मुंबई बातम्या

मुंबई अंडरवर्ल्डच्या हाती पूर्वांचलमधले शार्प शूटर्स लागले आणि… – BBC.com

  • अनघा पाठक
  • बीबीसी मराठी, पूर्वांचलहून

फोटो स्रोत, Getty Images

“उत्तर प्रदेशातून मुंबईत काम करायला मजूर येतात तर गुन्हेगार येणार नाहीत? मुंबईत सगळ्यांना काम मिळतं.”

“एक असतं साहस आणि एक असतं दुःसाहस. पूर्वांचलमध्ये दुःसाहस करणारे लोक भरमसाठ आहेत. त्यांना साधेसुधे गुन्हे करायला आवडत नाही.”

उत्तर प्रदेश निवडणुकीसाठी वाराणसीमध्ये फिरताना भेटलेल्या एका पत्रकारांनी सांगितलेली ही काही वाक्य.

उत्तर प्रदेशच्या पूर्व भागाला पूर्वांचल असं म्हटलं जातं. हाच पूर्वांचलचा भाग अतिमागास म्हणून ओळखला जातो, इथे अजूनही विकासाची गंगा घरोघरी पोहोचलेली नाही. म्हणूनच कदाचित उत्तर प्रदेशाच्या या भागातून सर्वाधिक स्थलांतर होतं.

इथले जौनपूर, मिर्झापूर, सुलतानपूर, प्रतापगड, भदोई, चंदोली आणि काही अंशी गोरखपूर या सगळ्या भागांमधून जास्तीत जास्त लोक मुंबई महाराष्ट्रात आले आहेत.

कारण? सुविधांचा अभाव, रोजगार नाही आणि गुन्हेगारी. ऐंशीच्या दशकापासून या भागात इतकी गुन्हेगारी वाढली की प्रत्येक भागात एकेक डॉन तयार झाला.

पूर्वांचलचा हा भाग राजकीयदृष्ट्याही अत्यंत महत्त्वाच आहे. इथून 29 खासदार लोकसभेत जातात. ही गोष्ट नमूद करण्यासारखी आहे की पूर्वांचलच्या राजकारणात संघटित माफियांचा दबदबा कायमच राहिलेला आहे.

गुन्हेगारी आणि राजकारण

पूर्व उत्तर प्रदेशच्या गोरखपूर जिल्ह्यातली एक जागा आहे चिल्लूपार. 1985 साली ही जागा देशाच्या राजकारणात एकदम प्रकाशझोतात आली कारण इथून हरिशंकर तिवारी नावाचे अपक्ष उमेदवार जिंकून आले.

आता तुम्ही म्हणाल त्यात काय नवीन… तर हरिशंकर तिवारी तुरुंगात असताना विधानसभेची निवडणूक जिंकले होते. इथूनच भारतीय राजकारणात ‘गुन्हेगारी’ शिरली असं म्हणतात.

राजकारणातली गुन्हेगारी

बरं देशाच्या दूरच्या कोपऱ्यात हे घडत असताना मुंबईतही अंडरवर्ल्ड हातपाय पसरत होतं. सत्तरच्या दशकातून स्मगलिंगमुळे मोठे झालेले डॉन शिस्तबद्धरित्या आपल्या गँग तयार करत होते.

या गँग्सचा आणि पूर्वांचलच्या माफियांचा संबंध आला नसता तर नवल. इथल्या शार्प शुटर्सनी मुंबईचं मुंबईचं अंडरवर्ल्ड कसं बदललं ही त्याचीच गोष्ट.

जेजे हॉस्पिटल हत्याकांड

गेल्या 50 वर्षांत उत्तर प्रदेश आणि बिहारमधून मुंबई-महाराष्ट्राच्या दिशेने स्थलांतर सुरू झालं. पण पूर्वांचलचा माफिया आणि मुंबईच्या अंडरवर्ल्डचा संबंध यायला लागला तो ऐंशीच्या दशकानंतर.

वाराणसीचे जेष्ठ पत्रकार उत्पल पाठक म्हणतात, “त्यावेळेस पूर्वांचलमध्ये गुन्हा करायचा आणि मुंबईत पळून जायचं ही पद्धत इथले गुन्हेगार वापरायचे. मुंबईत अनेक उत्तर भारतीय स्थायिक झाले होते. इतर महाराष्ट्रातही स्थायिक झाले होते. त्यामुळे त्यांना तिथे गेलं की काय करावं हा प्रश्न पडायचा नाही. तिथे त्यांची व्यवस्था करणारं कोणी ना कोणी असायचंच.”

बोलता बोलता ते आणखी एक मुद्दा उलगडून सांगतात की ज्या माणसाची मुळ प्रवृत्ती गुन्हेगारी आहे तो मुंबईत गेला तरी त्या जगाकडेच आकर्षित होणार हे सूर्यप्रकाशाइतकं सत्य आहे.

जेष्ठ पत्रकार उत्पल पाठक

फोटो स्रोत, BBC / Shahid Sheikh

मुंबईच्या अंडरवर्ल्डमध्ये पूर्वांचलचा असणारा हस्तक्षेप एकदम प्रकाशझोतात आला ते जेजे हॉस्पिटल हत्याकांडानंतर.

अरुण गवळी आणि दाऊद इब्राहिम या दोन गुंडांमधलं वैर शिगेला पोचलं होतं. अरुण गवळीच्या शुटर्सने कथितरित्या 1991 साली दाऊदच्या बहिणीचा नवरा इस्माईल पारकरची हत्या केली.

काहीही करून या खूनाचा बदला घ्यायचा असं दाऊद गँगने ठरवलं आणि यातून झालं मुंबईच्या अंडरवर्ल्डमध्ये प्रचंड गाजलेलं जेजे हॉस्पिटल हत्याकांड.

अरुण गवळी गँगचा सदस्य शैलेश हळदणकर जेजे हॉस्पिटलच्या वॉर्ड नंबर 18 मध्ये दाखल उपचारांसाठी दाखल झाला होता.

12 सप्टेंबर 1992 साली जेजे हॉस्पिटलच्या आवारात डॉक्टरच्या वेशात 24 गुंड घुसले. त्यांनी AK-47 बदुंकांनी गोळीबार केला.

असं म्हणतात की या प्रकरणी पूर्वांचलचे माफिया ब्रजेश सिंह आणि सुभाष ठाकूर यांचा हात होता. ब्रजेश ठाकूर यांना या प्रकरणी अटकही झाली होती पण नंतर कोर्टाने त्यांची सुटका केली. सुभाष ठाकूरला शिक्षा झाली होती.

पूर्वांचलचे माफिया ब्रजेश सिंह

या प्रकरणात पहिल्यांदा उत्तर प्रदेशचे माफिया आणि मुंबईचं अंडरवर्ल्ड यांचं नात समोर आलं.

उत्पल पाठक म्हणतात, “एक असतं साहस आणि एक असतं दुःसाहस. पूर्वांचलमध्ये दुःसाहस करणारे लोक भरमसाठ आहेत. त्यांना साधेसुधे गुन्हे करायला आवडत नाही. जेजे हत्याकांड तरी काय होतं? दुःसाहसच होतं. कोणी विचार केला असता की डॉक्टरच्या वेशात, स्टेथोस्कोप घेऊन जाऊन AK-47 सेव्हनने हजार-पाचशे गोळ्या झाडायच्या आणि तिसऱ्या मजल्यावरून खाली उडी मारून पळून जायचं. तेही फक्त एका माणसाला मारायला. हे अति करणं पूर्वांचलचं वैशिष्ट्य होतं. मुंबई अंडरवर्ल्डला लक्षात आलं की आपल्या हातात गुन्हेगारांची नवी खाण लागली आहे ज्यांचा वापर आपल्याला हवा तसा करता येईल.”

मागणी तसा पुरवठा

जेजे हत्याकांडानंतर उत्तर प्रदेशातल्या प्रत्येक गुन्हेगाराला असा गुन्हा करायचा होता. याचं कारण पूर्वांचलच्या लोकांच्या मानसिकतेत आहे.

इथल्या माफियांना इथल्या अनेकांनी डोक्यावर घेतलं. त्यांच्या लेखी ते ‘गरिबांचे मसिहा, रॉबीनहूड’ ठरले. हाताला काम नाही, दोन वेळेच्या जेवणाची भ्रांत, शिक्षण आणि इतर सोईसुविधांपासून कित्येक मैल दूर असणाऱ्या इथल्या तरूणांसाठी हे गुन्हेगार हिरो ठरले.

म्हणूनच कदाचित पूर्वांचलच्या राजकारणात माफियांचा दबदबा आजही कायम आहेत. अनेक लहान-मोठ्या निवडणुकांमध्ये लोक त्यांना भरघोस मतांनी निवडून देतात आणि त्यांची लोकप्रियता पाहून यूपीतले सगळेच पक्ष त्यांना तिकीटही देतात.

तेव्हापासून आतापर्यंत मुंबई, महाराष्ट्र, इतकंच कशाला, गुजरात, बंगळुरु कुठेही झालेले मोठे शूटआऊट काढून पाहा तुम्हाला कोणता ना कोणाता उत्तर प्रदेश अँगल सापडेलच असंही उत्पल ठामपणे सांगतात.

जसं जसं 2000 चं दशक उजाडलं मुंबईच्या गुन्हेगारी विश्वात एक नवी सिस्टिम आली हँडलर्सची.

हे हँडलर्स कोण याबद्दल उत्पल म्हणतात, “हे लोक स्वतः गुन्हेगार नव्हते. पण ज्यांना गुन्हा करवून घ्यायचा आहे अशा लोकांचा ते पूर्व उत्तर प्रदेशमधल्या लहानमोठ्या गुन्हेगारांशी संपर्क करून द्यायचे. एक प्रकारे गुन्ह्याचे एजंट म्हणा ना.”

2000 च्या दशकात मुंबई पोलिसांचं जाळं मजबूत झालं होतं. त्यांच्याकडे नवीन तंत्रज्ञान आलं. 1993 बॉम्बस्फोटांनंतर पोलिसांनी संघटित गुन्हेगारीच्या मुसक्या आवळायला सुरुवात केली होती. अनेक गुंडांचं कथितरित्या एनकाऊंटर झालं होतं. अशा वेळेस गुन्हेगारांची, शुटर्सची कमतरता भरून काढली ते उत्तर प्रदेशच्या शूटर्सनी.

मुंबई गँगवॉर

फोटो स्रोत, Getty Images

एकतर त्यांचं मुंबई पोलिसांकडे कोणतंही रेकॉर्ड, नाव-गाव काही माहिती नसायचं. ज्यांना गुन्हा करवून घ्यायचा असायचा त्यांना स्थानिक गुंड किंवा शूटर नको असायचा कारण पोलीस त्याला लगेच पकडतील आणि गुन्ह्याचे धागेदोरे त्यांच्या हाती लागतील अशी भीती त्यांना असायची.

तुलनेत उत्तर प्रदेश, विशेषतः पूर्वांचलचे गुन्हेगार आणणं सोपं असायचं. ते गुन्हा करायचे, गोळीबार, खून करून परत उत्तर प्रदेशच्या कुठल्याशा खेड्यात पळून जायचे ते चार चार वर्ष कोणाला दिसायचे नाहीत. पुन्हा दिसायचे ते नव्या गुन्ह्यासाठीच.

असे शूटर्स मुंबई पोलिसांची डोकेदुखी बनले.

महानगरी आणि रत्नागिरी एक्सप्रेसने जायच्या बंदुका

पूर्वांचल आणखी एका गोष्टीसाठी प्रसिद्ध आहे, ते म्हणजे गावठी कट्टे. 1990 चं दशक आणि 2000 चा पूर्वार्धातली काही वर्षं या काळात उत्तर प्रदेशच्या भदोई, मिर्झापूर, चंदोली, सुलतानपूर या भागात बनणारे गावठी कट्टे मुंबईत यायचे.

ते कट्टे वापरून अनेक छोटेमोठे गुन्हे व्हायचे. या देशी बंदुका मुंबईत यायच्या कशा विचाराल तर त्याच रस्त्याने ज्या रस्त्याने यूपीचे हजारो मजूर मुंबईत दाखल व्हायचे.

वाराणसीहून सुटणारी महानगरी एक्सप्रेस, गोरखपूर ते एलटीटी धावणाऱ्या रत्नागिरी एक्सप्रेस आणि गोदान एक्सप्रेस यात मजूर असायचे, बायका-पोरं असायची, बाचकी-बोचकी असायची आणि असायच्या बंदुका.

मुंबई पोलिस

फोटो स्रोत, Getty Images

“तेव्हा सीएसटीवर इतकं चेकिंग होतं नव्हतं. पण 2000 च्या दशकात जेव्हा स्कॅनर वगैरे सारख्या वस्तू आल्या तेव्हा इथल्या लोकांना कळलं की बॉस जायचं असेल तर सीएसटीला उतरायचं नाही, त्याच्या आधीच्या कुठल्या स्टेशनवर उतरायचं. इगतपुरीला उतरा किंवा इटारसीला उतरा आणि मग टॅक्सीने जा. तुम्ही लक्षात घ्या, या शार्प शूटर्सची एक संपूर्ण सिस्टिम तयार झाली होती,” उत्पल सविस्तर सांगतात.

कुठे उतरायचं, कोणाला भेटायचं, कोणाकडून पैसे घ्यायचे, कुठे आणि कसा गुन्हा करायचा आणि कसं पळून याचं याची पूर्ण सिस्टिम तयार होती आणि तिथे आलेल्या प्रत्येक शुटरला ती फॉलो करावी लागायची.

गुलशनकुमार हत्याकांड

पूर्व उत्तर प्रदेशातले शार्प शूटर्स पुन्हा एकदा चर्चेत आले ते गुलशनकुमार हत्याकांडात. 12 ऑगस्ट 1997 साली टी-सीरिजचे संस्थापक गुलशनकुमार यांची मुंबईत एका मंदिराबाहेर हत्या झाली.

तीन हल्लेखोरांनी त्यांच्यावर 16 गोळ्या झाडल्या होत्या. त्यातच गुलशनकुमार यांचा मृत्यू झाला.

या हत्येच्या मागे दाऊद इब्राहिम गँगचा हात होता असं म्हटलं गेलं.

पवन सिंह हिंदुस्थान या वर्तमानपत्राचे अनेक वर्षं जेष्ठ क्राईम कॉरस्पॉडंट होते. त्यांचा पुर्वांचलच्या गुन्हेगारीवर भरपूर अभ्यास आहे. त्यांनी माझ्याशी बोलताना सांगितलं,

“गुलशनकुमार यांची हत्या करण्यामागे डोकं कोणाचंही असलं तर ट्रिगर दाबणारे होते पूर्वांचलचे शूटर्स.”

ते पुढे म्हणतात, “पूर्वांचलमध्ये जे माफिया होते, त्यांना मुंबईच्या अंडरवर्ल्डमध्ये नवी संधी दिसली. ब्रजेश सिंह, सुभाष ठाकूरसारखे लोक पूर्वांचलमध्ये तर माफिया होतेच, पण त्यांनी मुंबईतही जम बसवला होता. एकीकडे मुंबईच्या वेगवेगळ्या गँगमधले शूटर्स एकतर परदेशात पळून गेले होते, मारले गेले होते किंवा पोलिसांच्या तावडीत होते. तेव्हा पूर्वांचलमधून नवीन नवीन पोरं आणून शार्प शूटर्सची नवी फळी उभी केली.”

पत्रकार पवन सिंह

फोटो स्रोत, BBC / Shahid Sheikh

“मनिषा कोईरालांचे सचिव अजित देवानींचा खून झाला, तो करणारे एकदम नवे मुलं होते. त्यांचा अंडरवर्ल्डशी काहीही संबंध नव्हता. त्यांना खंडणी वसूल करायची होती, त्यांना कोणी पैसे दिले नाहीत, अंडरवर्ल्डमध्ये त्यांना कोणी ओळखत नव्हतं. त्यामुळे त्यांनी अजित देवानींचा खून केला,” पवन सिंह सविस्तर सांगतात.

‘एक गोळी आणि माणूस मेला पाहिजे’

पवन सिंह उत्तर प्रदेशच्या शूटर्सची कार्यपद्धती समजावून सांगतात.

“हे पाहा, जसं चांगलं काम करणाऱ्याला एखादी कंपनी मोठ्या शहरात पाठवते, तसंच पूर्वांचलमध्ये अचूक गोळीबार करणाऱ्याला मुंबईत काम मिळतं,” ते म्हणतात.

हे लोक काम कसं करतात तर दोन मुलं असतात. त्यांच्याकडे पिस्तुल तर असतेच पण एक गावठी कट्टा ‘असू द्यावा’ म्हणून ठेवलेला असतो. गोळी एकाने चालवायची असते, ती पण अशी की माणूस मेलाच पाहिजे. मग दुसऱ्या उरलेल्या गोळ्या चालवायच्या म्हणजे शंकेला जागा नको. पण पहिल्याच्या गोळीने माणूस मेला पाहिजे ही अट. आणि पहिला गोळी चालवत नाही दुसऱ्याने तोवर गोळी चालवायची नाही, म्हणजे समजा पहिल्याला काही अडचण आली तर त्याचं काम दुसरा करू शकेल.

“गुलशनकुमारचा खून झाला तो याच पद्धतीने. ते तर तीन लोक होते. ”

उत्तर प्रदेशाच्या शूटर्सला मुंबईत प्राधान्य मिळतं कारण त्याचा खून करण्यात असलेला हातखंडा.

पवन सिंह सांगतात, “हे लोक जेव्हा पूर्वांचलमध्ये गुन्हे करतात तेव्हा त्यांच्या हातात असतात गावठी कट्टे. त्यांना काय आधुनिक हत्यारं मिळत नाहीत. जे आहे तेच वापरून आपला कार्यभाग साधायचा असतो. गावठी कट्टा वापरणं अवघड असतं, त्यात आपल्याच हातात गोळीचा स्फोट होईल हा धोका असतो. तरीही हे लोक गावठी कट्टे वापरतात.”

“दहा, पंधरा, वीस, शंभर वेळा गावठी कट्टे वापरून वापरून यांचे हात इतके बसलेले असतात की मग ते रिव्हॉल्वर, पिस्तुल काहीही आरामात वापरू शकतात. हे खून करण्यात इतके तरबेज असतात की त्यांना मुंबईत काम मिळतंच, खास बोलावलं जातं.”

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

‘सोपी गोष्ट’ आणि ‘3 गोष्टी’ हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)

Source: https://www.bbc.com/marathi/india-60676673