मुंबई बातम्या

ईडीकडून मुंबई, पुणे, नागपुरात छापे; अजित पवारांचे बंधू लक्ष्य – Maharashtra Times

म. टा. प्रतिनिधी, मुंबई

सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) गुरुवारी मुंबई, पुणे व नागपुरात छापे टाकले. प्रामुख्याने राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बंधू जगदीश कदम यांच्या कार्यालय व घराचा त्यात समावेश होता. राज्य सहकारी बँक घोटाळ्याशी संबंधित ही कारवाई होती.

राज्य सहकारी बँकेने त्यांचे अध्यक्ष, संचालक, उच्चाधिकारी व काही राजकीय नेत्यांच्या प्रभावाखाली अनेक सूतगिरण्या, सहकारी साखर कारखाने यांना असुरक्षित व भरमसाठ कर्ज वाटप केले. या कर्जवाटपादरम्यान मोठ्या प्रमाणात नियमांचे उल्लंघन झाले. ही सर्व कर्जे पुढे बुडित खात्यात गेल्याने बँकेचे व परिणामी सरकारी तिजोरीचे नुकसान झाले. हा संपूर्ण घोटाळा २५ हजार कोटी रुपयांचा असून त्याचा ‘ईडी’ कडून तपास सुरू आहे. याच तपासांतर्गत गुरुवारी हा छापा टाकण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

‘ईडी’तील विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘अजित पवार यांचे बंधू जगदीश कदम हे दौंड शुगर प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे संचालक आहेत. या कंपनीनेही राज्य सहकारी बँकेचे कर्ज बुडवले आहे. त्यामुळेच कदम यांच्याशी संबंधित मुंबईतील कार्यालय, पुण्यातील घरांवर हा छापा टाकण्यात आला. एकूण सात ठिकाणांचा यांत समावेश होता. त्याशिवाय नागपुरातही एका कार्यालयाचा तपास व छाप्यात समावेश होता.

याच प्रकरणात ‘ईडी’ने मागील महिन्यात साताऱ्याच्या जरंडेश्वर कारखान्याची ६५.७५ कोटी रुपयांची मालमत्ता मनी लॉन्डरिंग कायद्यांतर्गत जप्त केली होती. तर प्राप्तिकर विभागानेही मुंबई, पुणे, कोल्हापूर व गोव्यात सलग चार दिवस तपास आणि छापा टाकला होता. त्यामध्ये १८४ कोटी रुपयांची रोख जप्त करण्यात आली होती.

Source: https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/ed-raids-maharashtra-deputy-chief-minister-ajit-pawars-cousin-jagdish-kadams-house/articleshow/87353118.cms