मुंबई बातम्या

मुंबई-अलिबाग जलवाहतूक तीन दिवस बंद; एसटीही बंद असल्याने प्रवाशांची दुहेरी कोंडी – Loksatta

या मार्गे दररोज सुमारे साडेतीन हजार प्रवासी प्रवास करतात. शनिवार रविवार या दोन दिवसात या जलमार्गावरील प्रवाशांची संख्या आठ ते दहा हजारांपर्यंत पोहोचते.

एकीकडे एसटी कर्मचाऱ्यांचा संप आणि दुसरीकडे आता जलवाहतूक बंद झाल्यामुळे अलिबागमधील प्रवाशांची दुहेरी कोंडी झाल्याचे चित्र मंगळवारी पाहायला मिळाले. खाजगी वाहने आणि शेअर टॅक्सीचा वापर करून मुंबई आणि पनवेल गाठण्याची वेळ प्रवाशांवर आली आहे. यामुळे प्रवाशांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागला.
   

अलिबागमधील एसटीच्या कामगार संघटनांनी आपली आडमूठी भुमिका अद्याप सोडलेली नाही. पगारवाढ मिळूनही अलिबाग आगारातील कर्मचाऱ्यांनी संप सुरुच ठेवला आहे. त्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. दुसरीकडे नौदल सप्ताहामुळे मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया ते मांडवादरम्यान सुरु असणारी जलप्रवासी वाहतूक २ ते ४ डिसेंबर अशी तीन दिवस बंद ठेवण्यात आली आहे. त्यामुळे मुंबईत जाणाऱ्या आणि अलिबागला येणाऱ्या पर्यटकांची दुहेरी कोंडी झाली आहे.
  

मुंबई ते अलिबाग दरम्यान मांडवामार्गे जल प्रवासी वाहतूक केली जाते, यातून दररोज सुमारे साडेतीन हजार प्रवासी प्रवास करतात. शनिवार रविवार या दोन दिवसात या जलमार्गावरील प्रवाशांची संख्या आठ ते दहा हजारांपर्यंत पोहोचते, जलद आणि आरामदायी प्रवासासाठी या मार्गाला प्रवाशांची पसंती मिळत असते. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपकाळात या जलवाहतुकीचा मोठा आधार अलिबागकरांना होता. मात्र नौदल सप्ताहामुळे जलवाहतूक प्रवासी सेवा बंद राहणार असल्याने प्रवाशांची मोठीच अडचण झाली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Source: https://www.loksatta.com/mumbai/mumbai-alibaug-boat-travel-stopped-for-3-days-vsk-98-2703571/