मुंबई बातम्या

मुंबई लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर, करोना रुग्णांचा २० हजारांचा टप्पा आजच ओलांडणार? – Maharashtra Times

हायलाइट्स:

  • राज्यातील करोना परिस्थितीने गंभीर स्वरुप धारण केल्यामुळे गुरुवारी राज्य सरकारची महत्त्वाची बैठक पार पडणार असल्याची माहिती समोर येत आहे
  • या बैठकीत राज्यात आगामी तीन ते चार दिवसांत कठोर निर्बंध लागू करण्यासंदर्भात चर्चा होऊ शकते

मुंबई: राज्यातील करोनाचा हॉटस्पॉट झालेल्या मुंबईत सध्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. नववर्ष सुरु होऊन आठवडा उलटायच्या आतमध्येच मुंबईतील परिस्थिती चिंताजनक झाली आहे. सध्या मुंबईत होणाऱ्या एकूण चाचण्यांपैकी चारपैकी एका व्यक्तीला करोनाची लागण होत आहे. मुंबईत १ जानेवारीला करोना रुग्णसंख्या ६३४७ इतकी होती. ३ जानेवारीला हा आकडा ८०८२ इतका झाला होता. तर ५ जानेवारीला म्हणजे बुधवारी हा आकडा थेट १५१६६ इतका झाला होता. त्यामुळे आज मुंबईतील नव्या करोना रुग्णांचा आकडा २० हजारांचा टप्पा ओलांडेल, अशी शक्यता आहे. तसे झाल्यास महापालिका आयुक्त आणि महापौरांनी इशारा दिल्याप्रमाणे मुंबईत लॉकडाऊन लागणार का, हे पाहावे लागेल.

मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल आणि महापौर किशोरी पेडणेकर यांनी नुकताच मुंबईत दिवसाला २० हजार रुग्ण सापडल्यास लॉकडाऊन लावण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर अवघ्या दोन दिवसांतच मुंबईतील करोना रुग्णसंख्या २० हजारांचा टप्पा ओलांडण्याची शक्यता आहे.
Coronavirus: राज्यात करोनाचा उद्रेक, परिस्थिती चिंताजनक; आता शरद पवार उतरणार मैदानात
करोनाच्या भीतीने शेअर बाजारही कोसळला

गेल्या २४ तासांत देशभरात ९० हजार नवे करोना रुग्ण आढळले आहे. करोनाच्या तिसऱ्या लाटेच्या भीतीने गुरुवारी शेअर बाजारातही पडझड होताना दिसली. पुन्हा सरसकट लॉकडाउन लागला तर अर्थव्यवस्थेला ब्रेक लागेल या भीतीने गुंतवणूकदारांनी बाजारात चौफेर विक्रीचा सपाटा लावला आहे. यामुळे आज गुरुवारी बाजार सुरु होताच सेन्सेक्समध्ये तब्बल ६०० अंकांची घसरण झाली. निफ्टी २०० अंकांनी कोसळला असून या पडझडीत गुंतवणूकदारांचे जवळपास एक ते दीड लाख कोटीचे नुकसान झाले आहे.
imageचिंताजनक! करोना वॉरियर्सच आजाराच्या विळख्यात, मुंबईच्या रुग्णालयांतील २३० डॉक्टर्स कोव्हिड पॉझिटिव्ह
लोकल ट्रेनवर निर्बंधांची शक्यता

राज्यातील करोना परिस्थितीने गंभीर स्वरुप धारण केल्यामुळे गुरुवारी राज्य सरकारची महत्त्वाची बैठक पार पडणार असल्याची माहिती समोर येत आहे. या बैठकीत राज्यात आगामी तीन ते चार दिवसांत कठोर निर्बंध लागू करण्यासंदर्भात चर्चा होऊ शकते. अनावश्यक सेवा, रेस्टॉरंट आणि दुकानांच्या वेळेवरही निर्बंध आणले जाऊ शकतात. तसेच मुंबईची लाईफलाईन असलेल्या लोकल ट्रेनच्या प्रवासावरही निर्बंध आणण्याची तयारी सुरु असल्याची चर्चा आहे.

Source: https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/lockdown-in-mumbai-possible-as-omicron-coronavirus-patients-numbers-will-cross-20000-mark/articleshow/88728927.cms