मुंबई बातम्या

मुंबई: कर्नाक उड्डाणपूलाच्या पाडकामासाठी शनिवारी रात्रीपासून २७ तासांचा मेगाब्लॉक – Loksatta

सीएसएमटी – मशीद रोड रेल्वे स्थानकांदरम्यानचा १५४ वर्षे जुना कर्नाक उड्डाणपूल धोकादायक बनला असून या पुलाचे पाडकाम १९ नोव्हेंबर रात्री ११ वाजल्यापासून सुरू करण्यात येणार आहे. या कामानिमित्त मध्य रेल्वेवर सीएसएमटी-भायखळा, सीएसएमटी-वडाळा आणि मेल-एक्स्प्रेस कोचिंग यार्डवर एकूण २७ तासांचा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉकमध्ये सीएसएमटी-भायखळा मार्ग १७ तासांनी, तर सीएसएमटी-वडाळा मार्ग २१ तासांनी पूर्ववत होणार आहे.

हेही वाचा >>>मुंबई: सायकलसाठी हवे सुरक्षित वाहनतळ डबेवाल्यांच्या मागणीला सर्वेक्षणातून वाचा

या २७ तासांच्या मेगाब्लॉकमध्ये १७ तासांचा ब्लॉक सीएसएमटी – भायखळ्यादरम्यान १९ नोव्हेंबर रोजी रात्री ११ वाजता सुरू होणार असून तो २० नोव्हेंबर रोजी दुपारी ४ वाजता संपुष्टात येईल. याचप्रमाणे, हार्बर मार्गावरील २१ तासांचा ब्लॉक सीएसएमटी – वडाळ्यादरम्यान १९ नोव्हेंबर रोजी रात्री ११ वाजता सुरू होणार असून तो २० नोव्हेंबर रोजी रात्री ८ वाजता संपुष्टात येईल. त्यानंतरच मुख्य आणि हार्बर मार्गावरील लोकलची संपूर्ण वाहतूक सुरळीत होईल. उर्वरित, मेल एक्सप्रेस यार्डलाईनची वाहतूक २७ तासानंतर म्हणजेच २१ नोव्हेंबर रोजी पहाटे २ वाजता सुरू होईल, असे मध्य रेल्वेतील अधिकाऱ्यांनी सांगितले.

हेही वाचा >>>“राहुल गांधींना झप्पी मारणारे आदित्य ठाकरे…”, सावरकरांच्या अपमानावरून शेलारांचा हल्लाबोल; म्हणाले…

सीएसएमटी-भायखळा, वडाळादरम्यान लोकल फेऱ्या चालविण्यात येणार नाहीत. ब्लॉककाळात दररोज धावणाऱ्या १ हजार ८१० लोकल फेऱ्यांपैकी अप आणि डाऊनला जाणाऱ्या एकूण १ हजार ९६ लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. भायखळा, परेल, कुर्ला, दादर या स्थानकांतून ठाणे, कल्याण तसेच कर्जत- कसारा या स्थानकांदरम्यान लोकल ट्रेन चालवल्या जाणार आहेत. याशिवाय, हार्बर मार्गावर वडाळा ते पनवेल आणि गोरेगाव या स्थानकादरम्यान लोकल धावतील. प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी बेस्टने १९ नोव्हेंबर रोजी रात्री १०.३० पासून २० नोव्हेंबर रोजी पहाटे ६.३० पर्यंत ४७ जादा बस चालवण्याचा निर्णय घेतला आहे.

मेल-एक्स्प्रेस गाड्यांवर परिणाम

या दोन दिवशी (१९ आणि २१ नोव्हेंबर) अप आणि डाउन मार्गावरील ३६ मेल-एक्स्प्रेस रद्द करण्यात आल्या आहेत. यामध्ये मुंबई-पुणे मार्गांवरील इंटरसीटी, डेक्कन एक्स्प्रेस, सिहंगड एक्स्प्रेस, प्रगती एक्स्प्रेस, डेक्कन क्वीन यासह अन्य गाड्यांचा समावेश आहे. याशिवाय ६८ मेल एक्स्प्रेस गाड्यांना दादर, पनवेल, पुणे आणि नाशिक या स्थानकातच शेवटचा थांबा दिला असून येथून काही लांबपल्ल्याच्या गाड्या सुटणार आहेत. रद्द केलेल्या मेल-एक्स्प्रेसच्या तिकिटाचा परतावा प्रवाशांना देण्यासाठी अतिरिक्त तिकीट खिडक्या उघडण्यात आल्याचे मध्य रेल्वेकडून सांगण्यात आले.

हेही वाचा >>>अंधेरीच्या गोखले पुलाबाबत महानगरपालिकेचे आयआयटी आणि व्हीजेटीआयला पत्र

महत्त्वाचे
सीएसएमटी ते मशीद बंदर स्थानकादरम्यान १८६८ साली बांधण्यात आलेला कर्नाक उड्डाणपूल धोकादायक बनला आहे. कर्नाक उड्डाणपुलाला तडे गेले असून पुलाचा पायाही खराब झाला आहे. त्याच्या खांबानाही तडे आहेत. हा पूल २२ ऑगस्ट रोजी वाहतुकीसाठी बंद केल्यानंतर २ सप्टेंबर २०२२पासून रेल्वे हद्दीतील किरकोळ पाडकामाला सुरुवात करण्यात आली.

२७ तासांच्या मेगाब्लॉकमध्ये कर्नाक उड्डाणपुलाचा रेल्वे रुळावरील गर्डर हटवण्यात येईल आणि अन्य पाडकामही केले जाणार आहे.

सध्याचा रेल्वे हद्दीतील कर्नाक उड्डाणपुलाची लांब ५० मीटर, तर रुंदी १८ मीटर आहे.

पूल पाडकाम करण्यासाठी ४०० अधिकारी आणि कामगार कार्यरत असणार आहेत.

हेही वाचा >>>“ते गळे काढणार…मुंबई आमची, मुंबई आमची…, तिजोरी भरणार बिल्डर, कंत्राटदार आणि बारवाल्यांची”

पश्चिम रेल्वेवर मेगाब्लॉक नाही
मध्य रेल्वेवर २७ तासांच्या मेगाब्लॉकमुळे उपनगरातून दक्षिण मुंबईत येणाऱ्या आणि जाणाऱ्याची गैरसोय लक्षात घेऊन पश्चिम रेल्वेने येत्या रविवारी मेगाब्लॉक न घेण्याचा निर्णय घेतला आहे.

Source: https://news.google.com/__i/rss/rd/articles/CBMikgFodHRwczovL3d3dy5sb2tzYXR0YS5jb20vbXVtYmFpL3R3ZW50eS1zZXZlbi1ob3VyLW1lZ2FibG9jay1mcm9tLXNhdHVyZGF5LW5pZ2h0LWZvci1kZW1vbGl0aW9uLW9mLWthcm5hay1mbHlvdmVyLW11bWJhaS1wcmludC1uZXdzLWFteS05NS0zMjcyMzUzL9IBAA?oc=5