मुंबई बातम्या

देशातील सर्वांत महाग इंधन मुंबई, महाराष्ट्रात; सर्वाधिक व्हॅटमुळे ग्राहकांच्या खिशाला चाप – Maharashtra Times

म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई : राज्य सरकारचा व्हॅट सर्वाधिक असल्याने मुंबई व महाराष्ट्रात इंधन (पेट्रोल व डिझेल) देशातील इतर राज्यांच्या तुलनेमध्ये महाग आहे. मुंबई व महाराष्ट्र वगळता देशात सर्वत्र पेट्रोल हे सरासरी १०९, तर डिझेल ९५ रुपये प्रतिलिटरच्या खाली आहे.

केंद्र सरकारने काही दिवसांपूर्वी उत्पादन शुल्क कपात केल्यावर पेट्रोल सुमारे ९ रुपये प्रतिलिटरने स्वस्त झाले. त्यानंतर राज्य सरकारने पेट्रोलवरील व्हॅट सुमारे २.०४ रुपये कमी करण्याची घोषणा केली. प्रत्यक्षात मात्र हे दर कमी झालेच नसल्याची स्थिती असताना आता मुंबई आणि महाराष्ट्रातील पेट्रोल व डिझेल देशात सर्वांत महाग असल्याचे वास्तव समोर आले आहे. यासंबंधीच्या माहितीनुसार, देशातील २० राज्ये किंवा केंद्रशासित प्रदेशातील पेट्रोलचा सरासरी दर १०० रुपये किंवा त्याहून कमी आहे. १२ राज्यांमध्ये तो १०० ते ११० रुपयांदरम्यान आहे. महाराष्ट्रात पेट्रोलचा सरसरी दर १११ ते ११२ रुपये प्रतिलिटर आहे. हीच स्थिती डिझेलबाबत आहे. देशातील २० राज्ये किंवा केंद्रशासित प्रदेशातील डिझेलचा सरासरी दर ८० ते ९० रुपयांदरम्यान आहे. ११ राज्यांमध्ये हा दर ९० ते ९५ रुपये प्रतिलिटरदरम्यान आहे. राज्यात मात्र डिझेल सरासरी ९६ ते ९७ रुपये प्रतिलिटर आहे.

१४ शहरांत मुंबई सर्वात महाग

देशातील १४ प्रमुख शहरांच्या तुलनेमध्ये मुंबईत पेट्रोल १११.३५, तर डिझेल ९७.२८ रुपये प्रतिलिटर आहे. सर्वांत स्वस्त पेट्रोल चंडीगड येथे असून, तेथे पेट्रोल ९७.२० रुपये प्रति लिटरने मिळते तर डिझेल ८४.२६ रुपये प्रतिलिटर आहे.

Source: https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/petrol-diesel-price-in-mumbai-maharashtra/articleshow/91799866.cms