मुंबई बातम्या

Mumbai Rain Update : मुंबई, ठाणे, पालघर, माथेरान, कल्याणमध्ये पुढील काही तासांत मुसळधार पावसाची शक्यता – Loksatta

अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाने मंगळवारी कोकण, मराठवाडय़ासह नगर आणि उत्तर महाराष्ट्रातील काही भागांत जोरदार हजेरी लावली आहे. बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यात पावसाने पुनरागमन केले आहे. मुंबई, कोकणासह मराठवाडय़ात बुधवारी मुसळधारांचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला. काही ठिकाणी मुसळधार, तर काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

पालघर, मुंबई आणि रायगड जिल्ह्यांच्या काही भागांवर तीव्र ढग जमा झाल्याने मुंबईसह उपनगरे, अलिबाग, ठाणे, माथेरान, कल्याण येथे मुसळधार पावसाची शक्यता मुंबई प्रादेशिक हवामान विभागाने वर्तवली आहे. तसेच बुधवारी नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार या जिल्ह्यांत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

पुढील काही तासांमध्ये मुंबई, ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यांत वेगळ्या ठिकाणी मध्यम ते तीव्र पावसाची शक्यता आहे. काही भागात वादळी वाऱ्यासोबत मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट देखील होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

मंगळवारी सांताक्रूझ येथे सकाळी ८.३० ते सायं. ५.३० या वेळेत ७८.४ तर कुलाबा येथे ३२.६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. तर सोमवारी सकाळी ८.३० ते मंगळवारी सकाळी ८.३०पर्यंत सांताक्रूझ येथे ४९ तर कुलाबा येथे २९.८ मिलिमीटर पाऊस नोंदला गेला. सोमवारी मध्यम स्वरुपाच्या पावसानंतर रात्री पावसाचा जोर वाढला होता. कर्नाटकच्या वर असलेले पूर्व-पश्चिम वाऱ्याचे क्षेत्र मंगळवारी चक्रीय वात स्थितीत परावर्तित झाले. त्यामुळे कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा येथील पावसाचा जोर वाढल्याचे, प्रादेशिक हवामान विभागाच्या अधिकारी शुभांगी भुते यांनी स्पष्ट केले होते.

दरम्यान, मंगळवारी मराठवाडय़ासह नगर आणि उत्तर महाराष्ट्रातील काही भागांत हाहाकार उडवला. पुरात सात नागरिकांसह शेकडो जनावरे वाहून गेली. अतिवृष्टीमुळे शेतीचेही नुकसान झाले. अनेक ठिकाणी दरडी कोसळून वाहतूक ठप्प झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे.



औरंगाबाद जिल्ह्य़ातील कन्नड तालुक्यात औट्रम घाटात दरडी कोसळल्याने औरंगाबाद-धुळे महामार्गावरील वाहतूक दुपापर्यंत ठप्प होती. गौताळा अभयारण्यातही दरडी कोसळल्याचे समजते. काही गावांमध्ये पाझर तलाव फुटल्याने खरिपाचे मोठे नुकसान झाले आहे. मराठवाडय़ात ६७ महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद करण्यात आली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

ताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.

First Published on September 1, 2021 7:51 am

Web Title: mumbai rain update monsoon update rain likely in mumbai thane palghar matheran kalyan abn 97

Source: https://www.loksatta.com/mumbai-news/mumbai-rain-update-monsoon-update-rain-likely-in-mumbai-thane-palghar-matheran-kalyan-abn-97-2582430/