मुंबई बातम्या

मुंबई: पश्चिम रेल्वे विस्कळीत; धुक्यामुळे मेल-एक्स्प्रेस गाड्यांवर परिणाम – Loksatta

पश्चिम रेल्वे उपनगरीय मार्गावरील चर्चगेट आणि विरारच्या लोकल गुरुवार पहाटेपासून १० ते १५ मिनिटे विलंबाने धावत आहेत. वलसाड-बोईसर दरम्यान पसरलेल्या धुक्यामुळे मुंबईत येणाऱ्या आणि जाणाऱ्या मेल-एक्स्प्रेस गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम झाला आहे. त्यामुळे विलंबाने धावणाऱ्या मेल-एक्स्प्रेस गाड्यांना प्रथम मार्ग दिल्यामुळे लोकलच्या वेळापत्रकावर परिणाम झाल्याची माहिती पश्चिम रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली.

हेही वाचा >>>अनिल देशमुख यांची सुटका; १४ महिन्यांनंतर तुरुंगाबाहेर, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते स्वागताला

वलसाड-बोईसर भागात बुधवारी रात्री १०.१५ ते गुरुवारी पहाटे ९.१५ वाजेपर्यंत पसरलेल्या धुक्यामुळे पश्चिम रेल्वेवरील मुंबई सेंट्रल, वांद्रे टर्मिनस येथून सुटणाऱ्या आणि येणाऱ्या मेल-एक्स्प्रेस गाड्या विलंबाने धावू लागल्या. त्याचा परिणाम लोकल वेळापत्रकावर झाल्याची माहिती पश्चिम रेल्वेने दिली. मेल-एक्स्प्रेस गाड्यांना मार्ग देण्यासाठी लोकल मार्गाचाही वापर करण्यात आल्याने अप आणि डाउन जलद लोकलचे वेळापत्रक विस्कळीत झाले. त्यामुळे जलद लोकल गाड्या धीम्या मार्गावर वळवल्याने त्याचा परिणाम या मार्गांवरील लोकल गाड्यांवरही होऊ लागला. लोकल १० ते १५ मिनिट उशिराने धावत असून लोकल गाड्यांना गर्दी झाली आहे. कामावर जाणाऱ्याना त्याचा फटका बसत आहे.

Source: https://news.google.com/__i/rss/rd/articles/CBMiZmh0dHBzOi8vd3d3Lmxva3NhdHRhLmNvbS9tdW1iYWkvd2VzdGVybi1yYWlsd2F5LWRpc3J1cHRlZC1kdWUtdG8tZm9nLW11bWJhaS1wcmludC1uZXdzLWFteS05NS0zMzY0NzM0L9IBa2h0dHBzOi8vd3d3Lmxva3NhdHRhLmNvbS9tdW1iYWkvd2VzdGVybi1yYWlsd2F5LWRpc3J1cHRlZC1kdWUtdG8tZm9nLW11bWJhaS1wcmludC1uZXdzLWFteS05NS0zMzY0NzM0L2xpdGUv?oc=5