मुंबई बातम्या

मुंबई वातावरण : पाकिस्तानातील धुळीच्या वादळाचा मुंबईतल्या हवेवर परिणाम #5मोठ्याबातम्या – BBC News मराठी

फोटो स्रोत, Getty Images

आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्या थोडक्यात पाहूया.

1. पाकिस्तानातील धुळीच्या वादळाचा मुंबईतल्या हवेवर विपरीत परिणाम

पाकिस्तानात निर्माण झालेलं धुळीचं वादळ गुजरातवाटे महाराष्ट्रात पोहोचलंय. उत्तर कोकण आणि मुंबईला याचा मोठा फटका बसताना दिसतो. एबीपी माझानं ही बातमी दिलीय.

या धुळीच्या वादळानं मुंबई आणि परिसरात वातावरण सकाळपासूनच धुरकट बनलेलं आहे.

कालपासून (23 जानेवारी) मुंबईत ढगाळ वातावरण आहे. त्यात आता धुळीचे कण मिसळल्यानं दृष्यमानता अजूनच कमी झालेली आहे.

वातावरणात अचानक झालेल्या या बदलांमुळे नागरिकांमध्ये भीतीचं आणि काहीसं संभ्रमाचं वातावरण आहे.

या धुळीमुळे मानवी जीवनावर काय परिणाम होतात, नागरिकांना काय काळजी घ्यावी लागेल याच्या मार्गदर्शक सूचना प्रशासनानं द्याव्या, अशी मागणी नागरीक करत आहेत.

2. MPSC पूर्वपरीक्षेत पेपरफुटीचाआरोप, MPSC नं दिलं स्पष्टीकरण

नागपुरात एमपीएसची पेपर फुटल्याचा आरोप काही विद्यार्थ्यांनी केला आहे. याबाबत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने आंदोलन देखील केले.

एमपीएससी

फोटो स्रोत, Getty Images

पण, राज्य सेवा पूर्व परीक्षा 2021 चा कुठलाही पेपर फुटला नाही. याबाबतच्या बातम्या चुकीच्या आहेत, असे स्पष्टीकरण महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने दिले आहे. दिव्य मराठीनं ही बातमी दिलीय.

नागपूरमध्ये पेपर फुटल्याचा आरोप अभाविपच्या कार्यकर्त्यांनी केला होता. पेपर फुटल्याचे सांगताना एका विद्यार्थ्याने स्वत:चा पेपरसुद्धा दाखवला होता. दरम्यान, विद्यार्थ्यांनी सील केलेले पेपर फुटल्याचे दिसले, असाही दावा केला होता.

3. कोल्हापुरात बिटकॉईनमधून 78 लाखांच्या फसवणुकीचा प्रकार उघड

कोल्हापूरमध्ये बिटकॉइन या आभासी चलनामध्ये गुंतवणूक करायला सांगून फसवणूक केल्याचा प्रकार समोर आलाय. या प्रकरणी केदार नारायण रानडे या आरोपीविरुद्ध 20 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा आणखी एक गुन्हा रविवारी (23 जानेवारी) दाखल झाला आहे.

यापूर्वी रानडे याच्यासह 6 जणांच्या विरोधामध्ये गेल्या महिन्यामध्ये 58 लाख रुपये फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला होता. लोकसत्तानं ही बातमी दिलीय.

बिटकॉईन, क्रिप्टोकरन्सी, भारत सरकार, अर्थव्यवस्था, पैसा, व्यापार

फोटो स्रोत, Reuters

आरोपी रानडे आणि त्याच्या काही सहकाऱ्यांनी कोल्हापुरातील ताराबाई पार्कमध्ये कार्यालय सुरू केले होते. त्यांनी आभासी चलन गुंतवणूक केल्यास 180 टक्के परतावा देण्याची स्थानिक वृत्तपत्रात जाहिरात केली होती. त्यावर विसंबून राहून काहींनी गुंतवणूक केली होती.

4. एनडीआरएफचं ट्विटर खाते हॅक

एनडीआरएफचं ट्विटर अकाऊंट शनिवारी (23 जानेवारी) रात्री हॅक करण्यात आलं होतं. त्यानंतर रविवारी (24 जानेवारी) ते सुरळितपणे कार्यरत करण्यात आलं आहे. इंडियन एक्स्प्रेसनं ही बातमी दिलीय.

ट्विटर

फोटो स्रोत, Getty Images

एनडीआरएफच्या ट्विटर अकाऊंटवर शनिवारी रात्री 10.45 वाजता सायबर हल्ला करण्यात आला. यानंतर अकाऊंटनरून काही मेसेजेस पोस्ट करण्यात आले, तसंच फोटोही बदलण्यात आला.

हल्ला झाल्यानंतर काही मिनिटांतच तांत्रिक विभागानं हे अकाऊंट पुन्हा सुरळित केल्याचं एनडीआऱएफचे डायरेक्टर जनरल अतुल करवाल यांनी म्हटलं आहे.

याबाबतची तक्रार दिल्ली पोलिसांकडे दाखल केल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.

5. द. आफ्रिकेनं भारताविरुद्धची मालिकी 3-0 फरकानं जिंकली

भारत आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये वनडे सीरीजमधील शेवटच्या सामन्यात द. आफ्रिकेने भारताला पराभूत करत भारतावर क्लीन स्विप विजय मिळवला आहे. टीव्ही 9 मराठीनं ही बातमी दिली आहे.

केपटाऊनच्या न्यूलँडस मैदानावर खेळवण्यात आलेल्या या सामन्यात द. आफ्रिकेने भारतावर 4 धावांनी मात केली.

प्रथम फलंदाजी करताना द. आफ्रिकेने भारतासमोर 288 धावांचं आव्हान दिलं होतं, तर टीम इंडिया 49.2 षटकांमध्ये सर्वबाद 283 धावांपर्यंत मजल मारू शकली.

या विजयासह द. आफ्रिकेने उभय संघांमधील तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका 3-0 अशी जिंकली आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

‘सोपी गोष्ट’ आणि ‘3 गोष्टी’ हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)

Source: https://www.bbc.com/marathi/india-60102303