मुंबई बातम्या

‘सागरी सेतू’वरून मुंबई-नवी मुंबई प्रवास आणखी वेगवान? – Loksatta

या सागरी सेतूचा वापर मोठय़ा प्रमाणावर व्हावा यासाठी त्यावर मेट्रो मार्गही प्रस्तावित करण्यात आला आहे.

‘मेट्रो १९’चा व्यवहार्यता अभ्यास सुरू; दोन्ही मार्गासाठी एकू ण १४,७३० कोटी रुपये खर्च अपेक्षित

मंगल हनवते, लोकसत्ता

मुंबई : मुंबई आणि नवी मुंबई हे अंतर काही मिनिटांत पार करता यावे यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) मुंबई पारबंदर प्रकल्पाचे (शिवडी-न्हावा शेवा सागरी सेतू) बांधकाम सुरू केले आहे.  पण त्याच वेळी भविष्यात या सागरी सेतूवरून मेट्रोनेही प्रवाशांना मुंबईवरून नवी मुंबईला अवघ्या काही मिनिटांत पोहचता येणार आहे. एमएमआरडीएने सागरी सेतूवरील प्रस्तावित ‘मेट्रो १९’ (प्रभादेवी -शिवडी-नवी मुंबई) मार्गाच्या व्यवहार्यता अभ्यासाला सुरुवात करून एक पाऊल पुढे टाकले आहे.

सध्या २१.८१ किमी लांबीच्या शिवडी-नाव्हा शेवा सागरी सेतूचे काम वेगात सुरू असून सप्टेंबर २०२३ मध्ये हा सागरी सेतू वाहतुकीसाठी खुला होणार आहे. या सागरी सेतूचा वापर मोठय़ा प्रमाणावर व्हावा यासाठी त्यावर मेट्रो मार्गही प्रस्तावित करण्यात आला आहे.  एका खासगी सल्लागार कंपनीची नियुक्ती करून सागरी सेतूवरील मेट्रो मार्गाच्या व्यवहार्यता अभ्यासाला सुरुवात करण्यात आल्याची माहिती महानगर आयुक्त एस. व्ही. आर. श्रीनिवास यांनी दिली. हा अभ्यास पूर्ण झाल्यानंतर मेट्रो मार्गाला हिरवा

कं दिल मिळेल आणि त्यानंतर ‘मेट्रो १९’ उभारणीची प्रक्रिया सुरू होईल. यासाठी काही कालावधी लागणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

सर्वंकष वाहतूक अभ्यास-१ च्या शिफारशीनुसार मुंबई पारबंदर प्रकल्पाचे काम सुरू आहे. या प्रकल्पात ‘मेट्रो १९’ मार्ग प्रस्तावित होता. त्यानुसार २०१० मध्येच यासाठीचा सविस्तर प्रकल्प अहवालही तयार करण्यात आला होता. पण या मार्गाबाबत कोणतीच हालचाली होताना दिसत नव्हती. आता मेट्रो १९ च्या व्यवहार्यता अभ्यासाला सुरुवात झाली आहे. . सार्वजनिक वाहतुकीच्या वापराचा मागील १२ वर्षांत घसरलेला टक्का वाढविण्यासाठी मेट्रो १९ ची गरज असल्याची शिफारस सर्वंकष वाहतूक अभ्यास-२ मध्ये केली आहे.

२६.५ किमीचा मेट्रो १९मार्ग

प्रभादेवी-शिवडी-नवी मुंबई विमानतळ दरम्यान २६.५ किमी लांबीचा ‘मेट्रो १९’ मार्ग उभारण्यात येणार आहे. ‘मेट्रो २१’ मार्ग ५ किमी लांबीचा असेल. या दोन्ही मार्गासाठी एकू ण १४,७३० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.  व्यवहार्यता अभ्यासानंतर ‘मेट्रो १९’चे भवितव्य निश्चित होईल, हा प्रकल्प व्यवहार्य ठरला तरच मार्गी लावता येईल. या सागरीसेतूवर स्वतंत्र बस मार्गिकेचा पर्याय उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचेही श्रीनिवास यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Source: https://www.loksatta.com/mumbai/mmrda-study-for-proposed-metro-19-from-prabhadevi-shivdi-navi-mumbai-route-on-sea-bridge-zws-70-2659986/