मुंबई बातम्या

चिंता वाढली!, मुंबईत रुग्णसंख्या १२०० पार; नव्या बाधितांमध्ये मोठी वाढ – Maharashtra Times

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : नव्या करोनाबाधितांची संख्या सोमवारी कमी झाल्याने काहीसा दिलासा मिळाला असतानाच मंगळवारी पुन्हा उसळी घेतल्याने चिंता वाढली आहे. मुंबईमध्ये करोना रुग्णसंख्येमध्ये झपाट्याने वाढ झाली असून १२००चा टप्पा ओलांडला आहे. मुंबईत १,२४२ करोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून त्यापैकी ९४ टक्के रुग्णांना कोणतीही लक्षणे नाहीत. करोनामुळे ७४ जणांना रुग्णालयात दाखल करावे लागले आहे.

मुंबईमध्ये सर्वाधिक बाधित

ठाणे, नवी मुंबई, पालघर, उल्हासनगर, भिवंडी, मिरा-भाईंदर, वसई-विरार, रायगड, पनवेल, कल्याण-डोंबिवली या मुंबईच्या उपनगरांच्या तुलनेमध्ये मुंबईत सर्वाधिक रुग्णसंख्येची नोंद झाली आहे. मुंबईमध्ये १२४२, ठाणे जिल्हा ३०, ठाणे शहर १२३, नवी मुंबई १०८, केडीएमसीमध्ये २७, उल्हासनगर( पालिका) ४, मिरा-भाईंदर पालिका ५१, पालघर २, वसई-विरार पालिका ३५, रायगड ३२ तर पनवेलमध्ये ३६ रुग्णांची नोंद झाली आहे.

मुंबईची रुग्णस्थिती

लक्षणे नसलेल्या रुग्णांची संख्या – १,१६८

रुग्णालयात दाखल केलेले रुग्ण – ७४

ऑक्सिजन खाटांवरील रुग्ण – १०

करोना आजाराचे बरे झालेले रुग्ण – ५०६

चाचण्यांची संख्या – १७,१४५

मुंबईतील बरे झालेल्या रुग्णांचा दर – ९८ टक्के

३१ मे ते ६ जून पर्यंत करोनावाढीचा दर – ०.०७० टक्के

मुंबईतील रुग्णदुपटीचा दर – ९८६ दिवस

बाधित रुग्ण – १,२४२

जनुकीय तपासणीची गरज

सध्या महाराष्ट्र, केरळ, कर्नाटक आणि दिल्ली येथे करोना रुग्णसंख्या वाढत आहेत. या सर्व रुग्णांच्या शरीरात कोणत्या प्रकारचे विषाणू आहेत त्यांची जनुकीय तपासणी केली जाणे गरजेचे असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. विषाणूचे स्वरूप बदलले आहे का, बीए १,२,४ आणि ५ या व्यतिरिक्त कोणता रुग्ण आढळून येतो का याकडे लक्ष ठेवणे गरजेचे आहे. दुसरी मात्रा न घेणाऱ्या व्यक्तींमधील प्रतिपिंडे कमी झाल्याने त्यांना पुन्हा लागण होऊ शकते. दुसरी, बूस्टर मात्रा घेतल्याने निर्माण होणारी प्रतिकारशक्ती ही सहा ते आठ महिने सुरक्षितता देते, ही बाब लक्षात घ्यायला हवी असे सूक्ष्मजीवशास्त्र अभ्यासक डॉ. माधव साठे यांनी स्पष्ट केले.

राज्यात मंगळवारी १,८८१ नवे रुग्ण

महाराष्ट्रात मंगळवारी एक हजार ८८१ नवीन करोनारुग्णांचे निदान झाले असून, यात मुंबई महापालिका हद्दीतील एक हजार २४२ नवीन करोनाबाधितांचा समावेश आहे. मंगळवारी दिवसभरात ८७८ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले. राज्यात मंगळवारी करोनाबाधित रुग्णाच्या मृत्यूची शून्य नोंद झाली, असे राज्य सरकारच्या आरोग्य विभागामार्फत सांगण्यात आले.

राज्यात आजपर्यंत एकूण ७७ लाख ३९ हजार ८१६ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८.०२ टक्के नोंदविण्यात आले आहे. आत्तापर्यंत तपासण्यात आलेल्या आठ कोटी ११ लाख १२ हजार ९५२ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ७८ लाख ९६ हजार ११४ नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. हे प्रमाण ९.७३ टक्के आहे. राज्यात सद्यस्थितीत एकूण आठ हजार ४३२ रुग्ण उपचाराधीन आहेत. मुंबई महापालिकेच्या हद्दीत मंगळवारी १२४२ नवीन करोनाबाधित रुग्णांचे निदान झाले. मुंबईतील एकूण बाधितांची संख्या १० लाख ७० हजार ८५४वर पोहोचली आहे. मंगळवारी मुंबईत एकाही करोनाबाधित रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली नाही.

Source: https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/coronavirus-update-mumbai-cases/articleshow/92069672.cms