मुंबई बातम्या

मुंबई : रेल्वे रुळांवर ४२ जणांनी केली आत्महत्या – Times Now Marathi

मुंबई : रेल्वे रुळांवर ४२ जणांनी केली आत्महत्या& 

थोडं पण कामाचं

  • मुंबई : रेल्वे रुळांवर ४२ जणांनी केली आत्महत्या
  • जानेवारी ते डिसेंबर २०२० या कालावधीत मुंबईत रेल्वे रुळांवर २७ जणांनी आत्महत्या केली
  • जानेवारी ते सप्टेंबर २०२१ या नऊ महिन्यांच्या कालावधीत मुंबईत रेल्वे रुळांवर ४२ जणांनी आत्महत्या केली

मुंबईः जानेवारी ते सप्टेंबर २०२१ या नऊ महिन्यांच्या कालावधीत मुंबईत रेल्वे रुळांवर ४२ जणांनी आत्महत्या केली. याआधी जानेवारी ते डिसेंबर २०२० या कालावधीत मुंबईत रेल्वे रुळांवर २७ जणांनी आत्महत्या केली होती. यंदाच्या वर्षी अवघ्या नऊ महिन्यांत मागच्या वर्षीच्या तुलनेत रेल्वे रुळांवर जास्त आत्महत्या झाल्या. प्रामुख्याने बेरोजगार असल्यामुळे अथवा कर्जाचे ओझे वाढल्यामुळे निर्माण झालेल्या आर्थिक अडचणी अथवा कौटुंबिक कलहामुळे त्रस्त होऊन रेल्वे रुळांवर आत्महत्या करण्याचे प्रमाण जास्त आहे. Mumbai : 42 commit suicide on railway tracks

वेगाने येणारी रेल्वे जवळ येताच रुळावर जाऊन आयुष्य संपवण्याचे प्रकार वाढत आहेत. कोरोना संकटामुळे २०१९-२० दरम्यान अनेकांनी नोकऱ्या गमावल्या. अनेकांच्या पगारात कपात झाली. असंख्य कुटुंबांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागले. आपत्कालीन आणि अत्यावश्यक सेवा वगळता अनेक सेवा दीर्घकाळ ठप्प होत्या. लॉकडाऊन सुरू होते. या परिस्थितीमुळे अनेकांच्या आर्थिक अडचणी वाढल्या. पण या कालावधीत आत्महत्या कमी झाल्या. 

घरातील सर्व सदस्य घरातच असल्यामुळे संवादातून आणि एकमेकांच्या सहकार्याने मार्ग काढणे अनेकांना जमले असावे. यामुळेच आत्महत्या कमी झाल्या. याउलट आता कोरोना नियंत्रणात आहे, दैनंदिन कारभार सुरळीत होत आहेत. अशावेळी आत्महत्या वाढल्या आहेत. कामाच्या धबडग्यात तुटलेला संवाद आत्महत्यांचे मुख्य कारण आहे; असे मत मानसोपचार तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. 

रेल्वे खाली जीव दिला की स्वतःपुरते प्रश्न सुटले तरी इतरांपुढे आणखी गंभीर प्रश्न निर्माण होऊ शकतात. यामुळे चर्चेतून मार्ग काढणे आणि आव्हानांशी लढत वाटचाल सुरू ठेवणे हिताचे आहे. आत्महत्या हा मार्ग नाही हा विचार अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. यासाठी शिक्षण संस्था, कार्यालयीन कामकाजाची ठिकाणं अशा ठिकाणी मानसोपचार तज्ज्ञांची नेमणूक करणे हा एक चांगला उपाय असू शकतो; असे मत मानसोपचार तज्ज्ञांनी व्यक्त केले.

श्वासावर नियंत्रण ठेवण्याचे व्यायाम प्रकार, ध्यानधारणा अशा प्रकारच्या कार्यक्रमांचे आयोजन शिक्षण संस्था, कार्यालयीन कामकाजाची ठिकाणं या ठिकाणी नियमित झाले तसेच नागरिकांना चर्चेतून प्रश्न सोडवणे हिताचे असल्याचे पटवून दिले तर आत्महत्यांचे प्रमाण कमी करणे शक्य होईल; असेही मत मानसोपचार तज्ज्ञांनी व्यक्त केले.

बातमीची भावकी

Source: https://www.timesnowmarathi.com/india-news-international/article/mumbai-42-commit-suicide-on-railway-tracks/369145