मुंबई बातम्या

“करोना थांबवण्यासाठी मुंबई लोकल आणि सार्वजनिक वाहतूक थांबवावीच लागेल” – Loksatta

करोनाचा फैलाव थांबवायचा असेल तर मुंबई लोकल आणि सार्वजनिक वाहतूक बंद करणे गरजेचे आहे, असं मत ‘लोकसत्ता ऑनलाइन’ने घेतलेल्या जनमत चाचणीमध्ये ११ हजारहून अधिक जणांनी नोंदवलं आहे. फेसबुक आणि ट्विटवर घेण्यात आलेल्या या जनमत चाचणीमध्ये १४ हजार ९०० हून अधिक जणांनी आपले मत नोंदवले. त्यापैकी दोन्ही माध्यमांवरील वाचकांनी करोनाचा फैलाव थांबवण्यासाठी मुंबईची लाइफलाइन मानली जाणारी लोकल ट्रेन सेवा आणि सार्वजनिक वाहतूक सेवा काही दिवस बंद ठेवली पाहिजे असं मत नोंदवलं आहे.

राज्यामधील करोनाग्रस्तांची संख्या ४३ वर पोहचली आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी यासंदर्भातील माहिती दिली आहे. याच पार्श्वभूमीवर सरकार आणखीन काही ठोस निर्णय घेण्यासंदर्भात विचार करत असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात येत आहे. लोकांनी गर्दी कमी केली नाही तर मुंबईची लोकल सेवा बंद करावी लागेल असा इशाच राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी बुधवारी सकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये दिला आहे. मात्र ‘लोकसत्ता ऑनलाइन’ने घेतलेल्या जनमत चाचणीमध्ये सार्वजनिक वाहतूक सेवा बंद केली तरच गर्दी थांबेल असे मत अनेकांनी कमेंटमधून व्यक्त केलं आहे.

काय म्हणाले आरोग्यमंत्री

लोकांनी गर्दी कमी केली नाही तर मुंबई लोकल बंद करावी लागेल असा इशारा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिला आहे. “मुख्यमंत्र्यांनी स्पष्टपणे खासगी कंपन्यांना घरुन काम करण्याची मुभा देण्याची विनंती केली आहे. गरज पडल्यास ५० टक्क्यांपेक्षा कमी लोकांनाच कार्यालयात बोलवा असं सांगितलं आहे. सरकारी कार्यालयातही ५० टक्क्यांपेक्षी कमी लोकांनी काम करावं असा निर्णय घेत आहोत. जेणेकरुन सार्वजनिक वाहतूक सेवेवर ताण कमी पडावा. त्या अनुषंगाने मह्त्तावाचे निर्णय घेत आहोत. मुंबईच्या लोकांनी ऐकलं नाही तर बस आणि ट्रेन सेवा १० ते १२ दिवसांसाठी जनहितार्थ बंद करावी लागेल असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे,” अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली.

जनतेचं म्हणणं काय

मुंबई लोकल आणि सार्वजनिक वाहतूक सेवा बंद केल्याने करोनाचा फैलाव थांबेल असं वाटतं का?, असा सवाल ‘लोकसत्ता ऑनलाइन’ने वाचकांना विचारला होता. फेसबुकवर या प्रश्नावर १३ हजार २०० जणांनी आपली मते नोंदवली. यापैकी ११ हजारहून अधिक वाचकांनी होय मुंबई लोकल आणि सार्वजनिक वाहतूक सेवा बंद केल्यास करोनाचा फैलाव थांबेल असं मत नोंदवलं. तर या सेवा थांबवूनही करोनाचा फैलाव थांबणार नाही असं मत नोंदवणाऱ्या वाचकांची संख्या एक हजार ६०० आहे. या जनमत चाचणीमध्ये होयच्या बाजूने मत नोंदवणाऱ्या वाचकांची संख्या ८८ टक्के आहे तर नाही म्हणणाऱ्या वाचकांची संख्या १२ टक्के आहे.

याच प्रश्नावर ट्वविटरवर एक हजार ७०० हून अधिक जणांनी आपलं मत नोंदवलं आहे. त्यापैकी ८५.७ टक्के वाचकांनी होय लोकल ट्रेन आणि सार्वजनिक वाहतूक बंद केल्यास करोनाचा फैलाव थांबेल असं मत नोंदवलं आहे. तर नाही मत नोंदवणाऱ्यांची संख्या ट्विटवर १४.३ टक्के इतकी आहे.

अनेकांनी सार्वजनिक वाहतूक सेवा बंद करणं गरजेचं आहे असं म्हटलं आहे. अनेक वाचकांनी होय असं उत्तर दिलं आहे. तर काहींनी लोकल आणि सार्वजनिक वाहतूक बंद झाल्यानंतर हातावर पोट असणाऱ्यांच काय असा सवाल कमेंटमधून उपस्थित केला आहे. पाहूयात त्यापैकीच काही निवडक कमेंट…

शक्य असल्यास कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होमची सोय द्यावी असं आवाहन सरकारने केलं आहे. त्यामुळे बुधवारपासून मुंबईतील रेल्वे स्थानकांवरील गर्दी काही प्रमाणात कमी झाल्याचे चित्र दिसत आहे. मात्र करोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून सरकार काही महत्वाचे निर्णय येणाऱ्या दिवसांमध्ये घेण्याची शक्यता आहे. त्यामध्ये मुंबईची लोकल सेवा बंद होणार की नाही याबद्दलचे निर्णय येत्या काही दिवसांमध्ये राज्यातील परिस्थिती कशी आहे यावर अवलंबून राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

ताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.

First Published on March 18, 2020 5:59 pm

Web Title: loksatta poll closing down of mumbai local and public transport will help to stop spreading of coronavirus says 88 percent scsg 91

Source: https://www.loksatta.com/mumbai-news/loksatta-poll-closing-down-of-mumbai-local-and-public-transport-will-help-to-stop-spreading-of-coronavirus-says-88-percent-scsg-91-2110470/