मुंबई बातम्या

“मुंबई काय होती अन् काय झाली”; रस्त्यांवरील खड्डे आणि वाहतूक कोंडी पाहून हेमा मालिनी यांचा संताप – Loksatta

पावसाळा सुरु झाला की मुंबईच्या रस्त्यावरील खड्डे आणि वाहतूक कोंडीचा प्रश्न पुन्हा एकदा डोकं वर काढतो. मुंबईमध्ये राहणाऱ्या सामान्य लोकांसाठी हे काही नवीन राहिलेलं नाही. पण मुंबईच्या रस्त्यावरील खड्डे पाहून अभिनेत्री हेमा मालिनी यांनी मात्र संताप व्यक्त केला आहे. चित्रीकरणादरम्यान मुबंईमध्ये प्रवास करणं किती अवघड झालं आहे याबाबत देखील त्यांनी सांगितलं आहे. शिवाय मुंबईच्या वाहतूक कोंडीची तुलना त्यांनी मथुरा-दिल्लीशी केली.

आणखी वाचा – “लग्नापूर्वीच गरोदर असणं म्हणजे…”; अभिनेत्री दिया मिर्झाचं वक्तव्य चर्चेत

हेमा मालिनी यांचा संताप
ई-टाइम्सला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये हेमा मालिनी मुंबईचे रस्ते आणि खड्डे याबाबत बोलत होत्या. “मुंबईच्या रस्त्यांची परिस्थिती पाहता एखादी गर्भवती महिला प्रवास कसा करणार? याचा मी विचारच करु शकत नाही. मी प्रवास करत असताना अक्षरशः घाबरले. रस्त्यावर असणारी वाहतूक कोंडी आणि यादरम्यान निर्माण होणारी परिस्थिती तर त्यापेक्षाही वाईट होती. दिल्ली-मथुरामध्ये देखील बरीच वाहतूक कोंडी व्हायची. पण आता परिस्थिती सुधारली आहे.”

पुढे बोलताना त्या म्हणाल्या, “चित्रीकरणाच्यानिमित्ताने मी मुंबईमध्ये प्रवास करत असते. पण आता हा प्रवास करणंच कठीण होऊन बसलं आहे. मुंबई काय होती, आता काय झाली.” मुंबईच्या रस्त्यांची अवस्था पाहून हेमा मालिनी यांनी चिंता देखील व्यक्त केली आहे. पावसाळा सुरु झाला की मुंबईच्या रस्त्यांबाबत अनेक प्रश्न निर्माण होतात. कित्येक कलाकार मंडळी देखील याबाबत बोलताना दिसतात. मात्र अजूनही हा प्रश्न जैसे थे आहे.

आणखी वाचा – Photos : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील बिनधास्त मुलगी वनिता खरातचे आजवरचे सर्वात बोल्ड लूक

‘शिमला मिर्ची’ या चित्रपटामध्ये हेमा मालिनी शेवटच्या दिसल्या. यामध्ये राजकुमार राव आणि रकुल प्रीत सिंग मुख्य भूमिकेत होते. हेमा मालिनी यांनी आजवर अनेक सुपरहिट चित्रपट बॉलिवूडला दिले. त्यांनी चित्रपटसृष्टीला दिलेलं योगदान मोठं आहे. ‘सीता और गीता’, ‘बागबान’, ‘शोले’, ‘नसीब’, ‘सत्ते पे सत्ता’, ‘सपनों का सौदागर’ यांसारखे अनेक सुपरहिट चित्रपट हेमा यांच्या नावे आहेत.

Source: https://www.loksatta.com/manoranjan/hema-malini-complains-about-potholes-in-mumbai-says-kya-tha-kya-ho-gaya-see-more-details-kmd-95-3002373/