मुंबई बातम्या

‘त्या’ प्रवाशाचा शोध घेण्यासाठी दिल्ली पोलीस पोहोचले मुंबईत – Loksatta

न्यूयॉर्क-दिल्ली विमान प्रवासादरम्यान महिला प्रवाशाच्या अंगावर लघवी करणाऱ्या सहप्रवाशाचा शोध घेण्यासाठी दिल्ली पोलीस शुक्रवारी मुंबईत दाखल झाले. कुर्ला येथील कामगार नगरमधील आरोपीच्या घरी दिल्ली पोलीस पोहोचले. मात्र त्याच्या घराला कुलूप असल्याने पथकाला माघारी फिरावे लागले.

हेही वाचा- पानसरे हत्या प्रकरण : तपास हाती घेताच सूत्रधारांचे धागेदोरे सापडणे कठीण, एटीएसचा उच्च न्यायालयात दावा

नेहरू नगर पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, दिल्ली पोलिसांनी मुंबई पोलिसांना माहिती दिली आणि शुक्रवारी दुपारी मिश्राचा शोध घेत ते कामगार नगरमध्ये दाखल झाले. साध्या वेशातील पोलिसांनी परिसराची पाहणी केली. आरोपी शंकर मिश्रा परिसरात सूरज नावाने प्रसिद्ध आहे. तो कुर्ला (पूर्व) येथील कामगार नगर भागात दुमजली रो हाऊसमध्ये वास्तव्याला आहे. मिश्राचे आई-वडील, पत्नी आणि दोन वर्षांची मुलगी याच घरात राहतात. मिश्राच्या गावातील दोन मुलीही येथे राहतात. मिश्राचे आई-वडील आणि मुलीची त्या काळजी घेतात.

हेही वाचा- वर्षभर मध्य रेल्वेवरील लोकल, मेल-एक्स्प्रेसचे वेळापत्रक बिघडले; रेल्वे डब्यातील आपत्कालिन साखळी खेचण्याच्या नऊ हजार प्रकरणांची नोंद

तपासणीत मिश्रा कुटुंबाने दोन दिवसांपासून वृत्तपत्रेही घेतली नसल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे दोन दिवसांपासून घरात कोणीच नसल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला. मिश्रा कुटुंब दोन दशकांहून अधिक काळापासून तेथे राहत आहे. ते सामाजिक कार्यात सहभागी होत नसल्यामुळे त्यांच्याबाबत माहिती नसल्याचे शेजारी राहणाऱ्या एका व्यक्तीने सांगितले. मिश्रा कुटुंबाला यापूर्वी कोणालाही त्रास दिल्याचे ऐकिवात नाही, असे शेजाऱ्यांनी सांगितले.

Source: https://news.google.com/__i/rss/rd/articles/CBMizAFodHRwczovL3d3dy5sb2tzYXR0YS5jb20vbXVtYmFpL2RlbGhpLXBvbGljZS1ydXNoZWQtdG8tbXVtYmFpLW9uLWZyaWRheS10by1zZWFyY2gtZm9yLWEtZmVsbG93LXBhc3Nlbmdlci13aG8tdXJpbmF0ZWQtb24tYS1mZW1hbGUtcGFzc2VuZ2VyLWR1cmluZy1hLW5ldy15b3JrLWRlbGhpLWZsaWdodC1tdW1iYWktcHJpbnQtbmV3cy1kcGotOTEtMzM4MjYwNi_SAdEBaHR0cHM6Ly93d3cubG9rc2F0dGEuY29tL211bWJhaS9kZWxoaS1wb2xpY2UtcnVzaGVkLXRvLW11bWJhaS1vbi1mcmlkYXktdG8tc2VhcmNoLWZvci1hLWZlbGxvdy1wYXNzZW5nZXItd2hvLXVyaW5hdGVkLW9uLWEtZmVtYWxlLXBhc3Nlbmdlci1kdXJpbmctYS1uZXcteW9yay1kZWxoaS1mbGlnaHQtbXVtYmFpLXByaW50LW5ld3MtZHBqLTkxLTMzODI2MDYvbGl0ZS8?oc=5