीपार गेली आहे. त्यामुळे वेगमर्यादेचे उल्लंघन करणाऱ्यांना रोखण्याचे मोठे आव्हान महामार्ग वाहतूक पोलिसांसमोर उभे ठाकले आहे. ११ डिसेंबरला महामार्ग खुला झाल्यानंतर नागपूर-शिर्डी अंतर पाच तासांत कापता येणार आहे. प्रशस्त अशा या महामार्गावर अवजड वाहनांसाठी ताशी ८० किलोमीटर आणि हलक्या वाहनांसाठी ताशी १२० किलोमीटर वेगमर्यादा घालून देण्यात आली असताना अनेक वाहनचालक पालन करत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. वेगमर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर वाहतूक पोलीस कारवाईचा बडगा उगारत आहेत. आतापर्यंत पकडलेल्या ६१३ चालकांकडून १२ लाख २६ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. सीटबेल्ट न लावल्यामुळे ७८, तर परवानगी नसतानाही वाहन उभे करणे तसेच अन्य कारणांमुळे १७३ जणांना दंड करण्यात आला आहे. महामार्गावर परवानगी नसतानाही दुचाकी आणणाऱ्यांवरही पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. अशा ३० प्रकरणांची नोंद झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

अपघातांची ‘पन्नाशी’
महामार्गाचा पहिला टप्पा सुरू होऊन अद्याप एक महिनाही झाला नसताना अपघातांचे प्रमाण वाढत असल्याचे स्पष्ट झाले आहे. अपघातांची संख्या ५०वर गेली असून भरधाव वाहने आणि वाढते अपघात यामुळे समृद्धी महामार्ग चर्चेचा विषय झाला आहे.

प्राणांतिक अपघात ३ ४ मृत्यू
गंभीर अपघात ५ ९ गंभीर जखमी
किरकोळ अपघात २१ २९ जखमी
अन्य २१ अपघात कुणीही जखमी नाही

Source: https://news.google.com/__i/rss/rd/articles/CBMiaGh0dHBzOi8vd3d3Lmxva3NhdHRhLmNvbS9tdW1iYWkvNjEzLWZpbmVkLWZvci12aW9sYXRpbmctc3BlZWQtbGltaXQtb24tc2FtcmlkZGhpLWhpZ2h3YXktYW15LTk1LTMzODQzMjMv0gFtaHR0cHM6Ly93d3cubG9rc2F0dGEuY29tL211bWJhaS82MTMtZmluZWQtZm9yLXZpb2xhdGluZy1zcGVlZC1saW1pdC1vbi1zYW1yaWRkaGktaGlnaHdheS1hbXktOTUtMzM4NDMyMy9saXRlLw?oc=5