मुंबई बातम्या

मुंबई : पालिकेच्या निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी पेन्शन अदालत – Loksatta

मुंबई पालिकेच्या निवृत्ती वेतनधारकांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावावेत, यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्यावतीने सोमवारी ८ ऑगस्ट रोजी सकाळी ११.०० वाजता ‘उच्चस्तरीय पेन्शन अदालत’ चे आयोजन करण्यात आले आहे. भायखळा येथील ई विभागाच्या कार्यालयात तिसऱ्या मजल्यावर प्रमुख लेखापाल (कोषागार) यांच्या कार्यालयात ही पेन्शन अदालत होणार आहे.

निवृत्ती वेतनधारकांचे प्रश्न मार्गी लावावेत यासाठी प्रमुख लेखापाल (कोषागार) यांच्याकडे दर महिन्याच्या दुस-या मंगळवारी ‘उच्चस्तरीय पेन्शन अदालत’ सुरु करण्यात आली आहे. या ‘पेन्शन अदालत’मध्ये प्रमुख लेखापाल (कोषागार) यांच्या अध्यक्षतेखाली प्रमुख कर्मचारी अधिकारी व उप कायदा अधिकारी यांची त्रिसदस्यीय समिती पेन्शनधारकांची सर्व गाऱ्हाणी ऐकून त्यावर योग्य ती कार्यवाही करण्यात येणार आहे. ऑगस्ट महिन्यातील दुस-या मंगळवारी सार्वजनिक सुट्टी असल्याने ही अदालत सोमवारी ८ ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात येणार आहे.

सहाय्यक महानगरपालिका आयुक्त, खाते प्रमुख, अधिष्ठाता यांच्या स्तरावर निवृत्ती वेतनधारकांच्या समस्यांचे निराकरण झालेले नाही, अशाच प्रकरणांचा या अदालतीमध्ये समावेश करण्यात येणार आहे. सहाय्यक महानगरपालिका आयुक्त, खाते प्रमुख, अधिष्ठाता कार्यालयात विहित नमुन्यात अर्ज सादर केलेले निवृत्ती वेतनधारक या पेन्शन अदालतीमध्ये थेट उपस्थित राहू शकतील.

Source: https://www.loksatta.com/mumbai/mumbai-pension-adalat-for-retired-municipal-employees-mumbai-print-news-amy-95-3058182/