मुंबई बातम्या

Mumbai : नायर रुग्णालयातील घटनेवरून मुंबई महापालिकेच्या महासभेत गोंधळ – Sakal

मुंबई : महापालिकेच्या नायर रुग्णालयात सिलिंडर स्फोटातील रुग्णांच्या उपचारास झालेल्या विलंबप्रकरणी स्थायी समितीत सर्वपक्षीय सदस्यांचे एकमत झाले; मात्र त्यानंतर काही तासांनी झालेल्या महासभेत मात्र प्रचंड गोंधळ झाला. या प्रकरणावरून भाजपच्या आरोग्य समिती सदस्यांनी दिलेल्या राजीनाम्यावर स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी आक्षेपार्ह विधान केले, असा आरोप करत भाजप सदस्यांनी त्यांना घेराव घातला.

महासभेत सभागृह नेत्या विशाखा राऊत यांनी हरकतीचा मुद्दा उपस्थित करून नायर रुग्णालयातील घटनेचा निषेध केला. अध्यक्ष यशवंत जाधव यांनी घटनेचा निषेध व्यक्त करत भाजपच्या आरोग्य समिती सदस्यांनी दिलेले समिती सदस्यपदाचे राजीनामे म्हणजे पळ काढण्याचा प्रकार असल्याचा आरोप केला. या विधानावर भाजपच्या ११ सदस्यांनी यशवंत जाधव यांच्याकडे धाव घेतली. त्यावर शिवसेनेचे नगरसेवकही आसनावरून उठले. त्यामुळे सभागृहात गोंधळ झाला.

भाजपच्या नगरसेवकांनी नायर रुग्णालयाला दिलेली भेट व या प्रकरणी आरोग्य समिती सदस्यांनी दिलेले राजीनामे शिवसेनेला झोंबले असतील. त्यामुळे नायर रुग्णालयात भाजपचे कोणी फिरकले नाही, असा दावा यशवंत जाधव यांनी केला. त्यामुळे भाजपचे नगरसेवक संतापले.

– भालचंद्र शिरसाट,

भाजप सदस्य.

नायर रुग्णालय प्रकरणी राजकारण होणार नाही, अशी अपेक्षा होती. मात्र भाजपच्या सदस्यांनी दिलेल्या राजीनाम्याच्या पत्रातच

राजकारण आहे. ही मंडळी रुग्णांची विचारपूस करायला गेली होती की शिवसेनेचे कोणी तेथे गेले की नाहीत, हे पाहायला गेले होते? असे पत्र देऊन भाजपने राजकारण केले. त्यामुळे बोलावे लागले.

– यशवंत जाधव, अध्यक्ष, स्थायी समिती.

डॉक्टरांची नोंदणी रद्द करा!

मुंबई महापालिकेच्या नायर रुग्णालयात जखमींवर उपचारासाठी झालेल्या दिरंगाईचे पडसाद आज स्थायी समितीतही उमटले आहेत. भाजपने दोषी आढळणाऱ्या डॉक्टरांची वैद्यकीय नोंदणीच रद्द करण्याची मागणी केली; तर डॉक्टरांच्या संघटनांनी आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी भूमिका स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी मांडली.

वरळी येथील एका घरात ३० नोव्हेंबर रोजी गॅस सिलिंडरच्या स्फोटात चार महिन्यांच्या बाळासह चार जण जखमी झाले होते. चौघांना नायर रुग्णालयातील अपघात विभागात उपचाराविना ठेवण्यात आले होते. त्यात या बालकाचा मृत्यू झाला, असा डॉक्टरांवर आरोप आहे. या प्रकरणाचे पडसाद आज स्थायी समितीत उमटले. सभागृह नेत्या विशाखा राऊत यांनी आज स्थायी समितीत सभा तहकुबीची सूचना मांडून असे प्रकार घडू नये म्हणून कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी केली. विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली. अशांवर जरब बसवण्यासाठी निलंबन करून उपयोग नाही तर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी राष्ट्रवादीच्या राखी जाधव यांनी केली. भाजपचे भालचंद्र शिरसाट यांनी संबंधित डॉक्टरांची नोंदणीच रद्द करण्यासारखी शिक्षा व्हायला हवी, असे नमूद केले.

Source: https://www.esakal.com/mumbai/confusion-general-body-meeting-mumbai-municipal-corporation-over-incident-nair-hospital-tmb01