मुंबई बातम्या

coronavirus in mumbai: मुंबईत करोनारुग्ण पुन्हा १०० च्या आत; सलग सातव्या दिवशी एकही मृत्यू नाही – Maharashtra Times

मुंबई: आज मुंबईत पुन्हा करोनाची (Coronavirus) दैनंदिन रुग्णसंख्या १०० च्या खाली गेली असून आज सलग सातव्या दिवशी एकाही करोना बाधित रुग्णाचा मृत्यू झालेला नसल्याने मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. मुंबई महानगरपालिकेने दिलेल्या माहितीनुसार आज दिवसभरात एकूण ८० नव्या रुग्णांचे निदान झाले असून आज ११८ करोना बाधित बरे होऊन घरी गेले आहेत. आज निदान झालेल्या एकूण ८० रुग्णांपैकी ११ रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर या ११ रुग्णांपैकी एका रुग्णाला ऑक्सिजन बेडवर ठेवण्यात आले आहे. उर्वरीत रुग्णांमध्ये लक्षणे नसल्याकारणाने त्यांना घरीच विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. (mumbai registered 80 new cases in a day with 118 patients recovered and 0 deaths today)

मुंबईतील एकूण बाधितांपैकी आतापर्यंत एकूण १० लाख ३६ हजार ५०७ रुग्ण बरे झाले आहेत. या बरोबरच मुंबईतील रुग्ण बरे होण्याचा दर आहे ९८ टक्के. तसेच मुंबईत आज एकूण ६५० रुग्ण सक्रिय आहेत. तर मुंबईत रुग्ण दुप्पट होण्याचा दर हा ५ हजार ४४१ दिवसांचा आहे. तर मुंबईत २४ फेब्रुवारी ते ०२ मार्च या कालावधीत रुग्णवाढ ०.०१ टक्के इतकी आहे, अशी माहिती मुंबई महापालिकेने दिली आहे.

सध्या मुंबईत एकही इमारत सील करण्यात आलेली नसून सक्रिय कंटेनमेंट झोनही नाहीत. आज नव्याने सापडलेल्या ८० रुग्णांपैकी ११ रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यामुळे मुंबई पालिकेकडील ३५ हजार ८२१ बेड्सपैकी केवळ ६६९ बेडचा वापर करण्यात आला आहे.

मुंबईतील संध्याकाळी ६ वाजेपर्यंतची स्थिती

> २४ तासात बाधित रुग्ण- ८०
> २४ तासात बरे झालेले रुग्ण- ११८
> बरे झालेले एकूण रुग्ण- १०३६५०७
> बरे झालेल्या रुग्णांचा दर-९८%
> एकूण सक्रिय रुग्ण- ६५०
> दुप्पटीचा दर- ५४४१ दिवस
> कोविड वाढीचा दर ( २४ फेब्रुवारी- ०२ मार्च )-०.०१%

Source: https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/coronavirus-see-latest-updates-mumbai-registered-80-new-cases-in-a-day-with-118-patients-recovered-and-0-deaths-today/articleshow/89974833.cms