मुंबई बातम्या

माझा पोर्टफोलिओ : प्रतिष्ठित वाडिया घराणे, दीडशे वर्षांचा वारसा – Loksatta

अजय वाळिंबे

वर्ष १८६३ मध्ये स्थापन झालेली बॉम्बे बर्मा ट्रेिडग कॉर्पोरेशन लिमिटेड (बीबीटीसीएल) ही वाडिया समूहाची एक प्रमुख कंपनी आहे. मुळात बीबीटीसीएलची स्थापना विल्यम वॉलेसचा सागवान व्यवसाय करण्यासाठी सार्वजनिक कंपनी म्हणून करण्यात आली होती आणि ती देशांतर्गत मागण्या पूर्ण करत होती. नंतर १९१३ मध्ये बीबीटीसीएलने दक्षिण भारतातील चहाच्या मळय़ात गुंतवणूक केली आणि ती चहाच्या व्यवसायाकडे वळली. सध्या कंपनी चहा, कॉफी, इतर वृक्षारोपण उत्पादने, बिस्किटे, दुग्धजन्य पदार्थ, ऑटो इलेक्ट्रिक आणि व्हाईट गुड्स, फलोत्पादन, आरोग्यसेवा उत्पादने, दंत निगा, ऑर्थोपेडिक आणि ऑप्थॅल्मिक उत्पादने या विविध व्यवसायांमध्ये आहे.

बीबीटीसीएलच्या चहा व्यवसायात चहाचे उत्पादन आणि व्यापार यांचा समावेश होतो. बीबीटीसीएलकडे पारंपरिक आणि सेंद्रिय अशा दोन्ही प्रकारच्या चहाच्या विविध प्रकारांचा पोर्टफोलिओ आहे. कंपनीचा ओथू – सिंगमपट्टी इस्टेट येथे ब्लॅक आणि ग्रीन या दोन्ही प्रकारचा सेंद्रिय चहा तयार करण्यासाठी वेगळा कारखाना आहे. ओथू टी इस्टेट दरवर्षी अंदाजे १० लाख किलो सेंद्रिय चहाचे उत्पादन करते. कंपनीचा सेंद्रिय चहा खूप लोकप्रिय आहे आणि त्याला जगभरात मागणी आहे. आर्थिक वर्ष २०२४ पर्यंत सेंद्रिय चहासाठी लागवडीखालील क्षेत्र २७५ हेक्टरवरून ९५९ हेक्टपर्यंत वाढविण्याचे कंपनीचे नियोजन आहे.

कंपनीची चहा आणि कॉफीसाठी तमिळनाडू येथे तीन आणि कर्नाटक आणि टांझानियामध्ये प्रत्येकी एक मालमत्ता आहे. बीबीटीसीएल आपला कॉफी व्यवसाय ऑस्ट्रिया आणि ऑस्ट्रेलियाच्या बाजारपेठांमध्ये वाढवण्याची योजना आखत आहे. सिल्व्हर ओक, अ‍ॅव्होकॅडो, अरेकनट, मोिरगा यांसारख्या मोकळय़ा जागेत वृक्षारोपण किंवा लागवड वाढविण्याचाही विचार करत आहे.

कंपनी देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील चारचाकी, दुचाकी वाहने, एटीएम पार्ट्स आणि इतर भागांची मागणी पूर्ण करते. सेन्सर्स, पर्ज व्हॉल्व्ह आणि सोलनॉइड असेंब्ली ही काही उत्पादने आहेत जी सेगमेंट तयार करतात आणि विकतात. बीबीटीसीएलचे तमिळनाडू येथे ऑटो इलेक्ट्रिक घटकांच्या निर्मितीसाठी तीन युनिट्स आहेत, तसेच एक कार्यालय मलेशिया येथे आहे.

कंपनी दंत प्रक्रियांमध्ये वापरल्या जाणाऱ्या उत्पादनांची निर्मिती आणि विक्री करते. यांत मुख्यत्वे मिश्रण आणि मिश्र धातु, कृत्रिम आणि सौंदर्याचा पुरवठा, ऑर्थोडोंटिक आणि एंडोडोन्टिक पुरवठा, दंतरोपण आणि संसर्ग नियंत्रण उत्पादने यांचा समावेश आहे. कंपनी उत्तराखंडमधील त्यांच्या प्लांटमध्ये आरोग्य सेवा उत्पादने तयार करते.

कंपनीचे वार्षिक आर्थिक निष्कर्ष अजून जाहीर व्हायचे आहेत. मात्र डिसेंबर २०२१ पर्यंत संपलेल्या तिमाहीसाठी कंपनीने ३,६६२ कोटी रुपयांच्या उलाढालीवर ४९ कोटी रुपयांचा नक्त नफा कमावला आहे. गेल्या आर्थिक वर्षांतील याच कालावधीच्या तुलनेत तो ३० टक्क्यांनी कमी आहे.

दीडशेहून अधिक वर्ष अस्तित्वात असलेल्या बॉम्बे बर्माने आतापर्यंत भागधारकांना भरभरून दिले आहे. कंपनीच्या इतर कंपन्यांतील गुंतवणुकीचा पोर्टफोलियोदेखील मोठा आहे. ९००च्या आसपास उपलब्ध असलेला हा शेअर वर्षभरात २५ टक्के परतावा देऊ शकेल.

सध्याची शेअरबाजारातील अनिश्चितता पाहता प्रत्येक मंदीत तसेच टप्प्याटप्प्याने शेअर खरेदीचे धोरण ठेवावे. 

बॉम्बे बर्मा ट्रेडिंग कार्पोरेशन लिमिटेड

(बीएसई कोड – ५०१४२५)

शुक्रवारचा बंद भाव :            रु. ९६६/-

वर्षभरातील उच्चांक/ नीचांक :     रु. १,४२५ / ८८०

बाजार भांडवल :               रु. ६,७४० कोटी

भरणा झालेले भागभांडवल :      रु. १३.९५ कोटी

शेअर होल्डिंग पॅटर्न (%)

प्रवर्तक                       ६५.९३   

परदेशी गुंतवणूकदार             ७.१८   

बँक/ म्यु. फंड/ सरकार          १.१५   

इतर/ जनता                   २५.७४

संक्षिप्त विवरण

* शेअर गट           : स्मॉल कॅप

* प्रवर्तक         :    वाडिया समूह

* व्यवसाय क्षेत्र :      ट्रेडिंग, विविध व्यवसाय

* पुस्तकी मूल्य :            रु. ८१४

* दर्शनी मूल्य         :      रु. २/-

* गतवर्षीचा लाभांश :         ६० %

शेअर शिफारसीचे निकष

*  प्रति समभाग उत्पन्न :      रु. ५४.४३

*  किंमत उत्पन्न गुणोत्तर :        १७.७

*  समग्र किंमत उत्पन्न गुणोत्तर :   ४७.९

*  डेट इक्विटी गुणोत्तर :             ०.८५ 

*  इंटरेस्ट कव्हरेज गुणोत्तर :          ९.१५

*  रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉइड :      २९.८

*  बीटा :                        ०.९

सूचना : १. प्रस्तुत लेखामध्ये सुचविलेल्या कंपनीच्या शेअर्समध्ये लेखकाची वा त्याच्या जवळच्या नातेवाईकांची (उपलब्ध माहितीप्रमाणे) कुठलीही गुंतवणूक नाही किंवा असल्यास ती कंपनीच्या भरणा झालेल्या भाग भांडवलाच्या एक टक्क्यापेक्षा कमी आहे. तसेच सुचविलेल्या कंपनीशी लेखकाचा कुठलाही संबंध नसून त्याने कंपनीकडून कुठलेही मानधन अथवा भेटवस्तू घेतलेली नाही. २. लेखात सुचविलेल्या कंपनीचे संशोधन हे वाचकांच्या महितीसाठी असून, प्रत्यक्ष कंपनीच्या शेअरमधील गुंतवणूक वाचकांनी स्वत:च्या जोखमीवर वा सल्लागाराच्या सल्ल्याने करावी.

Source: https://www.loksatta.com/arthvrutant/bombay-burmah-trading-corporation-limited-company-profile-zws-70-2901464/