मुंबई बातम्या

सेल्फ कीटचा वापर ठरतोय धोकादायक, नागरिकांकडून घरीच करोना चाचण्या; आता महापौरांची मोठी घोषणा – Maharashtra Times

हायलाइट्स:

  • कोणत्याही कंपनीचे किट वापरणे योग्य नाही
  • त्यामुळे आपल्याला करोना झाला आहे किंवा नाही, हे खात्रीशीरपणे कळू शकणार नाही

मुंबई: राज्यात दिवसेंदिवस करोना रुग्णांचा आकडा झपाट्याने वाढत असताना आता मुंबईत प्रशासनासमोर नवी अडचण उभी राहिली आहे. करोनाच्या तिसऱ्या लाटेत अनेक नागरिक सेल्फ किटच्या साहाय्याने घरच्या घरीच चाचणी करत असल्याचा प्रकार समोर आला आहे. या नागरिकांना करोना झाला असेल तरी त्याची नोंद होत नाही. हे नागरिक घरीच राहून उपचार घेत आहेत. या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिकेने एक मोठा निर्णय घेतला आहे. महापौर किशोरी पेडणेकर यांनी रविवारी यासंदर्भात माहिती दिली. त्यानुसार आता मुंबईच्या परिसरात सेल्फ कीटवर बंदी घातली जाऊ शकते.

सेल्फ किट उपलब्ध असल्यामुळे अनेक रुग्ण करोना चाचणी करण्यासाठ लॅबमध्ये जात नाहीत. या किटच्या माध्यमातून मिळालेला अहवाल फारसा खात्रीशीर नसतो. नागरिकांनी घरीच चाचण्या केल्यामुळे शहरातील करोनाबाधितांचा खरा आकडा समजत नाही. त्यामुळे नागरिकांनी सेल्फ किटच्या माध्यमातून कोव्हिड टेस्ट न करता लॅबमध्ये जाऊन तपासणी करावी, असे आवाहन महापौर किशोरी पेडणेकर यांनी केले. कोणत्याही कंपनीचे किट वापरणे योग्य नाही. त्यामुळे आपल्याला करोना झाला आहे किंवा नाही, हे खात्रीशीरपणे कळू शकणार नाही. त्यामुळे मी कालच सेल्फ किटवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. पालिकेने शनिवारपासूनच दुकानांमध्ये उपलब्ध असलेल्या सेल्फ किटविरोधात कारवाई सुरु केली आहे. लवकरच मुंबईत सेल्फ कीटवर पूर्णपणे बंदी घालण्याचा प्रस्ताव विचाराधीन असल्याचे किशोरी पेडणेकर यांनी सांगितले.
Coronavirus Restrictions: राज्यातील करोना निर्बंध आणखी कठोर होणार का, राजेश टोपे म्हणाले…
सलून सुरु पण ब्युटी पार्लरवर बंदी का?

राज्यात सलून्स ५० टक्के क्षमतेने सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र, त्याचवेळी राज्य सरकारकडून स्पा आणि ब्युटी पार्लर्स बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या निर्णयावर अनेकांनी आक्षेप घेतला होता. या पार्श्वभूमीवर महापौर किशोरी पेडणेकर यांनी प्रशासनाची बाजू मांडली. सलूनमध्ये केस कापताना न्हावी आणि संबंधित ग्राहकाच तितकासा जवळून संबंध येत नाही. याउलट ब्युटी पार्लर्समध्ये ग्राहक आणि ब्युटीशियन जास्त प्रमाणात संपर्कात येतात. त्यामुळे करोनाचा प्रसार वाढू शकतो, असे तज्ज्ञांचे मत असल्यास त्यामध्ये काही गैर नाही. या सगळ्याविषयी तर्कवितर्क लढवत बसण्यापेक्षा परिस्थिती नियंत्रणात आणून सर्व दैनंदिन व्यवहार पुन्हा अनलॉक करणे अधिक महत्त्वाचे असल्याचे किशोरी पेडणेकर यांनी सांगितले.

Source: https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/mumbai-coronavirus-bmc-will-soon-ban-self-test-covid-kit-says-mayor-kishori-pednekar/articleshow/88790210.cms