मुंबई बातम्या

प्रवाशांसाठी खुशखबर! मुंबई-पणजी शिवशाहीबाबत एसटी महामंडळाचा मोठा निर्णय – Maharashtra Times

मुंबई : मुंबई सेंट्रलहून कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना एसटीच्या शिवशाहीचा पर्याय आता रोजच उपलब्ध होणार आहे. नाताळच्या सूट्टीनिमित्त सुरू केलेली मुंबई-पणजी शिवशाही कायमस्वरूपी सुरू ठेवण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला आहे.

मुंबई-कोकण मार्गावर धावणाऱ्या वातानुकूलित सेवांच्या तुलनेत शिवेशाही सेवा सर्वांत स्वस्त असल्याचे एसटी महामंडळाचे म्हणणे आहे. नाताळ आणि नववर्षाच्या निमित्ताने २५ डिसेंबरला प्रवाशांच्या सुविधेसाठी शिवशाही सुरू करण्यात आलेली होती. २ जानेवारीपर्यंत ही बस आरक्षणासाठी उपलब्ध केल्यानंतर अवघ्या काही तासांत या बसचे आरक्षण पूर्ण झाले. २ जानेवारी पासून मुंबई-पणजी शिवशाही सेवा बंद करण्याच्या माहिती मिळताच मुंबई सेंट्रल येथील प्रवाशांनी बस सुरू करण्याची मागणी केली. मुंबईसह कोकणातील विविध थांब्यांवरील प्रवाशांनी स्थानिक अधिकाऱ्यांकडे आणि पणजीमधील प्रवाशांनी देखील ही बस बंद करू नये, असा तगादा एसटी अधिकाऱ्यांकडे लावला. प्रवाशांच्या मागणीला प्रतिसाद देत महामंडळाने ही सेवा कायमस्वरूपी सुरू राहणार असल्याची माहिती अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून ट्विट करत दिली. एसटीच्या मोबाईल अॅपसह अन्य आरक्षण केंद्रावरून या गाडीचे आरक्षण करता येणार आहे, असेही महामंडळाने स्पष्ट केले.

मुंबई-पणजी शिवशाहीचे तिकीट १,२४५ रुपये आहे. गोवा परिवहन महामंडळाच्या कदंब बसचे तिकीट डायॅनॅमिक अर्थात, अन्य वेळेत कमी आणि गर्दीच्या दिवशी जास्त असे आहेत. याचे किमान १,२५० ते कमाल १,५०० रुपये होते. या मार्गावर धावणाऱ्या एसी गाड्यांचे दर १,३०० ते १,५०० रुपयांपर्यंत आहेत.

Source: https://news.google.com/__i/rss/rd/articles/CBMilAFodHRwczovL21haGFyYXNodHJhdGltZXMuY29tL21haGFyYXNodHJhL211bWJhaS1uZXdzL2RlY2lzaW9uLW9mLXN0LWNvcnBvcmF0aW9uLXRvLWNvbnRpbnVlLW11bWJhaS1wYW5hamktc2hpdnNoYWhpLWZvcmV2ZXIvYXJ0aWNsZXNob3cvOTY3NTA0ODIuY21z0gGYAWh0dHBzOi8vbWFoYXJhc2h0cmF0aW1lcy5jb20vbWFoYXJhc2h0cmEvbXVtYmFpLW5ld3MvZGVjaXNpb24tb2Ytc3QtY29ycG9yYXRpb24tdG8tY29udGludWUtbXVtYmFpLXBhbmFqaS1zaGl2c2hhaGktZm9yZXZlci9hbXBfYXJ0aWNsZXNob3cvOTY3NTA0ODIuY21z?oc=5