मुंबई बातम्या

BMCमध्ये शिंदे – ठाकरे गटातील राड्याने १२ मराठी कामगार होणार बेरोजगार, सर्व पक्षांच्या कार्यालयांना आयुक्तांनी सील ठोकले – Maharashtra Times

मुंबई : मुंबई महापालिकेतील शिवसेना पक्ष कार्यालयाचा ताबा मिळवण्यासाठी शिंदे आणि ठाकरे गटांतील नेत्यांकडून आजही मुंबई महापालिकेत जोरदार घोषणाबाजी सुरू आहे. शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी बुधवारी महापालिकेतील शिवसेना पक्ष कार्यालय ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. त्यावरून ठाकरे आणि शिंदे गटांत बुधवारी जोरदार बाचाबाची झाली. यावेळी दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी समजवण्याचा प्रयत्न केला. मात्र, कोणीही ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याने पोलिसांनी बळाचा वापर करीत या कार्यकर्त्यांना काल पक्ष कार्यालयातून हुसकावून लावले होते. आज पुन्हा दोन्ही गटांत राडा होण्याची चिन्ह आहेत.

कसा सुरू झाला वाद?

मुंबई महापालिका मुख्यालयात तळमजल्यावर शिवसेनेचे पक्ष कार्यालय आहे. बुधवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे खासदार राहुल शेवाळे यांच्या नेतृत्वाखाली स्थायी समितीचे माजी अध्यक्ष यशवंत जाधव, माजी आमदार अशोक पाटील, विभागप्रमुख दिलीप नाईक, ठाण्याचे माजी महापौर नरेश म्हस्के, शीतल म्हात्रे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी शिवसेना कार्यालयात आले. शिवसेनेचे माजी नगरसेवक सचिन पडवळ व श्रीकांत शेट्ये हे दोघेजण यावेळी कार्यालयात उपस्थित होते. शेवाळे यांनी एका कार्यकर्त्यामार्फत पुष्पहार आणला व छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला घातला. त्यानंतर उपस्थितांची चर्चा सुरू झाली. त्यानंतर १० ते १५ मिनिटांतच ठाकरे गटाचे विभागप्रमुख पांडुरंग सकपाळ, माजी नगरसेवक आशीष चेंबूरकर यांच्या नेतृत्वाखाली सुमारे २५ ते ३० शिवसैनिक पक्ष कार्यालयात घुसले आणि वाद सुरू झाला.

महापालिका आयुक्तांनी सील केली सर्वच पक्ष कार्यालये

या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिका आयुक्त इकबालसिंह चहल यांनी घटनेची गंभीर दखल घेतली आणि बुधवारी रात्री शिवसेनेसह, भाजप, काँग्रेस, समाजवादी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांची कार्यालये सील करण्याची कारवाई केली. यामुळे शिवसेनेच्या नगरसेवकांनी मोठ्या संख्येने महापालिकेत कार्यालयाबाहेर गर्दी केली. यामुळे शिंदे आणि ठाकरे गटाच्या नगरसेवक आणि कार्यकर्त्यांमध्ये आज पुन्हा घोषणाबाजी सुरू आहे. पोलिसही दाखल झाले आहेत.

मुंबई महापालिकेत राडा; शिंदे गटाने पक्ष कार्यालयाचा ताबा घेतल्याने तणाव, दोन्ही गट

आयुक्तांनी सर्वच पक्षांची कार्यालये सील केल्याने या कार्यालयामध्ये काम करणारे १२ मराठी कामगार बेरोजगार होण्याच्या मार्गावर आहेत. सर्व कार्यालये बंद झाल्याने हे मराठी कामगार बेकार होणार आहेत. गेल्या २५ ते ३० वर्षांपासून हे कामगार पक्ष कार्यालयात खासगी नोकरी करत आहेत.

कुठल्या पक्षाच्या कार्यालयात किती कामगार?

भारतीय जनता पार्टी

१. संदेश राणे (२५ वर्षे )
२. मोहन चंडे (२० वर्षे )
३. सतिश कार्लेकर (१२ वर्षे )
४. स्वप्नील चंडे (८ वर्षे )

शिवसेना

१. कृष्णकुमार शेटे (३५ वर्षे )
२. नरेश चव्हाण (२० वर्षे )
३. अपर्णा चव्हाण (१३ वर्षे )

राष्ट्रवादी

१. मंगलराव वानखेडे (२३ वर्षे )

काँग्रेस

१. दीपक जाधव (३० वर्षे )
२. राजीव चाचड (२० वर्षे )
३. दिव्या कांबळे (१० वर्षे )

समाजवादी पक्ष

१. संदीप महादे (१५ वर्षे )

Source: https://news.google.com/__i/rss/rd/articles/CBMiowFodHRwczovL21haGFyYXNodHJhdGltZXMuY29tL21haGFyYXNodHJhL211bWJhaS1uZXdzL211bWJhaS1tdW5pY2lwYWwtY29tbWlzc2lvbmVyLWlxYmFsLXNpbmdoLWNoYWhhbC1zZWFsZWQtYWxsLXBvbGl0aWNhbC1wYXJ0aWVzLW9mZmljZXMvYXJ0aWNsZXNob3cvOTY1OTA1MDIuY21z0gGnAWh0dHBzOi8vbWFoYXJhc2h0cmF0aW1lcy5jb20vbWFoYXJhc2h0cmEvbXVtYmFpLW5ld3MvbXVtYmFpLW11bmljaXBhbC1jb21taXNzaW9uZXItaXFiYWwtc2luZ2gtY2hhaGFsLXNlYWxlZC1hbGwtcG9saXRpY2FsLXBhcnRpZXMtb2ZmaWNlcy9hbXBfYXJ0aWNsZXNob3cvOTY1OTA1MDIuY21z?oc=5