मुंबई बातम्या

मुंबई : ‘बेस्ट आमची… ‘ योजना बंद – Loksatta

बेस्टचे प्रवासी आणि वीजग्राहक यांची वर्षातून एकदा सवलतीच्या दरात आरोग्य तपासणी करण्याची ‘बेस्ट आमची, काळजी घेते सर्वांची’ ही योजना प्रतिसादाअभावी बंद करण्यात आली आहे. बेस्टने प्रवासी आणि वीज ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी १ मे २०१७ पासून ही योजना लागू केली होती.

गेली काही वर्षे बेस्टचा परिवहन विभाग तोट्यात असून आता तर विद्युत विभागही तोट्यात आहे. तोट्यात जाणाऱ्या परिवहन विभागामुळे बेस्ट उपक्रमाने प्रवासी तसेच वीज ग्राहकांनाही आकर्षित करण्यासाठी ‘बेस्ट आमची, काळजी घेते सर्वांची’ ही योजन आखली. बेस्ट बसचा मासिक पास असलेल्या प्रवाशांची रक्तदाब, साखरेची पातळी तर ई पर्स, त्रैमासिक पासधारक आणि वीज ग्राहकांसाठी हिमोग्लोबीन, रक्तदाब, रक्तातील साखरेची तपासणी आणि तज्ञ्जांचा सल्ला आदी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या.

वर्षातून एकदा मोफत नेत्रतपासणी आणि वैद्यकीय सल्ला, आरोग्य तपासणी योजनेत ५० टक्के सवलत, काही अटीसापेक्ष बसपासधारक, ई-पर्स, वीजग्राहकांना रुग्णालयाच्या बिलात २० टक्के सवलत देण्याचाही निर्णय घेतला. बेस्ट कर्मचारी आणि त्यांचे कुटूंबिय, माजी कर्मचारी, बेस्ट समिती सदस्य आणि त्यांचे जोडीदार, बेस्टबाबत वृत्तसंकलन करणारे बसपासधारक पत्रकार यांच्यासाठी काही वैद्यकीय सुविधाही यांतर्गंत जाहिर करण्यात आल्या. यामुळे बेस्ट उपक्रमावर कोणताही भार पडणार नव्हता. मात्र ही योजना प्रवाशांपर्यंत तसेच कर्मचाऱ्यांपर्यंत पोहोचवण्यात बेस्ट अपयशी ठरली. त्यामुळे ही योजना बंद करण्यात आली.

प्रवासी आणि कर्मचाऱ्यांच्या अल्प प्रतिसादामुळेच ही योजना बंद करण्यात आल्याचे बेस्टच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

Source: https://www.loksatta.com/mumbai/mumbai-best-amchi-scheme-closed-mumbai-print-news-amy-95-3057244/