मुंबई बातम्या

धोकादायक इमारतींना मुंबई महापालिकेच्या नोटिसा! – MahaMTB

मुंबई : ‘मुंबई महानगरपालिका पावसाळ्यापूर्वी दरवर्षी अनेक धोकादायक इमारतींना नोटिसा पाठवते. पण केवळ नोटीस पाठवली म्हणजे त्यांची जबाबदारी संपली का, हा प्रश्न उपस्थित करण्यामागचे कारण म्हणजे, कुर्ल्यामधील नाईक म्युनिसिपल सोसायटीमधील एक इमारत नुकतीच कोसळली आणि अनेकांना आपले जीव गमवावे लागले. रात्री ११.३०च्या दरम्यान कोसळलेल्या या इमारतीमुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. नोटीस पाठवून मुंबई महापालिका स्वतःच्या जबाबदारीतून दूर होण्याचा प्रयत्न करत आहे का,’ असा प्रश्न सर्वसामान्यांच्या मनात यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.

ही इमारत धोकादायक असल्याची नोटीस पूर्वीच पाठवली असल्याचे मुंबई महापालिकेकडून सांगण्यात येत आहे. परंतु, या इमारतीमध्ये राहणारे ९५ टक्के रहिवासी हे भाडेतत्त्वावर येथे राहत होते. तसेच, ही इमारत धोकादायक आहे, असे सांगण्यात आलेले असतानाही येथील घरमालक घरे भाडेतत्त्वावर राहण्यास देत होते. मुंबई महापालिकेने वेळीच याकडे लक्ष दिले असते, तर या दुर्घटनेत जीवितहानी झालीच नसती, असे मत येथील स्थानिकांनी व्यक्त केले आहे.

‘म्हाडा’ प्राधिकरणातील मुंबई मंडळाच्या अखत्यारितील १४ हजारांहून अधिक उपकरप्राप्त इमारतींपैकी ९० टक्के इमारती या धोकादायक आहेत. पालिकेकडून धोकादायक, अति-धोकादायक इमारतींना नोटीस देणे, कायदेशीर कारवाई करणे, इमारतींचा वीजपुरवठाबंद करणे अशा कारवाई करण्यात येतात. परंतु, धोकादायक इमारतीतील नागरिकांना पर्यायी व तात्पुरती स्वरूपात घरे मिळत नाहीत, ही मुख्य समस्या स्थानिकांपुढे उभी राहते. पालिकेकडून पावसाळ्यापूर्वी धोकादायक इमारतींना नोटिसा बजावण्यात येतात. परंतु, अनेक कुटुंबांची आर्थिक परिस्थिती ही तितकी चांगली नसते. तेव्हा ऐनवेळी नोटीस आल्यावर स्थानिकांनी जायचे कुठे? आर्थिक परिस्थितीमुळे धोकादायक इमारतींमधून लगेच स्थलांतर करणेही शक्य नसते. एकदा आपण स्थलांतर केले, तर आपल्याला पुन्हा आपल्या घरात राहण्यास मिळेल, या आशेवर अनेक नागरिक अजूनही मुंबईतील विविध भागांतील संक्रमण शिबिरांमध्ये राहत आहेत.

मुंबईतील धोकादायक इमारतींचा आढावा

 

धोकादायक इमारती – ४६२

पडलेल्या इमारती – १३६

न्यायालयीन प्रकरणात अडकलेल्या इमारती – १३२

अद्याप धोकादायक अवस्थेत असलेल्या इमारती – ३०८

रिकाम्या करण्यात आलेल्या इमारती – १२०

दुरूस्त करण्यात आलेल्या इमारती – १८

रहिवासी राहत असलेल्या एकूण इमारती – १८७

न्यायालयीन प्रकरणात अडकलेल्या इमारती – १३२

वीज व जलजोडणी खंडित करण्यात आलेल्या इमारती – ५०

आर्थिक मदत, पण जाणार कुठे?

सोमवारी रात्री ११.३०च्या दरम्यान आमची इमारत कोसळली. आम्ही येथे भाड्याने राहत होतो. आम्ही दुसर्‍याच दिवशी सकाळी आमची खोली खाली करणार होतो. पण, त्यापूर्वीच रात्री आम्ही आमचे सर्व गमावले. ज्यांनी यामध्ये आपले जीव गमावले आहेत व जे जखमी आहेत, त्यांना आर्थिक मदत करण्याची घोषणा सरकारने केली. परंतु, आमच्यासारख्या नुकसान झालेल्यांनी कुठे जायचे?

– अप्रुका भाऊसाहेब क्षेत्रे, स्थानिक

Source: https://www.mahamtb.com/Encyc/2022/7/1/Notice-of-Mumbai-Municipal-Corporation-to-dangerous-buildings.html