मुंबई बातम्या

मुंबई : साडेसात लाख रुपयांचा प्रतिबंधीत पान मसाला जप्त – Loksatta

मुंबईसह राज्याच्या विविध भागात बेकायदेशीरपणे गुटखा, सुगंधीत पान मसाल्याची विक्री करण्यात येत असून गुजरातमधून रेल्वे मार्गाने पानमसाला आणि गुटख्या आणण्यात येत असल्याची माहिती रेल्वे पोलिसांना मिळाली होती. रेल्वे पोलिसांनी सापळा रचून मुंबई सेंट्रल टर्मिनस येथे सात लाख ३० हजार रुपये किंमतीचा प्रतिबंधीत सुगंधीत पानमसाला जप्त केला.

महाराष्ट्रात बंदी असलेल्या गुटखा, पान मसाल्यांची मोठ्या प्रमाणात खरेदी-विक्री करण्यात येत आहे. गुजरातमधून रेल्वे मार्गाने प्रतिबंधित सुगंधीत पानमसाला आणण्यात येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. लोहमार्ग पोलीस आयुक्त कैसर खलिद यांच्या सूचनेनुसार मुंबई सेंट्रल रेल्वे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षण केदारी पवार यांनी दोन पथके तयार करून गस्ती वाढविली होती. जयपूर सुपरस्टार एक्स्प्रेसच्या पार्सल डब्यातून २८ जून रोजी प्रतिबंधीत पान मसाला आणण्यात येत असल्याबाबतची माहिती रेल्वे पोलिसांना मिळाली होती.

त्यानुसार मुंबई सेंट्रल टर्मिनस आणि पश्चिम रेल्वेच्या दादर टर्मिनसवर प्रत्येकी एक पथक तैनात करण्यात आले होते. मुंबई सेंट्रल रेल्वे टर्मिनस येथे फलाट क्रमांक दोनवर एक्स्प्रेस दाखल होताच, सामनाची तपासणी करण्यात आली. कोटा ते सुरत – माऊथ फ्रेशनर’ असे नमुद सामान दृष्टीस पडताच त्याची तपासणी करण्यात आली. त्यात प्रतिबंधीत पान मसाला असल्याचे निष्पन्न झाले. रेल्वेतून १९ गाणींमधून आणलेला ७ लाख २९ हजार ६०० रुपये किंमतीचा सुगंधीत पानमसाला रेल्वे पोलिसांनी जप्त केला.

याप्रकरणी मुंबई सेंट्रल रेल्वे पोलीस ठाण्यात अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ व भारतीय दंड संहिता अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून या पान मसाल्याचा मालकाचा व वाहतूक करणाऱ्या अज्ञात आरोपीचा शोध सुरू आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

Source: https://www.loksatta.com/mumbai/mumbai-prohibited-paan-masala-worth-rs-7-lakh-seized-mumbai-print-news-msr-87-2999933/