मुंबई बातम्या

Hingoli : हिंगोलीकरांच्या आंदोलनाला यश ; मुंबईसाठी हिंगोली मार्गे रेल्वे सुरू – Sakal

Published on : 22 January 2023, 7:45 am

हिंगोली : मुंबईसाठी हिंगोली मार्गे रेल्वे सुरू करावी, यासाठी हिंगोलीकर मागील अनेक वर्षांपासून सतत मागणी करत आहेत. यासाठी काही दिवसांपूर्वी हिंगोली बंद करून रेल्वे रोको आंदोलन करण्यात आले होते. यावेळी मुंबईसाठी हिंगोली मार्गे रेल्वे सुरू करावी, जालना- छपरा रेल्वे हिंगोली मार्गे वळवावी आदी मागण्या करण्यात आल्या होत्या. आता मुंबईसाठी रेल्वे देण्यात आल्याने हिंगोलीकरांची एक मागणी पूर्ण झाली आहे.

दक्षिण मध्य रेल्वेने प्रवाशांची मागणी लक्षात घेऊन नांदेड येथून लोकमान्य टिळक टर्मिनस (मुंबई) ही रेल्वे नांदेडमार्गे वसमत, हिंगोली, वाशीम, अकोला या रेल्वेच्या आठवड्यातून दोन फेऱ्या करण्याचे ठरविले आहे. या रेल्वेचे वेळापत्रक पुढील प्रमाणे ः रेल्वे क्रमांक ०७४२६ नांदेड ते लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई ही विशेष रेल्वे नांदेड येथून ३० जानेवारी आणि ६, १३, २० आणि २७ फेब्रुवारीला रात्री २१.१५ वाजता सुटेल आणि पूर्णा, वसमत, हिंगोली, वाशीम, अकोला, मलकापूर, भुसावळ,

चाळीसगाव, मनमाड, नाशिक रोड, इगतपुरी, कल्याण मार्गे लोकमान्य टिळक टर्मिनस, मुंबई येथे मंगळवारी दुपारी १३.३० वाजता पोहोचेल. रेल्वे क्रमांक ०७४२७ लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई- नांदेड ही विशेष गाडी लोकमान्य टिळक टर्मिनस, मुंबई येथून ३१ जानेवारी आणि ७, १४, २१ आणि २८ फेब्रुवारीला दुपारी १६.४० वाजता सुटेल आणि कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, मनमाड, चाळीसगाव, भुसावळ, मलकापूर, अकोला, वाशीम, हिंगोली, वसमत, पूर्णा मार्गे नांदेड येथे बुधवारी सकाळी ९.३० वाजता पोहोचेल.

रेल्वे क्रमांक ०७४२८ नांदेड ते लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई ही विशेष गाडी नांदेड येथून २५ जानेवारी आणि १, ८, १५ आणि २२ फेब्रुवारीला रात्री २१.१५ वाजता सुटेल आणि पूर्णा, वसमत, हिंगोली, वाशीम, अकोला, मलकापूर, भुसावळ, चाळीसगाव, मनमाड, नाशिक रोड, इगतपुरी, कल्याण मार्गे लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथे गुरुवारी दुपारी १३.३० वाजता पोहोचेल.

रेल्वे क्रमांक ०७४४२९ लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई- नांदेड ही विशेष रेल्वे लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथून २६ जानेवारी आणि २,९,१६ आणि २३ फेब्रुवारीला दुपारी १६.५५ वाजता सुटेल आणि कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, मनमाड, चाळीसगाव, भुसावळ, मलकापूर, अकोला, वाशीम, हिंगोली, वसमत, पूर्णा मार्गे नांदेड येथे शुक्रवारी सकाळी ०९.०० वाजता पोहोचेल.

वातानुकूलित डब्बे

वरील दोन्ही रेल्वेत वातानुकूलित डब्बे तसेच स्लीपर क्लासचे डब्बे असतील, असे दक्षिण मध्य रेल्वेच्या वतीने कळविण्यात आले आहे.

मागणीला यश आले ः हेमंत पाटील

हिंगोली ः हिंगोलीवरून मुंबईकरिता स्वतंत्र रेल्वे सेवा सुरू करण्यात यावी, यासाठी सातत्याने मागणी लावून धरली होती. आता या मागणीला यश आले आहे. ३० जानेवारीपासून नांदेड- हिंगोली- मुंबई ही रेल्वे धावणार असल्याची माहिती खासदार हेमंत पाटील यांनी दिली आहे. येत्या ३० जानेवारीपासून नियमित वेळेत आठवड्यातून दोन वेळा सदरील रेल्वे धावणार आहे.

खासदार हेमंत पाटील यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विन वैष्णव आणि केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची भेटी घेऊन हिंगोलीहून मुंबईला जाण्यासाठी विशेष रेल्वे सुरु करण्याची मागणी केली होती. या मागणीला अखेर यश आले असून, नागरिकांची गैरसोय दूर झाली असल्याचे त्यांनी सांगितले.

Source: https://news.google.com/__i/rss/rd/articles/CBMiTWh0dHBzOi8vd3d3LmVzYWthbC5jb20vbWFyYXRod2FkYS9oaW5nb2xpLW11bWJhaS1yYWlsd2F5cy1zdGFydC1zdWNjZXNzLXJzbjkz0gFRaHR0cHM6Ly93d3cuZXNha2FsLmNvbS9hbXAvbWFyYXRod2FkYS9oaW5nb2xpLW11bWJhaS1yYWlsd2F5cy1zdGFydC1zdWNjZXNzLXJzbjkz?oc=5