मुंबई बातम्या

मुंबईत मोठी रुग्णवाढ ; दिवसभरात १३७७ करोनाबाधित – Loksatta

राज्यात मुंबईत सर्वाधिक करोनाप्रसार होत असून राज्यातील एकूण रुग्णसंख्येत सुमारे ६३ टक्के रुग्ण हे मुंबईत आढळले आहेत.

मुंबई : राज्यात मंगळवारी दिवसभरात २१७२ करोनाबाधित आढळल़े  त्यात सर्वाधिक १३७७ रुग्ण मुंबईत आढळले आहेत़. शहरात गेल्या आठवडय़ात एक टक्क्यांपेक्षाही कमी असलेले बाधितांचे प्रमाण आता तीन टक्क्यांवर गेल्याने मुंबई तिसऱ्या लाटेच्या उंबरठय़ावर असल्याची भीती व्यक्त होत आह़े

राज्यात गेल्या आठवडय़ात दैनंदिन रुग्णसंख्येने हजाराचा टप्पा पार केला होता. या आठवडय़ाच्या सुरुवातीलाच दैनंदिन रुग्णसंख्येने दोन हजारांचा आकडा पार केल्यामुळे जवळपास आठ ते नऊ दिवसांतच राज्यातील करोना रुग्णांचे प्रमाण दुपटीने वाढले आहे. राज्यात मुंबईत सर्वाधिक करोनाप्रसार होत असून राज्यातील एकूण रुग्णसंख्येत सुमारे ६३ टक्के रुग्ण हे मुंबईत आढळले आहेत.

तीन दिवसांत रुग्णसंख्या दुप्पट

मुंबईत गेले काही दिवस करोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढत असून, तीन दिवसांतच रुग्णसंख्या जवळपास दुपटीने वाढली आहे. २५ डिसेंबरला मुंबईत ७३५ नव्या रुग्णांचे निदान झाले होते. त्यानंतर आता २८ डिसेंबरला शहरात १३७७ रुग्णांची नव्याने भर पडली आहे. गेल्या आठवडय़ात शहरात बाधितांचे प्रमाण हे एक टक्क्यापेक्षाही कमी होते. या आठवडय़ात हे प्रमाण तीन टक्क्यांच्याही पुढे गेले आहे. मुंबईतील प्रतिबंधित गृहनिर्माण संकुलांची संख्या एका दिवसात २९ वरून ३७ झाली आहे. मुंबईत मंगळवारी ३३८ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.

मे महिन्याइतकी रुग्णसंख्या

करोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान मे महिन्याच्या दुसऱ्या आठवडय़ात प्रतिदिन सुमारे दीड हजार रुग्णांचे नव्याने निदान केले जात होते. मंगळवारीही रुग्णसंख्येचा आलेखही जवळपास इतकाच वाढला आहे.

मृत्यूचे प्रमाण कमी

राज्यात मंगळवारी २२ रुग्णांचा तर मुंबईत एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. रुग्णसंख्या वाढली असली तरी मृत्यूचे प्रमाण तुलनेने कमी असल्याचे आढळले आहे. राज्यात मंगळवारी १०९८ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.

तिसऱ्या लाटेच्या उंबरठय़ावर

मुंबईत झपाटय़ाने वाढणारी रुग्णसंख्या लक्षात घेता मुंबई तिसऱ्या लाटेच्या उंबरठय़ावर असल्याचे मानले जाते. मात्र, आतापर्यंत आढळलेल्या सर्व रुग्णांना सौम्य लक्षणे आहेत. तसेच रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्याही वाढलेली नाही. त्यामुळे घाबरून जाण्याचे कारण नाही. परंतु करोनाचा प्रसार वेगाने वाढणार नाही, यासाठी काळजी घेणे गरजेचे आहे, असे मत करोना कृती दलाचे सदस्य डॉ. शशांक जोशी यांनी व्यक्त केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Source: https://www.loksatta.com/mumbai/mumbai-reported-1377-new-covid-19-cases-zws-70-2738597/