मुंबई बातम्या

Bulli Bai App Row: ‘बुल्लीबाई’ प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई; इंजिनीअरिंगचा विद्यार्थी… – Maharashtra Times

हायलाइट्स:

  • ‘बुल्लीबाई’ प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई.
  • बेंगळुरू येथून २१ वर्षीय तरुणाला घेतले ताब्यात.
  • सिव्हिल इंजिनीअरिंगचा विद्यार्थी असल्याची माहिती.

बेंगळुरू: बुल्लीबाई अ‍ॅपच्या माध्यमातून काही मुस्लिम महिलांची बदनामी केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर याप्रकरणी दिल्ली आणि मुंबई येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून तपासाला वेग आला आहे. मुंबई पोलिसांच्या पथकाने आज बेंगळुरू येथे छापा टाकत एका व्यक्तीला ताब्यात घेतले असून मुंबईत नेऊन त्याची चौकशी केली जाणार आहे. त्याला अद्याप अटक करण्यात आलेली नाही. ( Bulli Bai App Latest Breaking News )

वाचा: ‘सुल्लीडील’नंतर आता ‘बुल्लीबाई’मुळे वादळ; शिवसेनेने आवाज उठवताच…

बुल्लीबाई अ‍ॅपवर मुस्लिम महिलांचे आक्षेपार्ह फोटो टाकून त्यांच्यावर बोली लावली जात असल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी रविवारी मुंबई सायबर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करत तांत्रिक पुराव्यांच्या आधारे तपास सुरू केला होता. त्यानंतर आज लगेचच बेंगळुरूत छापा टाकून एका २१ वर्षीय तरुणाला ताब्यात घेण्यात आले आहे. हा तरुण सिव्हिल इंजिनीअरिंग करत असून सेकंड ईयरला आहे, अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली. बुल्लीबाई अ‍ॅपवरील पाच फॉलोअर्सपैकी एक असलेल्या या तरुणाची मुंबईत नेऊन अधिक चौकशी करण्यात येणार असून त्यानंतर त्याला अटक केली जाईल, अशी शक्यता वर्तवण्यात आली. त्याच्या चौकशीत महत्त्वाचे धागेदारे लागण्याचीही शक्यता आहे.

वाचा :गांधीजींचा अवमान: कालीचरण यांना कोर्टाचा दणका; ‘हे’ निरीक्षण नोंदवत नाकारला जामीन

महिला पत्रकाराला टार्गेट केल्यानंतर…

सोशल मीडियात सक्रिय असलेल्या किमान १०० मुस्लिम महिलांना बुल्लीबाई अ‍ॅपच्या माध्यमातून लक्ष्य करण्यात आलं आहे. त्यात एका महिला पत्रकारालाचाही समावेश असून या पत्रकाराने दिल्ली पोलिसांच्या सायबर सेलकडे याबाबत ऑनलाइन तक्रार केली आहे. त्याची दखल घेत दिल्ली पोलिसांनी रविवारी गुन्हा दाखल केला असून चौकशी सुरू आहे. त्याचवेळी मुंबई पोलीसही याप्रकरणी तपास करत असून कारवाईचे पहिले मोठे पाऊल मुंबई पोलिसांनी टाकले आहे. बुल्लीबाई अ‍ॅप डेव्हलप करणाऱ्या व्यक्तीवर कारवाईची मागणी होत असून एक युजर ताब्यात आल्याने तपासाला वेग येणार आहे.

दरम्यान, गिटहब प्लॅटफॉर्मवर हे अ‍ॅप लॉन्च करण्यात आले होते. यावरून मोठे वादळ उठल्यानंतर हे अ‍ॅप डेव्हलप करणाऱ्या युजरला ब्लॉक करण्यात आले आहे. तसे गिटहबकडून केंद्र सरकारला कळवण्यात आले आहे. अशाचप्रकारचे सुल्लीडील्स हे अ‍ॅप काही महिन्यांपूर्वी लॉन्च करण्यात आले होते. तेही नंतर ब्लॉक करण्यात आले होते.

वाचा : करोनाच्या उद्रेकाने झोप उडाली; देशातील आणखी एका राज्यात ‘मिनी लॉकडाऊन’

Source: https://maharashtratimes.com/india-news/bulli-bai-app-row-21-year-old-detained-from-bengaluru-says-mumbai-police/articleshow/88673401.cms