मुंबई बातम्या

सात वर्षांपूर्वीच्या हत्येचा उलगडा ; मुंबई पोलिसांनी केली आरोपीला अटक | Mumbai crime update – Sakal

मुंबई
sakal_logo

By

रोहिणी गोसावी : सकाळ वृत्तसेवा

मुंबई : 2014 मध्ये झालेल्या हत्येचा (Murder case) सात वर्षांनी उलगडा करण्यास मुंबई पोलिसांना (Mumbai Police) यश आलं आहे. हत्या झालेल्या महिलेच्या नातवानंच तिचा खून केला होता, असं तपासातून समोर आलंय. पोलिसांनी नातवाला अटक (culprit arrested) केली आहे. 2014 मध्ये अंधेरीच्या एका घरातून वास येत असल्याचा फोन पवई पोलिसांना आला होता, त्यानंतर पोलिसांनी जाऊन बघितलं तर घरात एका महिलेचा मृतदेह (Woman dead body) पडलेला होता. महिलेचा गळा दाबून खून करण्यात आला होता.

खून हा चोरीच्या उद्देशानं करण्यात आल्याचं पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आलं होतं. पण चोर किंवा खुन करणारी व्यक्ती पोलिसांच्या ताब्यात येत नव्हती. गुन्हेगारानं कोणताही पुरावा सोडलेला नसल्यानं प्रकरणाचा तपास लागत नव्हता. सहा महिन्यांपूर्वी पवई पोलीस स्टेशनचे प्रभारी पोलीस निरीक्षक महेश ठाकुर यांनी 6 महिन्यांपुर्वी या केसचा तपास पुन्हा सुरु करण्यासाठी एक पथक तयार केलं. गुन्ह्याला अनेक वर्ष झालेली असल्यानं तपास सुरुवातीपासून सुरु करावा लागला.

पोलिसांनी पुन्हा सर्व नातेवाईक आणि आजुबाजूच्या नागरिकांकडे चौकशी करायला सुरुवात केली. तरीही पोलिसांना हाताला काही मिळत नव्हतं. नातेवाईकांची पुन्हा कसुन चौकशी केली, तेव्हा महिलेचा नातू हा कुणाच्याही संपर्कात नसल्याचं आणि महिलेचा खुन झाला तेव्हापासुन तो गायब असल्याचं पोलिसांना समजलं. त्यामुळं त्याच्यावर पोलिसांचा संशय बळावला. पण त्याचा कुठेही ठावठिकाणा लागत नव्हता, सोशल मीडियावरही तो अॅक्टीव नव्हता. त्यामुळं पोलिसांचा तपास पुन्हा थंडावला. काही दिवसांनी त्या नातवानं सोशल मिडीयाच्या माध्यमातून एका नातेवाईकाला संपर्क केल्याची माहीती पोलिसांना मिळाली, त्यानंतर तपास केला असता, तो कल्याणमध्ये राहत असून पेंटरचं काम करत असल्याचं पोलिसांना समजलं.

त्यानंतर पोलिसांनी त्याला रंगकामासाठी बोलावून सापळा रचून त्याला पकडलं. नंतर चौकशीत त्यानं उडवा उडवीची उत्तरं दिली, पण कसून चौकशी केली तेव्हा त्यानं गुन्हा कबूल केला. आजीनं त्याच्या दुसऱ्या प्रेमविवाहाला नकार दिला होता, आणि नंतरही ती बायकोला त्याच्याविरुद्ध भडकवत होती, म्हणून तीचा गळा दाबला असं आरोपीनं सांगितलं. आरोपीवर भा द वी कलम 302, 452, 394 आणि 342 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Source: https://www.esakal.com/mumbai/mumbai-crime-update-woman-murder-case-police-investigation-successful-after-seven-years-culprit-arrested-nss91