मुंबई बातम्या

Mumbai Covid Restrictions: ओमिक्रॉनचा धोका वाढला; मुंबईत नव्या गाइडलाइन्स, न्यू ईयर पार्टीबाबत ‘या’ सूचना – Maharashtra Times

हायलाइट्स:

  • देशातील ओमिक्रॉन बाधितांची संख्या पोहचली १४० वर.
  • महाराष्ट्रात ८, कर्नाटकात ६, तेलंगणात १२ नवीन रुग्ण.
  • मुंबई महापालिकेने जारी केल्या नवीन गाइडलाइन्स.

नवी दिल्ली: देशातील ओमिक्रॉन बाधित रुग्णांची संख्या वाढत चालली असून आज तेलंगणमध्ये १२, महाराष्ट्रात ८, कर्नाटकात ६ तर केरळमध्ये आणखी ४ रुग्णांची भर पडली. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या १४० च्यावर पोहचली आहे. दरम्यान, ओमिक्रॉनचा वाढता धोका लक्षात घेत मुंबई महापालिकेने नवीन गाइडलाइन्स जारी केल्या असून मुंबईकरांनी नाताळ आणि न्यू ईयर सेलिब्रेशन टाळावे, असे आवाहन महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी केले आहे. ( Mumbai Covid Restrictions Latest Update )

वाचा:राज्याची धाकधूक वाढली, ओमायक्रॉनचे नवे ८ रुग्ण, आता…

यूरोपमधील ब्रिटन व अन्य देशांत ओमिक्रॉनमुळे कोविड रुग्णसंख्येचा उद्रेक पाहायला मिळत आहे. त्याचवेळी भारतातही करोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटचा धोका वाढत चालला असून आज रुग्णसंख्या १४० च्या पुढे गेली आहे. त्यात महाराष्ट्रातील आकडे चिंता वाढवणारे आहेत. महाराष्ट्रात आज ८ नवीन रुग्णांची भर पडल्याने रुग्णसंख्या ४८ झाली. आज आढळलेल्या रुग्णांपैकी ४ रुग्ण मुंबई विमानतळ सर्वेक्षणातील तर ३ रुग्ण सातारा येथील आणि १ रुग्ण पुणे महापालिका क्षेत्रातील आहे. तेलंगणमध्ये १२ नवे रुग्ण आढळल्याने राज्यातील रुग्णसंख्या २० झाली. कर्नाटकात ६ नवे रुग्ण आढळले असून राज्यातील रुग्णसंख्या १४ झाली आहे तर केरळमध्ये ४ नवीन रुग्णांची भर पडली असून राज्यातील एकूण संख्या ११ झाली आहे.

वाचा:तर भारतात दररोज १४ लाख नवे रुग्ण आढळू शकतात!; टास्क फोर्सने नेमकं काय सांगितलं?

ओमिक्रॉनचा वाढता धोका लक्षात घेत प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. त्यात मुंबई महापालिकेने आज नवीन गाइडलाइन्स जारी केल्या आहेत. त्यासोबत नाताळ आणि न्यू ईयर सेलिब्रेशन टाळण्याचे आवाहनही करण्यात आले आहे. गर्दी टाळा, गाइडलाइन्स पाळा, अन्यथा कारवाईला सामोरे जा, असा इशाराच पालिकेने दिला आहे. कोविड नियम मोडणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी प्रत्येक वॉर्डात पथक नेमण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे.

अशा आहेत गाइडलाइन्स…

१. बंदिस्त सभागृहात आसन क्षमतेच्या ५० टक्के उपस्थितीची अट असेल तर मोकळ्या जागेसाठी २५ टक्के उपस्थिती ही अट राहील.

२. मोकळे मैदान वा अन्य ठिकाणी एखाद्या कार्यक्रमासाठी १ हजाराच्या वर लोकांची उपस्थिती अपेक्षित असेल तर आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची पूर्वपरवानगी घ्यावी लागेल.

३. सर्व हॉटेल्स, रेस्टॉरंट, चित्रपटगृहे, मॉल्स यांना ग्राहक संख्या आणि अन्यबाबतीत जे नियम घालून दिले आहेत त्याचे काटेकोरपणे पालन करावे.

४. ज्यांचं संपर्ण लसीकरण झालं आहे अशाच व्यक्तींना सार्वजनिक ठिकाणी वावरता येईल. त्यात सार्वजनिक वाहतूक सेवांचाही समावेश आहे. याबाबत नियम मोडला गेल्यास कठोर कारवाई केली जाईल.

५. बाजारपेठा, विविध आस्थापने याठिकाणी काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे पूर्ण लसीकरण बंधनकारक असेल. त्याशिवाय विविध समारंभ वा अन्य ठिकाणी सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांचेही लसीकरण बंधनकारक. अन्यथा संबंधित आस्थापनावर कारवाई केली जाणार.

६. मास्क बंधनकारक असेल. सोशल डिस्टन्सिंगचे पालन, स्वच्छता, सॅनिटायझेशन याबाबतही दक्षता बाळगावी.

वाचा: डेल्टानंतर आता ओमिक्रॉनचा उद्रेक होऊ शकतो!; केंद्राने व्यक्त केली भीती

Source: https://maharashtratimes.com/india-news/30-more-omicron-cases-detected-in-4-states-india-tally-over-140-bmc-imposes-fresh-restrictions/articleshow/88362584.cms