मुंबई बातम्या

मुंबई इंडियन्सच्या पराभवात व्हिलन ठरलेला हा ललित यादव नेमका आहे तरी कोण, जाणून घ्या… – Maharashtra Times

मुंबई : पहिल्याच सामन्यात मुंबई विजयाचा झेंडा फटकवणार, असे दिसत होते. कारण मुंबईने १७८ धावांचे आव्हान दिल्यावर दिल्लीची ५ बाद ७२ अशी बिकट अवस्था केली होती. त्यावेळी रोहित शर्माचा मुंबई इंडियन्सचा संघ विजयाचे स्वप्न पाहत होता. पण मुंबईच्या स्वप्नांचा चुराडा यावेळी केला तो दिल्लीच्या ललित यादवने. मुंबई इंडियन्सच्या पराभवानंतर ललित यादव हा चांगलाच चर्चेत आला आहे.
हा ललित यादव आहे तरी कोण, पाहा…
दिल्लीचा कर्णधार रिषभ पंत यावेळी फक्त एकच धाव करून बाद झाला, त्यावेळी दिल्लीची ३ बाद ३२ अशी अवस्था होती. त्यानंतरही मुंबई इंडियन्सचा संघ दिल्लीला धक्के देत होता. मुंबई इंडियन्सने दिल्लीच्या संघाची ५ बाद ७२ अशी वाईट अवस्था केली होती. त्यानंतर आता दिल्लीचा संघ काही हा सामना जिंकणार नाही, असे बऱ्याच चाहत्यांना वाटत होते. पण यावेळी सामन्यात मोठा उलटफेर केला तो ललित यादवने. ललितने यावेळी ३८ चेंडूंचा सामना केला आणि चार चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर त्याने नाबाद ४८ धावांची खेळी साकारली. पण सर्वात महत्वाचे म्हणजे तो अखेरपर्यंत खेळपट्टीवर पाय रोवून उभा होता. ललितला यावेळी अक्षर पटेलची चांगली साथ मिळाली. ललित आणि अक्षर यांनी यावेळी सातव्या विकेटसाठी ७५ धावांची भागीदारी रचली आणि संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. ललितने यापूर्वीही अशीच चमकदार कामगिरी केलेली आहे. त्यामुळेच दिल्ली कॅपिटल्सच्या संघाने आवर्जुन त्याला आपल्या संघात दाखल केले आहे. ललितने आतापर्यंत ४७ ट्वेन्टी-२० सामने खेळले आहेत. या ४७ सामन्यांमध्ये त्याने ६९८ धावा केल्या आहेत तर ३२ विकेट्सही पटकावल्या आहेत. मोक्याच्या क्षणी .चमकदार कामगिरी कशी करायची, हे ललितने या सामन्यातही दाखवून दिले आहे. खासकरून ललितने या सामन्यात जसप्रीत बुमराच्या गोलंदाजीवरही मोठे फटके मारले, त्यामधूनच ललितची गुणवत्ता तुम्हाला समजू शकते. त्यामुळे आता ललित यापुढे दिल्लीच्या संघाला अजून किती विजय मिळवून देतो, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असेल.

Source: https://maharashtratimes.com/sports/cricket/iplt22/news/who-is-this-lalit-yadav-who-pushed-mumbai-indians-to-defeat-in-the-first-match-find-out-/articleshow/90477998.cms