मुंबई बातम्या

मुंबई-गोवा महामार्गावर 13 वर्षांत 2500 बळी, महामार्गाच्या दुरवस्थेबाबत मनसेचे थेट गडकरींना पत्र – TV9 Marathi

मुंबई-गोवा महामार्गाच्या दुरवस्थेबाबत अनेकांनी व्यथा मांडली आहे. गेली अनेक वर्षे या महामार्गाचे काम सुरु आहे. गणेशोत्सवाच्या काळात खड्डेमय रस्त्याने चाकरमानी जाणार कसे हा प्रश्न कायम आहे. सरकारने या महामार्गाकडे लक्ष देऊन प्रवाशांना दिलासा द्यावा, अशी विनंती वारंवार करण्यात येते मात्र याकडे नेहमी सारखे दुर्लक्षच होत आले आहे. त्यावर आता मनसे आक्रमक झालेली पाहायला मिळत आहे.

mumbai-goa-highway

पनवेल : मुंबई-गोवा महामार्गाच्या दुरवस्थेबाबत अनेकांनी व्यथा मांडली आहे. गेली अनेक वर्षे या महामार्गाचे काम सुरु आहे. गणेशोत्सवाच्या काळात खड्डेमय रस्त्याने चाकरमानी जाणार कसे हा प्रश्न कायम आहे. सरकारने या महामार्गाकडे लक्ष देऊन प्रवाशांना दिलासा द्यावा, अशी विनंती वारंवार करण्यात येते मात्र याकडे नेहमी सारखे दुर्लक्षच होत आले आहे. त्यावर आता मनसे आक्रमक झालेली पाहायला मिळत आहे. याप्रकरणी मनसेने थेट केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना पत्र लिहिले आहे.

मुंबई-गोवा महामार्गाच्या दुरवस्थेबाबत मनसे आक्रमक

मुंबई-गोवा महामार्गाच्या दुरवस्थेबाबत मनसे आक्रमक झाली आहे. मनसे रस्ते आस्थापना आणि पनवेल मनसे शुक्रवारी सकाळी 11 वाजता कोकण भवन, बेलापुर येथील कार्यालयात संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन देऊन जाब विचारणार आहेत. मुंबई-गोवा महामार्गावर गेल्या 13 वर्षांत 2500 च्यावर बळी गेलेत. प्रचंड खड्डे, प्रचंड भ्रष्टाचार रेंगाळलेलं काम, चिखलाने माखलेले रस्ते, गेंड्याच्या कातडीचे अधिकारी, पडणारे पूल, माजलेले कंत्राटदार, निकृष्ट बांधकाम, हे सगळ तुम्ही अजुन किती दिवस सहन करणार? उठा… किती दिवस शांत बसणार? आमदार-खासदार झोपलेत म्हणून तुम्ही सुद्धा डोळे बंद करून कस चालणार? त्रास तुमच्या आईला होतोय. पाठीचा कणा तुमच्या वडिलांचा मोडतोय. तरीही तुम्ही सहन करत राहणार? असा सवाल करत मनसेने सर्वसामान्य नागरिकांना आमच्यासोबत सामील व्हा, अशी पोस्ट तयार करुन सोशल मीडियावर व्हायरल केली आहे.

मनसेचे थेट नितीन गडकरी यांना पत्र

मनसेच्या रस्ते आस्थापना विभागाने तर थेट नितीन गडकरी यांना पत्र लिहून जाब विचारला आहे. गेली 12 वर्षे मुंबई-गोवा महामार्गाचे काम सुरु आहे. पत्रात म्हटले आहे, “या 12 वर्षांतले गेली 7 वर्षे आपण केंद्रीय रस्ते परिवहन आणि महामार्ग मंत्री आहात. देशात महामार्ग निर्मितीबाबतचा आपला आवाका सर्वश्रुत आहे. मात्र, दुर्दैवाने सांगू ईच्छितो आपल्या या लौकीकाला “मुंबई-गोवा महामार्ग” हा पांढऱ्या शुभ्र कागदावरचा काळा डाग आहे. देशात ईतर ठिकाणी 18 तासांत 25 किलोमीटर महामार्गाची निर्मीती करणारे आपण मुंबई-गोवा महामार्गासमोर मात्र अगतिक झालेले दिसत आहात याचे दुःख आहे. असो, तरीही आपल्याकडून आम्हाला अपेक्षा आहेत”.

मनसेने पत्रात मुंबई-गोवा महामार्गाचे (राष्ट्रीय महामार्ग क्र. ६६) काम संथगतीने आणि कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांच्या 1700 कोटींच्या भ्रष्टाचारामुळे काम निकृष्ट दर्जाचे झाले असल्याचा आरोप केला आहे.

गेली 13 वर्ष महामार्गाचे काम सुरू आहे. 2500 लोकांचा बळी या महामार्गाने घेतला एवढे बळी तर युद्धात सुद्धा जात नाही. याला अधिकारी जबाबदार आहे 8 हजार कोटींचा यांनी भुगा केला आहे मात्र आऊटपुट काहीच नाही, असा आरोप मनसेचे रस्ते आस्थापना कार्याध्यक्ष योगेश जनार्दन चिले यांनी केला आहे.

संबंधित बातम्या :

गृहिणींचे बजेट कोलमडले, घरगुती सिलिंडर 25 रुपयांनी तर व्यावसायिक सिलेंडर 75 रुपयांनी महागला

कल्पिता पिंपळे यांच्यावरील हल्ल्याचा निषेध, गुन्हेगाराला कठोर शिक्षा व्हावी, नवी मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांचे आयुक्तांना निवेदन

Source: https://www.tv9marathi.com/maharashtra/navi-mumbai/panvel-2500-deaths-on-mumbai-goa-highway-in-past-13-years-due-to-bad-condition-of-highway-mns-letter-to-central-minister-nitin-gadkari-528044.html