मुंबई बातम्या

”तौक्ते” चक्रीवादळासाठी मुंबई महापालिका सज्ज – Maharashtra Times

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई

कोकण किनारपट्टीवर आज, शनिवारपासून ३ दिवस धडकणाऱ्या ”तौक्ते” चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पालिका सज्ज झाली आहे. हवामान विभागाच्या अनुमानानुसार हे चक्रीवादळ शनिवारी आणि रविवारी मुंबईच्या नजीक येण्याची शक्यता आहे. यावेळी जोरदार वाऱ्यांसह जोरदार पर्जन्यवृष्टी होण्याच्या या शक्यतेने मुंबई पालिकेने तातडीने विविध पातळीवर सुसज्ज पूर्वतयारीस सुरुवात केली आहे. मुंबईत यलो अलर्ट जाहीर करण्यात आला असून या कालावधीत ताशी ७० किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता असल्याने पालिका व अग्निशमन दलाने पूर्वतयारी केली आहे.

मुंबई पालिकेने चक्रवादळाच्या अनुषंगाने शहरातील सर्वच चौपाट्यांवर विशेष दक्षता ठेवली आहे. अतिरिक्त पालिका आयुक्त सुरेश काकाणी यांच्या मार्गदर्शनाखाली पालिका यंत्रणेकडून उपाययोजना केल्या जात आहेत. त्या तयारीचा भाग म्हणून आपत्कालीन स्थिती उद्भवल्यास सर्वच्या सर्व आपत्कालीन सहा अग्निशमन केंद्रांवर पुरेशी साधनसामुग्री ठेवण्यात आली आहे. तसेच, सर्व चौपाट्यांवर ९३ जीवरक्षकांची नेमणूकदेखील केली आहे.

मुंबई किनारपट्टीवर गेल्या वर्षी ”निसर्ग” चक्रीवादळानेही अस्तित्व दर्शविले होते. त्यानंतर यंदा हवामान खात्याने १५ मेपासून कोकण किनारपट्टीवर चक्रीवादळाचा इशारा दिला आहे. गोवा, सिंधुदुर्ग, रत्नागिरी ते गुजरातपर्यंत या वादळाचा परिणाम जाणवणार आहे. त्या सर्व शक्यतांचा विचार करूनच मुंबई पालिकेने ठिकठिकाणी विशेष लक्ष ठेवण्यास सुरुवात केली आहे. मुंबई पालिकेकडून धोकादायक वृक्षांची छाटणी, किनाऱ्यावरील वसाहतींमध्ये पाणी शिरण्याची शक्यता लक्षात घेउन तयारी, पाणी तुंबण्याच्या ठिकाणी लक्ष ठेवणे आदींचा समावेश आहे.

१६ आणि १७ मे रोजी हे वादळ मुंबई, ठाणे, रायगड, पालघर किनारपट्टीवर धडकण्याचा अंदाज आहे. यावेळी काही ठिकाणी हलका ते मध्यम तर एक ते दोन ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. नरिमन पॉइंट, नाना चौक, दादर, अंधेरी, कुर्ला, मालाड, बोरिवली अशा आपत्कालीन अग्निशमन केंद्रांवर आवश्यक ती साधनसामुग्री पुरविण्यात आली आहे. चौपाट्यांवर नेमलेल्या जवानांकडे लाइक जॅकेट, ध्वनीक्षेपक यंत्रणा, टॉर्च, गरजेनुसार होड्यादेखील उपलब्ध केल्या आहेत.

आवश्यकता भासल्यास ”एनडीआरएफ”चे साह्य

मुंबईत आपत्कालीन प्रसंग निर्माण झाल्यास आवश्यकतेनुसार राष्ट्रीय आपत्ती बचाव पथकाचेही (एनडीआरएफ) सहाय्य घेतले जाणार आहे. त्यासह नौदल, पोलिस, तटरक्षक दलाचीही मदत घेतली जाईल. चक्रीवादळाची शक्यता लक्षात घेउन कोणीही समुद्रकिनारी जाऊ नये, असे आवाहन पालिकेने केले आहे.

जम्बो केंद्रांकडेही विशेष लक्ष

चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर जम्बो करोना केंद्रांसह अन्य केंद्रांकडेही विशेष लक्ष दिले जात आहे. या ठिकाणी ३८४ वृक्षांची छाटणी केली गेली आहे. ज्या भागात पाणी साचण्याची शक्यता असते तिथे कामगारांची नेमणूक केली असून त्यांना विशिष्ट रंगातील चकाकणारी जाकिट देण्यात आली आहेत.

Source: https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/cyclone-tauktae-news-all-set-to-tackle-cyclone-if-it-hits-mumbai-says-mumbai-municipal-corporation/articleshow/82649690.cms