मुंबई बातम्या

Deven Bharti : “मुंबई पोलीस दलात कुणीही सिंघम नाही.. आम्ही सगळे..” – Loksatta

मुंबई पोलीस दलाचे पहिले विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती यांनी आपल्या पदाचा पदभार स्वीकारला. त्यानंतर त्यांनी जे ट्विट केलं ते ट्विट चांगलंच चर्चेत आहे. देवेन भारती यांच्यासाठी विशेष पोलीस आयुक्त असं पद निर्माण करण्यात आलं अशी चर्चा सुरू आहे. देवेन भारती हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या खास मर्जीतले मानले जातात. आता त्यांनी आज जे ट्विट केलं आहे ते ट्विट चांगलंच चर्चेत आहे.

काय आहे देवेन भारती यांचं ट्विट?

मुंबईचे पहिले विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती यांनी म्हटलं आहे की मुंबई पोलीस दलात कुणीही सिंघम नाही.मुंबई पोलीस म्हणजे एक टीम आहे. या आशयाचं एक ट्विट देवेन भारती यांनी केलं आहे. या ट्विटच्या माध्यमातून मुंबई पोलिसांमध्ये काही मतभेद नसल्याचं दाखवण्याचा प्रयत्न केला आहे असं म्हटलं जातं आहे.

मुंबईचे विशेष पोलीस आयुक्त म्हणून आयपीएस अधिकारी देवेन भारती हे मुंबई पोलीस आयुक्त कार्यालयात पोहचले. त्याआधी त्यांनी कायदा आणि सुव्यवस्था विभागाचे जॉईंट सीपी सत्यनारायण चौधरी आणि पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांचीही भेट घेतली. विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती हे आत मुंबई पोलीस आयुक्त विवेक फडणसाळकर यांच्यासोबत काम करतील. देवेन भारती यांच्या अखत्यारीत आर्थिक गुन्हे आणि इतर विभागांचा कार्यभार येऊ शकतो.

कोण आहेत देवेन भारती?

देवेन भारती हे 1994 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहे. देवेन भारती यांना डॅशिंग अधिकारी म्हणून ओळखलं जातं. एप्रिल 2015 मध्ये मुंबईच्या सहपोलीस आयुक्त पदी त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. कायदा आणि सुव्यवस्था ही जबाबदारी त्यांच्याकडे होती. या पदावर सर्वाधिक काळ सेवा बजावण्याची संधी देवेन भारती यांना मिळाली. या दरम्यान देवेन भारती यांनी अनेक हाय प्रोफाईल प्रकरणांचा तपास केला. मुंबईतल्या हाय-प्रोफाईल प्रकरणांसह महत्त्वाच्या तपासांमध्ये देवेन भारती यांचा सहभाग होता. 26/11 च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यांचा तपास, मिड डे या वृत्तपत्राचे पत्रकार जे.डे. यांच्या हत्येचा तपासही त्यांनी केला होता. राज्यात इंडियन मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेचा कणा मोडण्यासाठी देवेन भारती ओळखले जातात. 26/11 प्रकरणातला दहशतवादी अजमल आमीर कसाब याला जेव्हा फाशी देण्यात आली त्याची जबाबदारी ज्या मोजक्या अधिकाऱ्यांवर सोपवली होती त्यापैकी एक देवेन भारती होते.

देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय

1994 चे बॅचचे आयपीएस अधिकारी असलेले देवेन भारती हे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय समजले जातात. 2014 ते 2019 या कालावधीत देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना देवेन भारती हे पोलीस सहआयुक्त (कायदा आणि सुव्यवस्था) होते. त्यानंतर त्यांना अतिरिक्त पोलीस महासंचालक म्हणून त्यांना दहशतवाद विरोधी पथकाची जबाबदारी त्यांना देण्यात आली होती. 2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर जेव्हा महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आलं तेव्हा त्यांना साईड पोस्टिंग दिलं गेलं होतं. महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाचे संयुक्त व्यवस्थापकिय संचालक हे पद देवेन भारती यांना देण्यात आलं होतं.

Source: https://news.google.com/__i/rss/rd/articles/CBMiiAFodHRwczovL3d3dy5sb2tzYXR0YS5jb20vbXVtYmFpL211bWJhaS1wb2xpY2UtaXMtYS10ZWFtLW5vLW9uZS1pcy1zaW5naGFtLXR3ZWV0cy1tdW1iYWktcG9saWNlLWNvbW1pc3Npb25lci1kZXZlbi1iaGFydGktc2NqLTgxLTMzODA0MjEv0gGNAWh0dHBzOi8vd3d3Lmxva3NhdHRhLmNvbS9tdW1iYWkvbXVtYmFpLXBvbGljZS1pcy1hLXRlYW0tbm8tb25lLWlzLXNpbmdoYW0tdHdlZXRzLW11bWJhaS1wb2xpY2UtY29tbWlzc2lvbmVyLWRldmVuLWJoYXJ0aS1zY2otODEtMzM4MDQyMS9saXRlLw?oc=5