मुंबई बातम्या

चित्रकार आणि कलेचे इतिहासकार – Maharashtra Times

दीपक घारे

महाराष्ट्रात प्रतिभावंत चित्रकार-शिल्पकारांची मोठी परंपरा आहे. पण चित्रकार आणि दृश्यकलेवरील लेखन दोन्हीही सारख्याच ताकदीने करणारे फारच थोडे. यासोबतच आपण ज्या दृश्यपरंपरेत वाढलो त्याचे आणि समाजाचं काही देणे लागतो याचे भान असलेले आणि स्वनिरपेक्ष कृती करणारे आणखी दुर्मिळ. अशा दुर्मिळ चित्रकार-अभ्यासक-संयोजकांमध्ये बहुळकरांचा समावेश होतो. कलावंताला त्याला पाहिजे तशा कोणत्याही विषयावर काम करण्याचे स्वातंत्र्य असते. पण कलेच्या अभ्यासकाला साऱ्या कलाप्रवाहांकडे आपले पूर्वग्रह दूर ठेवून समग्रपणे पाहावे लागते. बहुळकर बॉम्बे स्कूलच्या यथार्थवादी परंपरेतील आणि त्याचाच भाग असलेल्या बॉम्बे रिव्हायव्हलिस्ट स्कूल चळवळीबद्दल आत्मीयता असलेले चित्रकार. पण भारतीय कलेतील यथार्थवादी, आधुनिक, अमूर्त, उत्तर आधुनिक आणि लोककला अशा सर्व कलाप्रवाहांचा समन्वय साधण्याचा त्यांच्या लेखनातून त्यांनी प्रयत्न केला. हे कलासंचित सामान्य जनांपर्यंत जाऊन पोहोचले पाहिजे, हे त्यांनी सातत्याने पाहिले.

१० ऑक्टोबर १९५४ मध्ये जन्मलेल्या सुहास बहुळकर यांचे शालेय शिक्षण पुण्यातच झाले. सर जे. जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये १९७०मध्ये त्यांनी प्रवेश घेतला आणि १९७५मध्ये फाइन आर्टमधील पदविका पहिल्या वर्गात प्राप्त केली. चित्रकार म्हणून त्यांची जडणघडण बालवयातच सुरू झाली होती. बहुळकरांचे भाग्य असे की ज्या काळात मध्यमवर्गीय पालक आपल्या मुलाने चित्रकार म्हणून करिअर करावी याबद्दल नाखूश असत. त्या काळात त्यांचे वडील वसंत बहुळकर यांनी मुलाची चित्रकलेची आवड लक्षात घेऊन बहुळकरांमधील चित्रकार जोपासण्याचा आणि वाढवण्याचा ध्यास घेतला. आई-वडिलांच्या प्रोत्साहनामुळे त्यांना बालवयातच बालचित्रकार म्हणून प्रसिद्धी मिळाली. चित्रकाराच्या हस्तकौशल्याबरोबरच त्याची मर्मदृष्टी विकसित झाली पाहिजे हे वडिलांनी ओळखले होते. त्यानुसार त्यांनी एस. एल. हळदणकरांपासून प्रफुल्ला डहाणूकरांपर्यंत अनेक मान्यवर चित्रकारांकडे जाऊन त्यांच्या भेटी घडवून आणल्या. यामुळे जे. जे. मध्ये प्रवेश घ्यायच्या वेळीच बहुळकर यांची पूर्वतयारी झालेली होती.

कलावंताच्या आयुष्यात एक महत्त्वाचे वळण येते ते जेव्हा तो कलेचे उच्चशिक्षण पूर्ण करून स्वतःची शैली शोधू पाहतो तेव्हा. बहुळकर यांच्या बाबतीत हा टप्पा जे. जे.च्या प्रवेशावेळीच आला असणार. पण बहुळकर यांच्या मनात शोधवृत्ती जागृत असल्यामुळे आधीच परिचित असलेले चित्रकारांचे जग त्यांनी अधिक डोळसपणे पाहायला सुरुवात केली. प्रा. शंकर पळशीकर आणि प्रा. बाबुराव सडवेलकर यांच्यामुळे बॉम्बे स्कूलची परंपरा, त्यातील चित्रकारांची बलस्थाने, त्यांच्या मर्यादा आणि कलावंताची नैतिकता असे विविध पैलू त्यांना उलगडत गेले.

चित्रकार म्हणून बहुळकर यांना मान्यता मिळाली ती त्यांच्या अॅकेडेमिक आणि व्यावसायिक व्यक्तिचित्रांमुळे. त्यांची रचनाचित्रे (कॉम्पोझिशन्स) स्मरणरंजनात्मक कथनशैली वापरून केलेली आहेत. पुणे आणि वाई येथील वाडा संस्कृतीचे आणि आधुनिक वर्तमानाचे जसे त्यात मिश्रण आहे तसेच लघुचित्रशैली, रिव्हायव्हलिस्ट शैली, यथार्थवादी शैली यांचेही नाते शोधण्याचा त्यात प्रयत्न आहे. १९९२ ते २००६ या काळात झालेल्या त्यांच्या चित्रप्रदर्शनांमध्ये हे सूत्र विशेषकरून जाणवते. लोकमान्य टिळक, विनोबा यांच्या व्यक्तिचित्रांबद्दल त्यांची प्रसिद्धी असली तरी जुन्या-नव्याचा मेळ साधणाऱ्या दोन व्यक्तिचित्रांचा उल्लेख करायला हवा. १९८८ मधील ‘इन सर्च ऑफ आयडेंटिटी’ हे एका तरुणाचे व्यक्तिचित्र प्रातिनिधिक आहे. रचनेच्या दृष्टीने त्यात बॉम्बे स्कूलची परंपरा आणि आधुनिकता यांचा मिलाफ आहे. बहुळकर यांच्या मनातील आयडेंटिटी क्राइसिस (कलेमधला) त्यात सुप्तपणे आलेला आहे. दुसरे भवरलाल जैन यांचे अजिंठ्याची पार्श्वभूमी असलेले व्यक्तिचित्र उघडउघड व्यावसायिक पण बॉम्बे स्कूल आणि अजिंठा नातं नव्याने प्रस्थापित करणारे आहे.

बहुळकर यांचा आयडेंटिटीचा आत्मशोध शेवटी बॉम्बे स्कूल आणि रिव्हायव्हलिस्ट चळवळीच्या केंद्राभोवती स्थिरावला. त्या काळात आधुनिक आणि अमूर्त कलाप्रवाहाचा गाजावाजा असूनही हे घडले, त्याला इतरही काही कारणे होती. १९७५ ते १९९५ या काळात बहुळकर जे. जे. मध्ये प्राध्यापक म्हणून काम करत होते. बाबुराव सडवेलकर यांच्यामुळे १९७६ ते १९९३ या काळात जे. जे. मधील ऐतिहासिक चित्रसंग्रहाची निवड व जतन करण्यात बहुळकर सहभागी झाले आणि पुढे या चित्रांचा व चित्रकारांचा अभ्यास हे एक मिशन बनले ते आजतागायत. त्यात त्यांच्या पत्नी साधना बहुळकर प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे सहभागी झाल्या.

१९९५ मध्ये स्वेच्छानिवृत्ती घेतल्यानंतर बहुळकरांनी चित्रनिर्मिती तर केलीच. पण इतर अनेक प्रकल्प त्यांनी यशस्वीपणे पूर्ण केले. सामाजिक जीवनात कलावंताची काही ठोस भूमिका असावी असे मानणाऱ्या बहुळकरांनी लोकमान्य टिळक म्युझियम पुणे; स्वा. सावरकर स्मारक मुंबई अशा अनेक ठिकाणी सहकाऱ्यांच्या मदतीने उठावशिल्प असलेल्या भित्तिचित्रांसह प्रकल्प पूर्ण केले. त्यापैकी नानाजी देशमुख यांचा चित्रकूट येथील ‘रामदर्शन’ प्रकल्प सर्वात महत्त्वाचा.

बहुळकरांनी जहांगीर आर्ट गॅलरीने भरवलेल्या ‘मास्टरस्ट्रोक्स’ या प्रदर्शनांच्या मालिकेतून विस्मृतीत गेलेल्या बॉम्बे स्कूलच्या चित्रकारांच्या कलाकृती लोकांसमोर आणल्या. नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट, मुंबई (एन. जी. एम. ए.)चे अध्यक्ष असताना तीन महत्त्वाची प्रदर्शने भरवली – ए. ए. आलमेलकर, म. वि. धुरंधर आणि बॉम्बे आर्ट सोसायटीची १२५ वर्षांची वाटचाल. या निमित्ताने कॅटलॉग आणि ग्रंथरूपाने जे दस्तावेजीकरण घडले ते महत्त्वाचे असूनही उच्चभ्रू कलाजगताने त्याची पुरेशी दखल घेतली नाही, याची बहुळकर यांना खंत आहे. याच काळात त्यांची अनेक पुस्तके प्रकाशित झाली – ‘बॉम्बे स्कूल’ (२०१५), ‘गोपाळ देऊसकर आणि शिल्पकार करमरकर यांची चरित्रे’ (२०१५), ‘चित्रकार दीनानाथ दलाल : चित्र आणि चरित्र’ (२०२२), ‘एम. व्ही. धुरंधर : रोमँटिक रिअॅलिस्ट’ (इंग्रजी).

ज्यामुळे कलाइतिहासकार म्हणून बहुळकर यांचे नाव कायम राहील त्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे नाव ‘दृश्यकला’ चरित्रकोश. २०१३मध्ये हा चरित्रकोश विवेक (हिंदुस्थान प्रकाशन संस्थे)तर्फे प्रकाशित झाला आणि इंग्रजीमध्ये अधिक परिपूर्ण रूपात २०२१मध्ये ‘पंडोल आर्ट गॅलरी’ने तो प्रकाशित केला. दोन्ही ग्रंथ मिळून १२ वर्षे या प्रकल्पाचे काम चालले. महाराष्ट्रातील गेल्या २०० वर्षांमधील कलाप्रवासाचा ३००हून अधिक चित्रकार-शिल्पकार-उपयोजित चित्रकारांच्या नोंदींमधून घेतलेला हा मागोवा आहे. बहुळकर यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अफाट परिश्रम घेतले. बहुळकरांनी आपला अनुभव, अभ्यास, संघटनकौशल्य साऱ्या शक्तीनिशी पणाला लावले होते. संपादक म्हणून दीपक घारे, वसंत सरवटे (मराठीसाठी) तर सुधीर पटवर्धन, दिलीप रानडे (इंग्रजीसाठी) यांनी साहाय्य केले. शंभरएक नोंदलेखक, अनुवादकांची टीम त्यासाठी कार्यरत होती.

बॉम्बे रिव्हायव्हलिस्ट स्कूल या चळवळीवरील त्यांचा एक महत्त्वाचा संशोधनात्मक ग्रंथ प्रकाशनाच्या मार्गावर आहे. आजही अनेक प्रकल्पांच्या योजना त्यांच्या मनात घोळत असतात. बहुळकर यांनी महाराष्ट्रातल्या कलासंचिताचे जे दस्तावेजीकरण केलेले आहे त्याबद्दल येणाऱ्या पिढ्या नक्कीच कृतज्ञ राहतील.

Source: https://maharashtratimes.com/editorial/column/kalthase/suhas-bahulkar-painter-and-historian-of-art/articleshow/89104217.cms