मुंबई बातम्या

मुंबई थोडक्‍यात – Sakal

मुंबई थोडक्‍यात

मुंबई
sakal_logo

By

दादरमध्ये चादर वाटप
प्रभादेवी (बातमीदार) : सामाजिक जाणिवेतून सेवा सुशासन व गरीब कल्याण अंतर्गत खापरीदेव रहिवाशी येथील ३०० महिलांना मोफत चादर वाटप करण्यात आले. भारतीय जनता पक्षाचे मुंबई सचिव सचिन शिंदे यांच्या पुढाकारातून खापरीदेव रहिवाशी संघ यांच्या सहकार्याने गरीब महिलांना चादरी वाटण्यात आल्या. यावेळी कोकण विकास आघाडीचे जिल्‍हाध्यक्ष विशाल तोडणकर, खापरीदेव रहिवाशी संघाचे अमित घाडीगावकर, दर्शन सुर्वे, नारायण पवार आदी उपस्थित होते. आगामी येणाऱ्या काळात महिलांसाठी व मुलांसाठी विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे कोकण विकास आघाडीचे जिल्हाध्यक्ष विशाल तोडणकर यांनी सांगितले.

भुयारी मार्गात नशापान
धारावी (बातमीदार) : मध्य रेल्वेवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून बाहेर पडण्यासाठी भुयारी मार्ग बनवण्यात आला आहे. या भुयारी मार्गात विविध वस्तूंची विक्री करणारी दुकाने आहेत. दुकानाच्या बाहेर मार्गातच दुकानदार मालाची विक्री करतात. यामुळे पादचाऱ्यांना व प्रवाशांना अडथळ्यांची शर्यत खेळत कसेबसे स्थानक गाठावे लागते. त्यातच भर म्हणून नशापान करणारे व्यसनी मार्गात व्यसन करत असतात. नशा केल्यावर हे व्यसनी इतर लोकांना त्रास देत असतात. त्यातही महिलांना याचा जास्त त्रास सहन करावा लागतो आहे. दिवसेंदिवस याचे प्रमाण वाढत चालले आहे. या त्रासातून सुटका व्हावी अशी मागणी प्रवासी वर्गातून होत आहे.

गोदी कामगारांच्या मागण्यांसाठी एकजुटीने लढा देण्याची गरज – ॲड. एस. के. शेट्ये
शिवडी, ता. २२ (बातमीदार) ः बंदरांमध्‍ये कमी कामगारांमध्ये काम केले जाते. केंद्र सरकारचे धोरण हे खासगीकरण करण्याचे आहे. पेन्शन फंडातील तूट, नवीन कामगार कायदे, द्विपक्षीय वेतन समितीसमोरील जाचक अटी, मागील वेतन करारातील थकबाकी अशी अनेक आव्हाने आज गोदी कामगार चळवळीसमोर आहेत. या व इतर सर्व मागण्यांसाठी आपणास एकजुटीने लढा देण्याची गरज आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ कामगार नेते ॲड. एस. के. शेट्ये यांनी केले आहे. मुंबई पोर्ट प्राधिकरणाच्या गोदी विभागातील कामगारांतर्फे बुधवारी (२२ जून) कुलाबा येथील इंदिरा गोदीत आयोजित सत्कार सोहळ्यात ते बालेत होते. मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियनचे सेक्रेटरी व मुंबई पोर्ट प्राधिकरणाचे नवीन बोर्ड मेंबर दत्ता खसे, ट्रान्सपोर्ट अँड डॉक वर्कर्स युनियनच्या खजिनदार व मुंबई पोर्ट प्राधिकरणाच्या नवीन बोर्ड मेंबर कल्पना देसाई, मुंबई पोर्टचे माजी विश्वस्त सुधाकर अपराज, केरसी पारेख, ट्रॅफिक मॅनेजर आर. एन. शेख यांचा सत्कार सोहळा ॲड. एस. के. शेट्ये यांच्या अध्यक्षतेखाली झाला. पहिल्याच बोर्डाच्या मिटिंगमध्ये दोन्ही बोर्ड मेंबरनी गोदी कामगारांची थकबाकी देण्याची मागणी केली.

भक्ती भवन परिसरातील मार्गांवर कचऱ्याचे ढीग
कुर्ला, ता. २२ (बातमीदार) ः कुर्ला पूर्वेतील भक्ती भवन परिसरातील सिंधी सोसायटी मार्ग नंबर १ वरील गटारातील कचरा पालिकेद्वारा काढण्यात आला. मात्र तो कचरा रस्त्यावर ठेवला गेला आहे. त्या सोबतच रस्त्यावर डेब्रिजचे ढीग पडलेले आहेत. दरम्‍यान, पालिकेचे काम होऊन महिना झाला तरीही रस्त्यावरील डेब्रिज उचलण्यात आलेले नाही, अशी तक्रार नागरिक करीत आहेत. या मार्गावरील काही गटारांना झाकणे नाहीत तर काही गटारांची झाकणे तुटलेली आहेत. पावसाळा सुरू झाला तरी अजूनही पालिका प्रशासनाकडून ठोस पावले उचलली जात नसल्‍याचे दिसून आले आहे. सिंधी सोसायटी मार्ग येथे अनेक सोसायट्या असल्याने येथे हजारो नागरिकांची वर्दळ असते. त्‍यामुळे येथील खुल्या गटारांमुळे अपघात होऊ शकतात, असे नागरिकांचे म्हणणे आहे. पालिकेने हा कचरा आणि डेब्रिजचा ढीग त्वरित उचलावा आणि गटारातील झाकणांची दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिक करीत आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g86647 Txt Mumbai Today

Source: https://www.esakal.com/mumbai/todays-latest-marathi-news-mum22g86647-txt-mumbai-today-20220623092258