मुंबई बातम्या

सोमय्या हल्ला प्रकरण : माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांना मुंबई पोलिसांकडून अटक आणि सुटका – Maharashtra Times

मुंबई : मुंबईचे माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर (Vishwanath Mahadeshwar) यांना पोलिसांनी अटक केली आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या हल्ला प्रकरणात त्यांना अटक केली आहे. खार पोलिसांनी आज साडे चार वाजण्याच्या सुमारास महाडेश्वर यांना अटक केली.

किरीट सोमय्या यांनी वांद्रे पोलिसांकडे हल्लाप्रकरणाचा जबाब नोंदवला होता. त्यानुसार वांद्रे पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. अधिकच्या तपासासाठी हा गुन्हा खार पोलिसांकडे वर्ग केला होता. खार पोलिस ठाण्याच्या अगदी गेटवर सोमय्यांवर हल्ला झाला होता. या हल्ल्याच्या मागील सूत्रधार कोण,हे शोधण्यासाठी पोलिसांवर मोठा दबाव होता. अखेर सोमय्या यांच्या हल्ला प्रकरणात महाडेश्वर यांना अटक केली आहे.

सोमय्या हल्ला प्रकरण

अपक्ष आमदार रवी राणा आणि अपक्ष खासदार नवनीत राणा यांची भेट घेण्यासाठी २३ एप्रिल रोजी भाजप नेते किरीट सोमय्या खार पोलीस ठाण्यात गेले होते. किरीट सोमय्या खार पोलीस ठाण्यात गेल्याने शिवसैनिक आक्रमक झाले होते. यावेळी शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी केली. शिवसैनिकांना बाजूला करुन किरीट सोमय्यांची गाडी तिथून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, यादरम्यान एका शिवसैनिकांनं गाडीवर दगड भिरकावल्याने गाडीची काच फुटली. किरीट सोमय्या या घटनेत किरकोळ जखमी झाले. त्यांच्या चेहऱ्याला थोडीशी दुखापत झाली.

हल्ल्यावेळी शिवसैनिकांसोबत विश्वनाथ महाडेश्वर देखील उपस्थित होते, असा आरोप झाला. सोमय्या यांच्या एफआयआरमध्ये महाडेश्वर यांचं देखीव नाव होतं. अखेर खार पोलिसांनी आज महाडेश्वरांना अटक केलं.

विश्वनाथ महाडेश्वर कोण आहेत?

  • विश्वनाथ महाडेश्वर कट्टर शिवसैनिक आहेत
  • मुंबईचे माजी महापौर राहिले आहेत
  • २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला

Source: https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/vishwanath-mahadeshwar-arrested-by-mumbai-khar-police-in-bjp-kirit-somaiya-attack-case/articleshow/91075387.cms