मुंबई बातम्या

नवी मुंबई: वारंवार हॉर्न वाजवला म्हणून दुचाकीस्वाराला जबर मारहाण – Loksatta

रस्त्यात गाडी पार्क केल्याने मागून येणाऱ्या दुचाकी स्वाराने वारंवार हॉर्न वाजवल्याच्या रागात गाडीतील तिघांनी मिळून दुचाकी स्वाराला बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. पोलिसांनी आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून यामध्ये एका महिलेचाही समावेश आहे. ही घटना नवी मुंबईतील सानपाडा येथे रविवारी घडली. फिर्यादीने उपाचार झाल्यानंतर या बाबत पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला.
१६ तारखेला गौरेश चिखलीकर यांच्यावर हा प्रसंग ओढवला आहे.

गौरेश हे भांडूप येथे राहणारे असून ऐरोली येथील एका कंपनीत नोकरी करतात. त्यांची मेव्हणी सानपाडा येथे राहत असून १६ तारखेला आपले काम आटोपून ते मेव्हणीकडे गेले होते. त्यावेळी सानपाडा मोराज सर्कल येथून मेव्हणीच्या घराकडे जात असताना एक टाटा निक्सोन गाडी रस्त्यात अशा पद्धतीने पार्क केली होती की त्या ठिकाणाहून दुचाकीही पुढे जाऊ शकत नव्हती. या गाडीत काही लोक बसल्याचे लक्षात आल्याने गौरेश यांनी एक दोन वेळा दुचाकीचा हॉर्न वाजवला. मात्र तरीही गाडी रस्त्याच्या कडेला घेण्याची काही हालचाल दिसत नसल्याने त्यांनी पुन्हा काही वेळा हॉर्न वाजवला. त्यावेळी मात्र गाडी रस्त्याच्या कडेला घेऊन गौरेश यांच्या गाडीला पुढे जाण्यास जागा करून दिली.

हेही वाचा : पनवेल: लक्ष्मीपूजनाला ठेवलेले सात लाखांचे सोने चोरीला; गुन्हा दाखल

मात्र अचानक त्या गाडीतील दोन युवक आणि एक महिला खाली उतरली आणि त्यांनी गौरेश याला बेदम मारहाण सुरु केली. त्यातील एकाने गौरेश यांचे हेल्मेट काढून त्यांच्या डोक्यावर चेहऱ्यावर हेल्मेटचे वार केले. त्यात ते जमिनीवर पडले व नंतर तिघे गाडीत बसून निघून गेले. ही घटना अनेकजण पहात होते. मात्र कोणीही गौरेश याला सोडवण्यास पुढे आले नाही. गौरेश यांच्या डोक्याला व डोळ्याखाली  दुखापत झाली आहे. शुद्धीवर आल्या नंतर गौरेश यांनी स्वतः एका खाजगी रुग्णालयात जाउल उपचार करून घेतले. रुग्णालयातून उपचार घेऊन बाहेर पडल्यावर त्यांनी तुभे पोलीस ठाणे गाठले व त्या अज्ञांताच्या विरोधात गुन्हा नोंद केला. आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक भारत कामत यांनी दिली.

Source: https://news.google.com/__i/rss/rd/articles/CBMid2h0dHBzOi8vd3d3Lmxva3NhdHRhLmNvbS9uYXZpbXVtYmFpL3R3by1tZW4tYW5kLXdvbWFuLWJlYXQtdXAtYmlrZXItcmVwZWF0ZWRseS1ob25raW5nLWhvcm4tbmF2aS1tdW1iYWktdG1iLTAxLTMyMTcwMTUv0gEA?oc=5