मुंबई बातम्या

मुंबई-नाशिक महामार्ग तीन आठवड्यांत खड्डेमुक्त! – Sakal

मुंबई : मुंबई-नाशिक (Mumbai-Nashik) महामार्गावरील खड्यांची दुरुस्ती तातडीने करण्यात येत असून येत्या २५ ऑक्टोबरपर्यंत हे काम पूर्ण होईल, अशी हमी आज केंद्र सरकारच्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या वतीने मुंबई (Mumbai) उच्च न्यायालयात (Court) देण्यात आली.

मुंबई-नाशिक महामार्गावर असलेल्या रस्त्यांच्या दुर्दशेबाबत प्रसिद्ध झालेल्या वृत्तांची दखल घेऊन उच्च न्यायालयाने स्युमोटो याचिका दाखल केली आहे. याचिकेवर आज मुख्य न्या. दीपांकर दत्ता आणि न्या. गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. केंद्रातर्फे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंह यांनी न्यायालयात माहिती दिली.

ठाणे ते वडपे या २४ किलोमीटरच्या रस्त्यावर सध्या दुरुस्तीचे काम सुरू आहे. यासाठी तीन पथके काम करत असून पावसामुळे व्यत्यय न आल्यास मंगळवारपर्यंत काम पूर्ण होईल, अशी माहिती त्यांनी दिली. वडापे ते नाशिक रस्त्याचे उर्वरित काम (९७ किमी) तीन आठवड्यांत पूर्ण होऊ शकेल. यासाठी सात पथके काम करणार आहेत. हा भाग जास्त खड्डेमय असल्याचे त्यांनी सांगितले. पुढील सुनावणी २५ ऑक्टोबर रोजी होणार आहे.

हेही वाचा: नाशिक : उन्हाळ कांद्याच्या बाजारभावात वाढ

कृती अहवाल सादर करा !

मुंबई-नाशिक या सुमारे १०० किमी रस्त्यावर टोलनाक्याच्या माध्यमातून १२० रुपये वसूल केले जातात. तरीही महामार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे असल्याने न्यायालयाने नाराजी व्यक्त केली आहे. तसेच पुढील सुनावणीत सविस्तर कृती अहवाल दाखल करावा, असे निर्देश दिले आहेत.

Source: https://www.esakal.com/mumbai/mumbai-nashik-highway-pit-free-in-three-weeks-psp05