मुंबई बातम्या

मुंबई लोकल, मेल-एक्स्प्रेसमध्येही उभ्याने प्रवास नाही, पण… – Maharashtra Times

म.टा. प्रतिनिधी, मुंबई

‘मुंबई लोकलमध्ये उभ्याने प्रवास करणाऱ्यांना परवानगी नाही’, असे स्पष्ट आदेश नसल्याने सोमवारी गोंधळाची स्थिती निर्माण झाली. रविवारी सायंकाळपासून विविध माध्यमांवर लोकलमधून उभ्याने प्रवास बंदी याबाबतचे वृत्त दाखवण्यात आले. मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतलेल्या निर्णयाचे ‘अधिकृत नोटिफिकेशन’ रविवारी रात्री उशिरा जाहिर झाले.

तत्पूर्वी, मुख्यमंत्री कार्यालयाने प्रसिद्धीपत्रकानुसार, ‘बाहेरगावी जाणाऱ्या रेल्वेमधील सर्वसाधारण (जनरल) डब्यात उभ्याने प्रवासी असू नयेत. तसेच प्रवासी मास्क घालतील याची काळजी रेल्वे प्रशासनाने घ्यायची आहे.’ असे स्पष्ट करण्यात आले. मुख्य सचिवांनी काढलेल्या नियमावलीमध्ये देखील बाहेरगावी जाणाऱ्या गाड्यांचा उल्लेख आहे.

करोनामुळे विशेष गाड्यांतून केवळ तिकीट आरक्षित असलेल्या प्रवाशांनाच रेल्वे प्रवासाची मुभा आहे. या नियमांनुसार रेल्वेतील प्रवासी वाहतूक सुरू आहे. मुंबई लोकलबाबत कोणतेही स्पष्ट नियम जाहीर झालेले नाही. राज्य सरकारने वेळोवेळी दिलेल्या लेखी सूचनांचे मध्य आणि रेल्वे प्रशासनाकडून पालन करण्यात येईल, अशी भूमिका रेल्वे प्रशासनाने घेतली. यामुळे लोकलमधील उभ्याने प्रवास करणाऱ्यांवर बंदी राहणार की त्यांचा प्रवास यापुढेही कायम राहणार हा प्रश्न कडक निर्बंध असतानाही कायम राहणार आहे.

Source: https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/mumbai-local-commuters-have-confused-about-latest-covid-restrictions/articleshow/81923535.cms