मुंबई बातम्या

“कंगनाचं घर पाडण्यासाठी महापालिकेचे ८० लाख….” विधानपरिषदेत काय म्हणाले एकनाथ शिंदे? – Loksatta

हिवाळी अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस आहे. अंतिम आठवडा प्रस्तावात एकनाथ शिंदे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. एवढंच काय त्यांनी कंगना रणौतचा उल्लेखही केला. कंगना रणौतचं घर पाडण्यासाठी एका वकिलाला महापालिकेचे ८० लाख रूपये दिले असा आरोप एकनाथ शिंदे यांनी केला. तसंच रवी राणा आणि नवनीत राणा यांचाही उल्लेख एकनाथ शिंदे यांनी केला.

कंगनाचं नाव घेत काय म्हणाले एकनाथ शिंदे?

राज्यात ज्यावेळेस महाविकास आघाडीचं सरकार होतं त्यावेळी सरकारच्या विरूद्ध बोललं की घरी बुलडोझर जायचे.तुमच्याकडे राज्य असताना काय सुरू होतं? ती कंगना जेव्हा मुंबईबाबत बोलली तेव्हा कंगनाचं घर तोडण्यासाठी एका वकिलाला ८० लाख रूपये दिले गेले. हे ८० लाख रूपये लोकांचे होते तुमचे नव्हते. तुम्ही ते कसे काय दिलेत? असा प्रश्न एकनाथ शिंदे यांनी विचारला आहे.

कंगना रणौतचं प्रकरण नेमकं काय होतं?
कंगना रणौतने २०२० मध्ये म्हणजेच राज्यात महाविकास आघाडीचं सरकार असताना मुंबईबाबत एक वक्तव्य केलं होतं. ज्यावरून तिला ट्रोल करण्यात आलं. त्यानंतर मुंबईत पाऊल ठेवून दाखव असं आव्हानही तिला देण्यात आलं होतं. हे आव्हान स्वीकारून जेव्हा कंगना मुंबईत आली तेव्हा मुंबई महापालिकेने तिच्या ऑफिसचा काही भाग अनधिकृत ठरवत बुलडोझर फिरवला होता. त्यानंतर आज मेरा घर टुटा है कल तेरा घमंड टुटेगा असं ट्विट कंगनाने केलं होतं. २१ जून २०२२ ला जेव्हा एकनाथ शिंदे यांनी बंड केलं त्यानंतर महाविकास आघाडी सरकार अस्थिर झालं. त्यावेळीही कंगनाचं हे ट्विट आणि हे वक्तव्य करणारा व्हिडिओ व्हायरल झाला होता. आज विधानपरिषदेत आणि विधानसभेत एकनाथ शिंदे यांनी या गोष्टीचा उल्लेख करत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीकेचे बाण चालवले. एवढंच नाही तर मुख्यमंत्रीपदाची हवा त्यांच्या डोक्यात गेली होती असाही उल्लेख एकनाथ शिंदे यांनी केला.

रवी राणा आणि नवनीत राणा यांना हनुमान चालीसा म्हणणार म्हणून तुरुंगात डांबलं

रवी राणा आणि त्यांच्या पत्नी खासदार नवनीत राणा यांना हनुमान चालीसा म्हणणार होते म्हणून १३ दिवस तुरुंगात टाकलं. केंद्रीय मंत्री नारायण राणे कुठे पळून जाणार होते? त्यांना जेवत असताना ताटावरून उठवण्यात आलं आणि अटक करण्यात आली. पत्रकार राहुल कुलकर्णी, पत्रकार अर्णब गोस्वामी या पत्रकारांना अटक केली. का तर तुमच्याविरोधात बोलले म्हणून. ते तर फक्त बोलले होते. आमच्यावरही आता टीका केली जाते आहे मात्र आम्ही कुणाला उठून जेलमध्ये टाकत नाही असंही एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.

अजित पवारांनी सुनावले खडे बोल

आज विधानसभा आणि विधान परिषदेत एकनाथ शिंदे यांची उद्धव टाकरेंच्या विरोधात फटकेबाजी पाहण्यास मिळाली. मात्र विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी अंतिम आठवडा प्रस्तावचं भाषण कधीही राजकीय नसतं असं म्हणत त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना खडे बोल सुनावले. सहा महिन्यांपूर्वी काय झालं ते सगळ्यांना माहित आहे. त्यामुळे आता त्यात पडू नका असंही अजित पवार यांनी म्हटलं आहे.

Source: https://news.google.com/__i/rss/rd/articles/CBMiqgFodHRwczovL3d3dy5sb2tzYXR0YS5jb20vbWFoYXJhc2h0cmEvODAtbGFraHMtb2YtbXVtYmFpLW11bmljaXBhbC1jb3Jwb3JhdGlvbi10by1kZW1vbGlzaC1rYW5nYW5hcy1ob3VzZS13aGF0LWRpZC1la25hdGgtc2hpbmRlLXNheS1pbi1sZWdpc2xhdGl2ZS1jb3VuY2lsLXNjai04MS0zMzY4MjE5L9IBrwFodHRwczovL3d3dy5sb2tzYXR0YS5jb20vbWFoYXJhc2h0cmEvODAtbGFraHMtb2YtbXVtYmFpLW11bmljaXBhbC1jb3Jwb3JhdGlvbi10by1kZW1vbGlzaC1rYW5nYW5hcy1ob3VzZS13aGF0LWRpZC1la25hdGgtc2hpbmRlLXNheS1pbi1sZWdpc2xhdGl2ZS1jb3VuY2lsLXNjai04MS0zMzY4MjE5L2xpdGUv?oc=5